NewsScience and Technology

शास्त्रज्ञ ५
लखलखीत पुरावनस्पतीशास्त्रज्ञ आर लखनपाल

२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…

पृथ्वीच्या अस्तित्त्वाच्या वेगवेगळ्या कालखंडातील वनस्पतींच्या अभ्यासातून भारतीय उपखंड, दक्षिणपूर्व आशिया व उत्तर आफ्रिका यांचा पुरातन काळापासूनचा परस्पर संबंध सिद्ध करणारे प्रख्यात पुरावनस्पतीतजा म्हणून प्रसिद्ध असलेले प्रा. लखनपाल हे ज्ञानाच्या अन्य क्षेत्रांतील त्यांचे योगदानही खूपच मोलाचे आहे.

अनेक शतक अनेक आघाडीच्या शास्त्रज्ञांनी आपल्यासमोर फक्त वैज्ञानिक सत्य मांडण्याचंच काम केलेलं नाही, तर ते ज्या विज्ञानाचं आचरण करतात त्याला एक प्रतिष्ठा आणि झळाळी प्राप्त करून दिली. प्रा. राजेंद्रनाथ लखनपाल( rajendra nath lakhanpal) हे अशा शास्त्रज्ञांपैकी होते. त्यांनी जगप्रसिद्ध पुरावनस्पतीशास्त्रज्ञ बिरबल सहानींसारख्या आपल्या पूर्वसुरींच्या पावलावर पाऊल ठेवत या मार्गावर वाटचाल केली. लखनपाल हे ही पुरावनस्पतीतज्ज्ञ होते (Cenophytic Paleobotany & Palaeoecology) आणि परागकणांच्या सूक्ष्म जीवाश्मांच्या साह्याने वनस्पतींची ओळख पटवण्यात त्यांचा हातखंडा होता.

लखनपाल यांचा जन्म ५ ऑगस्ट १९२३ रोजी झाला आणि लखनौ विद्यापीठातून १९४४ मध्ये त्यांनी वनस्पतीशास्त्रात स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली. नंतर, त्यांनी संशोधन सहाय्यक म्हणून प्रा. बिरबल सहानींसोबत काम करण्यास सुरुवात केली आणि लखनौ विद्यापीठातून पुरावनस्पतीशास्त्रात संशोधनही सुरू केले. भूगर्भीय कालमानपनाच्या सीएसआयआरने सुरू केलेल्या एका प्रकल्पावर १९४७ मध्ये त्यांची निवड झाली. पुढे १९४९ मध्ये जेव्हा पुरावनस्पती संस्थेची (institute of palaeobotany) स्थापना झाली तेव्हा त्यांनी तृतियांश वनस्पती जीवाश्म आणि लवण पट्ट्यातील सूक्ष्म जीवाश्मांवर लक्ष केंद्रित केले. १९५२ मध्ये त्यांना लखनौ विद्यापीठातून पीएचडी पदवी मिळाली आणि ते युनेस्को पाठ्यवृत्ती मिळवून अमेरिकेत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये आर डब्ल्यू चेनी यांच्यासोबत ओरेगॉन प्रांतातील विशेष जीवाश्मांचा अभ्यास करण्यासाठी रवाना झाले.

अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, बेल्जियम आणि नेदरलँडस् मधील पुरावनस्पतीशास्त्राच्या अभ्यासाच्या विविध केंद्रांना भेटी देऊन ते बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी या आपल्या संस्थेतील कामावर रुजू झाले. या संस्थेतील कामामध्ये त्यांनी प्रामुख्याने पुरापरिस्थितिकी (पॅलिओइकॉलॉजी), पुरावनस्पतीशास्त्र (पॅलिओबॉटनी) आणि पुरापरागशास्त्र (पॅलिनॉलॉजी) या तीन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले. आसाममध्ये त्यांनी शोधून काढलेल्या निपा सहानी या पाम वर्गातील फळामुळे जवळपास पाच दशलक्ष वर्षांपूर्वीच्या मायोसीन काळात बंगालचा उपसागर बराच आतपर्यंत पसरलेला होता, हे सिद्ध झाले. पृथ्वीवर होऊन गेलेल्या वेगवेगळ्या काळातील पुरावनस्पतींचा अभ्यास त्यांनी केला आणि त्यातील काही वनस्पतींचे अवशेष दख्खनच्या खडकांमध्येही मिळतात हे दाखवून दिले.

लखनपाल यांनी भारतीय तृतियांश वनस्पतींचे परीक्षण केले आणि त्याचे दक्षिणपूर्व आशिया व उत्तर आफ्रिकेच्या पुराभुशाखाच्या अनुशंगाने अर्थ काय होतात याचे विवेचन केले. उष्ण कटिबंधात वनस्पतींच्या प्रसाराचे मुख्य साधन पाणी हेच होते, हे त्यांनी आपल्या अभ्यासातून राहतील. निर्विवादपणे दाखवून दिले. पुरावनस्पतीशास्त्राचा त्यांचा अभ्यास प्रामुख्याने पुरापरागशास्त्रावर आधारित होता. या अभ्यासातून त्यांनी पृथ्वीच्या इतिहासाच्या मिओसीन कालखंडात समशीतोष्ण हिमालयीन वनस्पती आढळून येत असल्याचे प्रतिपादन केले. अँटिक्विटी ऑफ अँजिओस्पर्म्स (१९७९) हे पुस्तक त्यांनी लिहिले, तर कॅटलॉग ऑफ इंडियन फॉसिल प्लान्टस् (१९७५) या पुस्तकाचे ते सहलेखक होते. त्याशिवाय बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनीचे उपसंचालक, सहसंचालक, अध्यक्ष (१९८३) डिस्टिंग्विश्ड सायन्टिस्ट (१९८४) आणि इमेरिटस सायन्टिस्ट (१९८४-८८) आदी पदे भूषविण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. १९७५ मध्ये बाराव्या आंतरराष्ट्रीय बॉटनिकल काँग्रेसचे विशेष पदक, १९८३ मध्ये जे सेन स्मृती व्याख्यान आणि १९९१ मध्ये इंडियन बॉटनिकल सोसायटीचे बिरबल सहानी पदक असे सन्मानही त्यांना प्राप्त झाले.

अज्ञाताबद्दल अदम्य कुतुहल आणि साहसाची प्रचंड ओढ हे त्यांचे विशेष होते. त्यातूनच त्यांनी १९६० मध्ये पूर्व हिमालयातील भारत- जपान संयुक्त मोहिमेचे नेतृत्त्वही केले. अखंडता, वस्तुनिष्ठता आणि नैतिक मूल्यांच्या जोपासनेकरिता त्यांनी सोसायटी फॉर सायंटिफिक व्हॅल्यूज या नावाची संस्थाही सुरू केली होती.

लखनपाल यांचा स्वभाव चांगल्या कार्याला सढळ हाताने मदत करण्याचा होता. मानवता आणि फक्त वनस्पतीशास्त्र आणि पुरावनस्पतीशास्त्रच नव्हे तर, त्याच्याशी संबंधित अन्य क्षेत्रे व एकूणच ज्ञानाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल ते कायम स्मरणात राहतील.

लेखक :- डॉ. बी के त्यागी

(डॉ. बी के त्यागी हे विज्ञान प्रसार मधील वरिष्ठ वैज्ञानिक असून ज्येष्ठ विज्ञान संवादक व् लोकप्रिय विज्ञान लेखक आहेत.)

(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)

Back to top button