News

हिंदू समाज आणि डॉ. बाबासाहेब

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (babasaheb ambedkar) हे लोकशाही आणि सांविधानिक मार्गांवर शंभर टक्के विश्वास असलेले नेते आहेत. भारतातील प्रत्येक हिंदूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे, कारण त्यांनी एकेश्वरवादी पंथ नाकारले व पंथाच्या आधारे देशाचे तुकडे होणे टाळले. ते हिंदूविरोधी नसून हिंदुहितवादी होते. सामाजिक लोकशाहीचा पाया भक्कम असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्त ‘हिंदू समाज व डॉ. बाबासाहेब’ या विचारांवर प्रकाश टाकणारा लेख.
 
आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये भारतरत्न (bharatratna) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अद्वितीय योगदान आहे. संपूर्ण सामाजिक ऐक्य, सर्व घटकांचे शांततामय सहअस्तित्व आणि सुविहित शासनपद्धती यांच्या बळावरच कुठलेही राष्ट्र उभारी घेते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण चिंतन आणि त्यांचे जीवनकार्य यामधून समतायुक्त-शोषणमुक्त आणि निर्दोष समाज व मजबूत राष्ट्रउभारणी याचेच स्पष्ट मार्गदर्शन दिसते.

त्यांचे जीवनकार्य अथांग आहे. त्यात अनेकविध पैलू आहेत. त्यातील महत्त्वाच्या केवळ काही बिंदूंबद्दल इथे आपण चर्चा करू.
भारतात सांस्कृतिक एकात्मता आहे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठामपणे संगितले. भारत सांस्कृतिकदृष्ट्या एक ‘राष्ट्र’ असल्याची संकल्पना खूप प्राचीन काळापासून आहे. सांस्कृतिक एकत्वाची भावना भारताच्या अंतरंगातून प्रवाहित होत होती. डॉ. आंबेडकरांनी हे सांस्कृतिक ऐक्य नेमकेपणाने अधोरेखित केले आहे –
 

I venture to say that there is no country that can rival the Indian Peninsula with respect to the unity of its culture. It has not only a geographic unity, but it has over and above all a deeper and a much more fundamental unity – the indubitable cultural unity that covers the land from end to end.
 
 या त्यांच्या अत्यंत स्पष्ट दृष्टीकोनाने देशाचे अखंडत्व अबाधित ठेवता येते. याचे एक मोठे उदाहरण म्हणजे 2001मधील दरबान येथील झालेली जागतिक वंशवादविरोधी परिषद. ‘ब्रेकिंग इंडिया’ अर्थात भारताचे तुकडे करू इच्छिणार्‍या गँगने या परिषदेत भारतातील जातिभेदाना वंशभेद म्हणून मांडायचे ठरवले. ‘बाहेरून आलेल्या’ आक्रमकांनी ‘मूलनिवासी’ नागरिकांवर वर्णभेदातून अत्याचार केले अशी मांडणी केल्यानंतर स्वाभाविकच संयुक्त राष्ट्रसंघाला हस्तक्षेप करून वंशवादाविरोधी कारवाईचा अधिकार प्राप्त होतो – सैन्यदेखील पाठवता येते. आपल्या सुदैवाने तेव्हाच्या अटलजी सरकारचे जे प्रतिनिधी तिथे गेले होते (ओमर अब्दुल्ला), त्यांनी त्यास विरोध केला तो बाबासाहेबांच्या विचारांच्या आधारेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानववंशशास्त्रज्ञ (Anthropologist) होते. त्यांनी सबळ पुराव्यानिशी ‘आर्य आक्रमण सिद्धान्त’ खोटा आहे हे सप्रमाण सिद्ध केले.
 
