NewsScience and Technology

शास्त्रज्ञ १०
सृजनशील रसायनशास्त्रज्ञ बी सी सुब्बराव

२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…

रसायनशास्त्राचे अध्यापन, नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी गौरवावे असे मुलभूत संशोधन, औद्योगिक रसायनशास्त्रातील अनेक विषयांतले संशोधन, देशाच्या उपयोगी पडेल असे अगदी सर्वसामान्यांच्या उपयोगाचे संशोधन आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे अनेक वर्षे भूषविलेले मुख्य वैज्ञानिकाचे पद अशी भरभक्कम कामगिरी असलेले डॉ. सुब्बराव (b c subba rao) यांचा गौरव सर्जनशील रसायनशास्त्रज्ञ म्हणून केला जात असे.

बोरॉन रसायनशास्त्रातील अभिनव संशोधनासाठीचा नोबेल पुरस्कार स्विकारताना १९७९ मध्ये प्रा. हर्बट सी ब्राउन यांनी पर्ड्यू विद्यापीठातून त्यांच्या हाताखाली पीएचडी मिळविणाऱ्या दोन भारतीय संशोधकांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. त्यातील एक डॉ. बी सी सुब्बराव आणि दुसरे प्रा. सीएनआर राव. प्रा. ब्राउन म्हणाले, ‘माझे सहकर्मी डॉ. बीसी सुब्बराव अल्युमिनियम क्लोराइड युक्त डायग्लिममुळे (उच्च उत्कलनांक असलेले इथर) सोडियम बोरॉनहायड्राइड च्या घटत्या वैशिट्यांचा अभ्यास करीत होते. अशा ऑरगॅनो बोरोनेटच्या प्रयोगशाळेतील अल्कलाइन हायड्रोजन पेरॉक्साइडच्या साह्याने केल्या जाणाऱ्या ऑक्सिडीकरणामुळे ऑरगॅनो बोरेनची रचना असलेली अल्कोहोल्स तयार होतात, हे त्यांनी सिद्ध केले. माझ्यासोबत पाच वर्षे संशोधन केल्यानंतर ते भारतात परतले.’

पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमधले (एनसीएल) माजी वैज्ञानिक प्रा. सुब्बराव यांचा जन्म ८ डिसेंबर १९२३ रोजी मैसुर येथे झाला. त्यांनी सातत्याने उच्च गुणवत्ता दर्शवीत मैसुर विद्यापीठातून एमएससीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर मैसुर विद्यापीठ, बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISC) आणि आयआयटी खरगपूर येथे काही काळ अध्यपनाचे काम केल्यानंतर ते १९५२ मध्ये डॉ. ब्राउन यांच्या हाताखाली पीएचडीचा अभ्यास करण्याकरिता ते अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात गेले आणि १९५८ मध्ये भारतात परतले. डॉ. सुब्बराव यांनी काजुगर तेलाचे औद्योगिक उपयोग, टर्पीन्स यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक विषयांवरही मोलाचे संशोधन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या हायको प्रॉडक्टस् या संस्थेचे संशोधन संचालक म्हणून कोलाइडस्, इमल्शन्स आणि सर्फेक्टन्टस् यांवर संशोधन केले. १९६७ मध्ये त्यांनी हिंदुस्थान लिव्हरच्या रसायन विभागात काम करण्यास सुरुवात केली. बोरॉन केमेस्ट्री, सर्फेक्टन्टस्, टर्पेनॉइडस्, तेले, चरबी, साबण व डिटर्जंट, सुवासिक रसायने यांवरील संशोधनासाठी ते रसायन उद्योगात ओळखले जातात.

१९७५ मध्ये बंगळुरूच्या इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली. भारतरत्न प्रा. सीएनआर राव डॉ. सुब्बराव यांचा ‘खूप चांगला मित्र’ म्हणून उल्लेख करीत. ते त्यांना सर्जनशील रसायनशास्त्रज्ञ आणि लोकांत सहजपणे मिळून मिसळून जाणारा म्हणूनही त्यांचा गौरव करीत. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे मुख्य वैज्ञानिक म्हणून सुब्बराव यांनी अनेक वर्षे काम केले. मैसूर येथे ९ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांचे देहावसान झाले.

लेखक :- प्रा. ए रामचंद्रैय्या

(प्रा. ए. रामचंद्रैय्या हे वरंगळ एनआयटीमध्ये प्राध्यापक असून विज्ञान प्रसारच्या स्कोप इन तेलुगु या प्रकल्पाचे समन्वयक आहेत.)

(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)

Back to top button