News

घात.. अपघात तरीही… विश्वास

सुखोई आणि मिराजवर वायुसेनेचा इतका विश्वास का ?

“Airpower is like Oxygen. When you have enough, you don’t have to think about it. When you don’t have enough, that’s all you can think about.”

ग्वाल्हेर एअर बेसवरून (air base) उड्डाण केलेल्या सुखोई-३० व मिराज-२००० या दोन्ही विमानांचा एकाच वेळी अपघात झाला आहे.

मध्यप्रदेशच्या मोरेना गावात ही दुर्घटनाग्रस्त विमानं पडली. सुखोई-३०( sukhoi -30) आणि मिराज(miraj fighter plane) या दोन्ही विमानांमध्ये एकाच वेळी तांत्रिक दोष असणे अशक्य असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत; शिवाय असेही म्हटले जात आहे की, एखादी हवाई कवायत करताना दोघांमध्ये गोंधळ होऊन आपसात टक्कर झाल्याची शक्यताही तपासली जात आहे. ब्लॅक बॉक्सवरूनच क्रॅशचे नेमके कारण कळणार असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

भारतीय सैन्य जगात तिसऱ्या क्रमांकावरचं शक्तिशाली सैन्य आहे. भारतीय सैन्याचा अभिमान म्हणून भारतीय वायुसेनेकडे पाहिलं जातं. चीन, अमेरिका आणि रशियाच्या तोडीस तोड या वायुदलाच्या (Air Force) क्षमता असल्याचं मानलं जातं. अनेक वेळा अपघातग्रस्त होणारी भारतीय वायुसेनेची लढाऊ विमानं मात्र आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतात.

दोनच दिवसांपूर्वी प्रजासत्ताकदिनाची परेड पार पडली. या परेडमध्ये भारतीय वायुसेनेनं हवाई कवायतींचं आणि आपल्या क्षमताचं प्रदर्शन केलं. मात्र परेडनंतर दोनच दिवसांनी सुखोई-३० (sukhoi 30) आणि मिराज विमाने दुर्घटनाग्रस्त ठरली. हा अपघात भारतीय वायुदलाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. या दोन्ही विमानांना भारताची ताकद म्हटले जाते. जेव्हा जेव्हा वायुसेनेने मोहिमा आखल्या, तेव्हा तेव्हा या दोन्ही विमानांना निश्चितपणे कारवाईत समाविष्ट करण्यात आले आहे.

मिराज-२०००

मिराज-२००० दीर्घकाळापासून भारतीय हवाई दलाचा अविभाज्य भाग आहे. मिराज- २००० जेट फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने बनवले आहे. हीच कंपनी राफेल लढाऊ विमानेदेखील बनवते, जी आता भारतीय हवाई दलात सामील झाली आहेत. मिराजची शक्ती म्हणजे ते १००० किलो लेझर गाईडेड बॉम्ब टाकू शकते.

पुलवामा हल्याचा बदला घेणारे मिराज-२०००

पुलवामा हल्ल्यानंतर PoK स्थित दहशतवाद्यांचा विध्वंस करण्याची मोहीम भारतीय सैन्याने आखली होती. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील बालाकोटवर मध्यरात्री हल्ला चढवला. तेव्हा भारतीय वायुसेनेने तिसऱ्या पिढीतील ‘जुने’ लढाऊ विमान मिराज- २००० चा वापर केला. हे ऐकून लोकांना धक्का बसला. भारताकडे तर अधिक प्रगत सुखोई एसयू- ३० एमकेआयही होते. मात्र हवाई दलाने अत्यंत सावधगिरीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मिराजच्या अद्भुत क्षमतेवर हवाई दलाचा पूर्ण प्रचंड विश्वास होता.

बालाकोटच्या वेळी भारतीय हवाई दलाला पाकिस्तानच्या रडारला चकवा द्यायचा होता. त्यामुळेच सुखोई रडावर डिटेक्ट होत असल्याने त्यांनी मिरजची निवड केली. अलीकडच्या काळात मिराज-२००० विमान अपग्रेड करण्याबाबत बरीच चर्चा झाली; पण दुर्दैवाने काम रखडले आहे. २.५ अब्ज डॉलरच्या योजने अंतर्गत, फ्रेंच कंपनी तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या मदतीने फ्रान्समध्ये २ जेट आणि उर्वरित बेंगळुरूमध्ये अपग्रेड केली जाणार आहेत. त्यात नवीन तंत्रज्ञान बसवावे लागेल. खरे म्हणजे वर्षभरापूर्वीच ते व्हायला हवे होते; पण अजूनपर्यंत होऊ शकले नाही.