 Annihilation of Caste (1936)मध्ये ते लिहितात – As a matter of fact, the caste system came into being long after the different races of India had co-mingled in blood and culture. To hold that distinctions of Caste ate really distinction of race and to treat different Castes are though they were so many different races is a gross perversion of facts. Caste system does not demarcate racial division. Caste system is a social division of people of the same race.
 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे संशोधन देशाच्या अखंडतेला वरदान आहे. आर्य-द्रविड संघर्ष व त्यातून पुढे मूळनिवासी आणि आक्रमक असा एक मोठा संघर्ष भारतात अत्यंत चलाखीने उभा केला गेला. त्याचे टोक गाठताना पुढे त्यातून भारतातील जातिभेद हे वंशभेद-वर्णद्वेष आहेत असे मांडायचे, त्यातून ईस्ट तिमोरसारखा संयुक्त राष्ट्रसंघाचा हस्तक्षेप मागायचा आणि अंतिमत: देशाचे तुकडे करायचे, अशी सगळी साखळी मुळातच तोडता येते, कारण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शास्त्रीय दृष्टीकोन व एकात्म समाजाविषयीचे ठाम मत!
 
ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांच्या मांडणीनुसार डॉ. आंबेडकरांच्या चळवळीच्या तीन टप्प्यांचा अभ्यास करायला हवा. पहिल्या टप्प्यात (1920 ते 35) ते हिंदू धर्मात घुसलेल्या विकृतींचा विरोध करताना दिसतात. त्या वेळी त्यांनी हिंदुमात्रांच्या हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. 1930पूर्वीच्या एका भाषणात ‘हिंदूंना शुद्धीची नव्हे, तर संघटनेची गरज आहे’ असे मत मांडले आहे. ‘मला सुधारक हिंदू म्हणायलादेखील हरकत नाही’ असे ते म्हणत.
 

महाड आणि नाशिकचे सत्याग्रह याच काळातील. हिंदूंच्या कुप्रथा दूर होऊन अस्पृश्यता आणि जातिभेदासारख्या वाईट गोष्टी धर्मातून दूर जातील, याची त्यांना या काळात प्रतीक्षा होती. परंतु तत्कालीन धर्मधुरिणांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर दुसरा टप्पा येतो तो 1935मध्ये येवल्याला ऐतिहासिक घोषणा केली त्यापासूनचा. “हिंदू म्हणून जन्मलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही” अशी घोषणा केली. प्रत्यक्षात पुढे आणखी 21 वर्षे तथाकथित स्पृश्य हिंदूंना धर्माचरणात सुधारणा करण्याची संधीही दिली. पण आता चळवळीची दिशा राजकीय जागृतीसाठी आणि वंचितांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सांविधानिक मार्गाने लढे उभारण्याची राहिली.
 
तिसर्‍या टप्प्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तनाच्या नेतृत्वाबरोबरच नवभारताच्या निर्मितीच्या राष्ट्रीय नायकाच्या रूपात आपल्याला दिसतात. ते भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. या काळातील त्यांची भाषणे पाहिली, तर आपसातील मतभेद विसरून देशाला महान बनवण्याची चिंता करणारे डॉ. बाबासाहेब आपल्याला दिसतात. लोकशाही आणि सांविधानिक मार्गाने देशापुढच्या सर्व प्रश्नांना उत्तरे शोधण्याची दिशा या काळात त्यांनी सर्वांना दिली.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत विचारपूर्वक ज्याची मुळे भारतीय आहेत अशा बुद्ध धम्माचा स्वीकार केला. सेमेटिक (एकेश्वरवादी) पंथांना नाकारताना त्यांनी त्यांचाही समग्र अभ्यास केला. हे पुन्हा भारताच्या सांस्कृतिक ऐक्याला मजबूत करणारे पाऊलच आहे.
 
आज जिथे जिथे हिंदूंचे बळजबरीने किंवा प्रलोभन देऊन सेमेटिक पंथांत मतांतरण केले जाते आणि त्यामुळे लोकसंख्येचे प्रमाण जेव्हा बदलते, त्या त्या वेळी त्या भागात किती आणि काय गंभीर समस्या उद्भवतात हे आपण अनुभवतोच. भारतातील प्रत्येक हिंदूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे, कारण त्यांनी एकेश्वरवादी पंथ नाकारले व पंथाच्या आधारे देशाचे तुकडे होणे टाळले.
 
डॉ. आंबेडकरांवर राज्यसभेच्या सचिवालयाने 1991मध्ये संपादित केलेल्या Dr. B.R. Ambedkar – The Man and His Message या पुस्तकात भारतरत्न अटलजींचा एक लेख आहे. त्यात ते बाबासाहेबांचे वाक्य उद्धृत करतात. ‘मैने एक बार अस्पृश्यता के प्रश्न पर गांधीजी से चर्चा करते हुए कहा था कि अस्पृश्यता के सवाल पर भले ही मेरे आपके साथ मतभेद हो, जब समय आयेगा तो मै देश को कमसे कम क्षती पहुंचाने वाला मार्ग स्वीकार करूंगा. आज बौद्ध धम्म स्वीकार करके मै देश का अधिक से अधिक हित साधन कर रहा हूं. कारण यह है की बौद्ध धम्म भारतीय संस्कृती का ही एक भाग है. इस देश की संस्कृती, इतिहास तथा परंपरा को कोई आघात ना लगे, यह सावधानी मैने बरती है।’ यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही, इतका स्पष्ट हा संदेश आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाही आणि सांविधानिक मार्गांवर शंभर टक्के विश्वास असलेले नेते आहेत. प्रत्येक समस्या आणि पेचप्रसंग यावर लोकशाही आणि सांविधानिक मार्गानेच उत्तरे शोधली पाहिजेत, याबद्दल त्यांचा आग्रह आहे.
 
सर्वांनी ही पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातीय विषमतेचे भयंकर चटके सहन करायला लागले आहेत आणि तरीही त्यांनी कधीही हिंसेचे समर्थन केलेले नाही. लहानपणी सातार्‍याला बैलगाडीतून जाताना खाली उतरावे लागल्याचा प्रसंग असेल किंवा मग अगदी परदेशातून शिकून आल्यावर बडोद्यात सहन करावे लागलेले जातीय अपमान असतील, त्यांना तत्कालीन जातिभेदाचा भयंकर त्रास सहन करावा लागलेला आहे.
 
काळाराम मंदिर सत्याग्रहात दगडफेक झाली. त्या वेळी त्यांचे अनुयायी तगडा प्रतिकार करू शकत होते, पण डॉ. आंबेडकरांनी त्यांना थांबवले. याचे कारण हिंसा हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग असू शकत नाही, तर लोकशाही मार्गांनी लढे उभारले पाहिजेत, यावर त्यांचा दृढ विश्वास होता.
 


महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाणी पिण्याच्या हक्कासाठीचा नव्हता किंवा तो कुठल्यातरी गोष्टींच्या किंवा कुणाच्यातरी ‘विरोधात’ नव्हता. महाड नगरपालिकेने ठराव करून तलाव सर्वांसाठी खुला केला होता, म्हणून आपले हक्क मिळवण्याचा एक कायदेशीर प्रयत्न म्हणजे हा लढा होता. डॉ. आंबेडकरांनी स्वत: तिथे संगितले होते की “याला दलित विरुद्ध सवर्ण हिंदू असे स्वरूप देऊ नका, तर हा अस्पृश्यता मानणारे व नाकारणारे यांच्यातील संघर्ष आहे!” याच वेळी ‘ब्राह्मणांचे सहकार्य न घेण्याची’ अट टाकून देऊ केलेला ब्राह्मणेतर पार्टीचा पाठिंबा नाकारताना डॉ. आंबेडकरांनी दिलेले स्पष्टीकरण त्यांचे सामाजिक द्रष्टेपण अधोरेखित करते.
 
या पार्श्वभूमीवर आजकालचे अतिडावे आणि स्वयंघोषित बंडखोर येता-जाता हिंसक आंदोलने करतात, त्यांनी डॉ. बाबासाहेब वाचले पाहिजेत. ‘तुकडे तुकडे गँग’च्या हिंसेच्या आणि देश तोडण्याच्या प्रयत्नांना डॉ. बाबासाहेबांच्या संपूर्ण सांविधानिक मार्गांनी रोखता येते.
 