कारगिल युद्धातही मिराजने पूर्ण ताकदीने पाकिस्तानचे मनसुबे उद्ध्वस्त केले होते.

रशिया-युक्रेन युद्धामुळे सुखोईचे अपग्रेडेशनही थांबले…

मोरेना येथे पडलेले दुसरे एसयू- ३० एमकेआय विमानदेखील दलाला अपग्रेड करायचे आहे. सुखोई फायटर जेट रशियन कंपनीने बनवले आहे. ते जवळपास २० वर्षांपासून भारतीय वायुसेनेच्या सेवेत आहे.

भारताने रशियन बनावटीचे सुखोई ३० हे लढाऊ विमान २००२ ला घेतले होते. सुखोई विमानामुळे भारताची शक्ती कितीतरी पटीने वाढली आहे. सध्या सुखोई ३० एमकेआय हे भारताचे सगळ्यात घातक लढाऊ विमान आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यामुळे अपग्रेड करण्यास विलंब झाला. अलीकडेच अशी बातमी आली होती की, हवाई दल सुखोईला अधिक शक्तिशाली रडार आणि लढाऊ क्षमतेने सुसज्ज करू इच्छित आहे. हे मेड इन इंडिया मोहिमे अंतर्गत केले जाणार आहे आणि त्यामुळे थोडा विलंब झाला आहे. आयातीऐवजी भारतीय संरक्षण उत्पादनांना महत्त्व दिले जावे, अशी सरकारची इच्छा आहे.

गेल्या काही काळात भारतीय वायुदलाच्या विमानांच्या अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनच्या सीमेजवळील अरुणाचल प्रदेशमध्ये वायु दलाचं हेलिकॉप्टर कोसळून ५ सैनिक ठार झाले होते.

तर डिसेंबर २०२१ मध्ये तामिळनाडूमध्ये झालेल्या एका हेलिकॉप्टर अपघातात भारताचे संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत मृत्यूमुखी पडले होते. या अपघातात त्यांच्यासह १२ जणांना आपल्या प्राणास मुकावं लागलं होतं.

फायटर पायलट लगेच तयार होत नाही. फायटर पायलट होण्यासाठी बराच मोठा काळ कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते. कठोर परिश्रम करावे लागतात. प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते कि आपण पण फायटर पायलट व्हावे. परंतु काही लाख परीक्षार्थीमधून काही हजार UPSC ची परीक्षा पास होतात… त्या हजारातले काही शेकडा सैन्यासाठी निवडले जातात… त्यातून काही निवडक उमेदवारांची वायुदलासाठी निवड होते… हाताच्या बोटांवर मोजण्या इतके उमेदवार वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी निवडले जातात… त्यातले देखील प्रशिक्षणाच्या दरम्यान काही उमेदवार गळतात… प्रशिक्षण पूर्ण करून लढाऊ विमानांचे वैमानिक हे किती मोजके असतील याचा आपण विचार करू शकता… या अतिशय अवघड प्रक्रियेवरून आपल्या लक्षात आलेच असेल एक फायटर पायलट गमावणे म्हणजे राष्ट्राची केवढी अपरिमित हानी असते…

भारतीय सैनिक हा केवळ पगाराला महत्त्व देत नसून देशाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले गुण तो जोपासत असतो… भारतातील प्रत्येक सैनिक आपल्या मातृभूमीला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आणि प्राणापेक्षा प्रिय मानतो… तो जन्मभूमीला मातृभूमी म्हणजे मातेसमान मानतो किंबहुना तिच्यापेक्षा काकणभर श्रेष्ठच… मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी तो प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान देण्यास अजिबात कचरत नाही…

असे आमचे शूर फायटर पायलट हकनाक मुत्यूमुखी पडणे अत्यंत खेदजनक आणि वेदनादायक आहे… म्हणूनच वायुसेनेने आणि प्रशासनाने या अपघातांची योग्य ती दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे असे जनतेला मनोमन वाटते…

“War is not only a matter of equipment, artillery, group troops or air force; it is largely a matter of spirit, or morale.”

Back to top button