डॉ. आंबेडकरांची इस्लामबद्दल परखड आणि स्पष्ट मते होती. यादवी युद्ध आणि त्याबरोबर होणारे हत्याकांड टाळायचे असेल, तर ‘लोकसंख्येच्या अदलाबदलीचा (exchange of population) सिद्धान्त त्यांनी सांगितला होता. “पाकिस्तानमध्ये पेचात सापडलेल्या दलित समाजाने सापडेल त्या मार्गाने व साधनाने हिंदुस्थानात यावे, असे मी सांगू इच्छितो. दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे की पाकिस्तान किंवा निजामाचे हैदराबाद संस्थान यांच्यावर विश्वास ठेवल्याने दलित समाजाचा घात होईल.” या शब्दांत त्यांनी बजावले होते. आज भारताबाहेरील देशांतील गैरमुस्लीम अल्पसंख्याकांची स्थिती पाहता डॉ. आंबेडकरांची या विषयातील धोरणे किती दूरदर्शी होती, याची खात्री पटते.
 
“Pakistan or the partition of India’ (1940मध्ये प्रथम प्रकाशित) यात ते लिहितात – “Hinduism is said to divide people and in contrast, Islam is said to bind people together. This is only a half-truth. For Islam divides as inexorably as it binds. The brotherhood of Islam is not the universal brotherhood of man. It is a brotherhood of Muslims for Muslims only. There is a fraternity, but its benefit is confined to those within that corporation. For those who are outside the corporation, there is nothing but contempt and enmity.’
 

इस्लामच्या अनुयायांची त्यांच्या त्यांच्या देशाविषयी आणि इस्लामविषयी निष्ठा यावर ते लिहितात — Among the tenet, one that calls for notice is the tenet of Islam which says that in a country which is not under Muslim rule, wherever there is a conflict between Muslim law and the law of the land, the former must prevail over the latter, and Muslim will be justified in obeying the Muslim law and defying the law of the land.
 

स्वातंत्र्य-समता-बंधुता ही तत्त्वत्रयी आपल्याला देताना त्याची मुळे भारतीय आहेत, हे त्यांनी आवर्जून संगितले. त्यातही त्यांनी बंधुतेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. “माझ्या तत्त्वज्ञानात बंधुतेला सर्वोच्च स्थान आहे. संकुचितपणा हा मनातून जायला हवा. त्यासाठी बंधुत्वभाव जागृत होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.” याविषयात कायद्यांची, निर्बंधांची आवश्यकता आहेच, पण त्या सर्वांपेक्षा बंधुभावना महत्त्वाची याला त्यांनी अधिक महत्त्व दिलेले आहे. साम्यवादाविषयीदेखील डॉ. आंबेडकरांचे विचार असेच सुस्पष्ट आहेत. त्यांचे प्रसिद्ध पुस्तक”Buddha or Karl Marx’ प्रत्येकाने वाचले पाहिजे. BBCला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, I claim that Buddhism is a complete answer to Marx and his Communism! आज भारतात ‘जयभीम-लाल सलाम’च्या घोषणा दिल्या जाताहेत. या काळात हे जगासमोर आणण्याची गरज आहे. कम्युनिस्ट मंडळींना धर्माची गरज वाटत नाही. धर्माच्या संकल्पनेवरही साम्यवाद्यांचा विश्वास नाही. बाबासाहेबांना मात्र धर्म अत्यावश्यक वाटतो.

Some people think that religion is not essential to society. I do not hold this view. I consider the foundation of religion to be essential to the life and practices of a society.
 
भारताच्या आर्थिक अवनतीची कारणे शोधताना डॉ. आंबेडकरांतील अर्थशास्त्रज्ञ ब्रिटिशांचे शोषण भारताच्या आर्थिक अवनतीचे कारण असल्याचे स्पष्टपणे सांगतात. पुढे रिझर्व्ह बँकेची संकल्पना प्रत्यक्षात आली, त्यामागेही त्यांचेच मार्गदर्शन आणि प्रयत्न होते, हे सर्वविदित आहेच.
 
राजकीय एकात्म भारताची निर्मिती हे माझ्या मते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक महान कार्य आहे. आपल्या देशातील भाषा, रितीरिवाज, सणवार अशा असंख्य गोष्टींत वैविध्य होते-आहे. या विविधता टिकवून ठेवत राजकीय भारत एक ठेवणे – म्हणजेच राज्यकर्ते आणि लोक यांना सर्वसमावेशक आणि सर्वमान्य व्यवस्थेने एकत्र जोडणे – हे मोठे अवघड काम होते. भारतीय राज्यघटनेच्या रूपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही अत्यंत आदर्श आणि चोख व्यवस्था आपल्याला दिली आहे. ‘एक देश – एक नागरिकत्व’ ही संकल्पना त्यांनी राबवली. याचबरोबर केंद्रीय व्यवस्था – उदा., सर्वोच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक, पोस्ट, रेल्वे, केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था यांना याच दृष्टीने केंद्रीय रचनेत ठेवले. राज्यांना अमर्याद अधिकार दिले नाहीत. अर्थात राज्यांच्या सूचीतील विषय निश्चित करून त्याचे अधिकार राज्यांकडे दिले, पण त्यातदेखील केंद्राला हस्तक्षेपाचे अधिकार ठेवले. एक सार्वभौम राष्ट्र आणि राज्यव्यवस्था उभारणीसाठी या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, त्याची प्रचिती आपल्याला वारंवार येत असते.
 
शेवटी भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या 25 नोव्हेंबर 1949 संविधान सभेमधील ऐतिहासिक भाषणाकडे आपण वळू. अनेक अर्थांनी ते भाषण अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाची आणि अखंडतेची काळजी करणार्‍या एका महान नेतृत्वाचे आपल्याला त्यातून दर्शन घडते. आपला देश ‘पुन्हा एकदा’ पारतंत्र्यात जाईल का? अशी काळजी भाषणाच्या सुरुवातीलाच ते व्यक्त करतात. असे घडू नये, यासाठी राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीमध्ये रूपांतरित केले पाहिजे, असे ते निक्षून सांगतात. (“Unless we convert the political democracy into Social Democracy, we will fail again.’)
 
यासाठी त्यांनी आपल्याला तीन विशेष गोष्टी सांगितल्या आहेत –
 
आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी केवळ आणि केवळ सांविधानिक मार्गांचाच अवलंब करावा.
 
सनदशीर व सांविधानिक मार्गांनी सामाजिक व राजकीय चळवळी उभारण्याऐवजी सध्या काही जण गोंधळ उडवून देण्याचा मार्ग स्वीकारताना दिसतात. अशा वेळी डॉ. आंबेडकरांची ही शिकवण लक्षात ठेवली पाहिजे.
 
आपले स्वातंत्र्य आणि निष्ठा एका व्यक्तीच्या पायी वाहू नयेत, मग ती कितीही प्रभावी का असेना! यातून व्यक्तिकेंद्री व्यवस्थेकडे आणि हुकूशाहीकडे वाटचाल होते, म्हणून ते टाळले पाहिजे.
 
 केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधानी नसावे. आपण सामाजिक लोकशाहीत त्याचे रूपांतर करायला हवे. सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? सामाजिक लोकशाही म्हणजे अशी जीवनपद्धती, ज्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जगण्याची मूल्ये म्हणून स्वीकारलेली असतील आणि या तीन तत्त्वांना सुटे सुटे पाहता येणार नाही. त्यांची ही एकत्रित अशी तत्त्वत्रयी आहे. बंधुतेशिवाय समता आणि स्वातंत्र्य ही केवळ वरवरची रंगसफेदी ठरेल!
 


I know today we are divided politically, socially and economically. We are a group of warring camps and I may go even to the extent of confessing that I am probably one of the leaders of such a camp. But, Sir, with all this I am quite convinced that given time and circumstances nothing in the world will prevent this country from becoming One! अशा नि:संदिग्ध शब्दांत आपापले राजकीय, सामाजिक मतभेद दूर करून देशाच्या ऐक्यासाठीचे आणि सार्वभौमत्वासाठीचे त्यांचे आवाहन सदैव लक्षात ठेवले पाहिजे.
 
देशाच्या हिताच्या मुद्द्यांवर वेळोवेळी घेतलेल्या भूमिका, देशाला दिलेली सांविधानिक व्यवस्था याचबरोबर येथील सर्वहारा, वंचित उपेक्षित घटकांना वाणी देण्याचे त्यांचे अतुलनीय काम याबद्दल भारताचे सर्व नागरिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सदैव ऋणी राहतील.

लेखक :- डॉ प्रसन्न पाटील

Back to top button