IslamNewsWorld

अमंग द मॉस्क्स : भाग ४

ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास..

बर्मिंगहम (birmingham)

त्यानंतर लेखक आपला मोर्चा बर्मिंगहम या शहराकडे वळवतो. बर्मिंगहममध्ये Boots, Tesco, Sainsbury’s, Aldi असे कुठलेही लोकप्रिय ब्रिटिश ब्रॅण्ड्स आढळत नाहीत. मात्र हलाल मटणाची दुकानं, हिजाब/बुरखे विकणारी दुकानं, इस्लामी पुस्तकं आणि भेटवस्तू विकणारी दुकानं यांची इथे रेलचेल आहे. बिस्मिल्लाह बिल्डिंगमध्ये असलेल्या जमशेद क्लोदिंग हाऊसच्या बाहेर चेहऱ्यापासून पायापर्यंत पूर्ण कपड्यांत झाकून ठेवण्यात आलेले स्त्रियांचे mannequins आहेत. जुनेद जमशेद या वादग्रस्त पाकिस्तानी गायकाच्या नावाने असलेल्या कपड्यांच्या दुकानात ‘शुद्ध इस्लामी’ पद्धतीचे कपडे मिळतात. मदिना गिफ्ट शॉप नावाची दुकानं तर जागोजागी दिसतात. एकोणिसाव्या-विसाव्या शतकातल्या जुन्या घरांचं रूप आता बदललंय. सगळी घरं इस्लामी झाली आहेत. जवळपास प्रत्येक घराच्या अंगणात किंवा खिडकीत ‘या रसूल अल्ला’, ‘माशा अल्ला’, ‘बिस्मिल्ला’ असे फलक लागलेले आढळतात. मक्केच्या काबाचे फोटो तर जवळपास प्रत्येक घराच्या बाहेर टांगलेले किंवा रंगवलेले आढळतात. इथले अनेक तरुण सीरियामध्ये जाऊन आयसिस या इस्लामी अतिरेकी संघटनेत सामील झाले आहेत.

बेलफस्ट, एडिनबर्ग, ग्लास्गो आणि इतरही अनेक महत्वाच्या शहरांमध्ये लेखकाला सर्रास होणाऱ्या इस्लामी लग्ना (निकाह) च्या घटना आढळल्या. ब्रिटनमधील जवळपास प्रत्येक मशिदीत इस्लाममान्य अशा शरिया पद्धतीने लग्ने लावली जातात. परंतु यातील कुठल्याही लग्नाची ब्रिटिश कायद्यान्वये नोंदणी केली जात नाही तर ती फक्त शरिया निकाह म्हणूनच राहतात. या पद्धतीमुळे स्त्रियांना धोका असतो. ब्रिटिश कायद्यान्वये लग्न न झाल्याने भविष्यात लग्न मोडायची वेळ आल्यास पुरुष पोटगी, मुलांच्या संगोपनाचा खर्च अशा कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर प्रक्रियेला बांधील राहत नाही. सरळ तलाक देऊन पुढचं लग्न करण्यास तो मोकळा मोकळा होतो. अशा वेळी अनेकदा स्त्रियांना स्वतःच्या मुलांचा ताबाही मिळत नाही.

कुठल्याही प्रकारच्या कायद्याचा धाक नसल्याने अशा प्रकारची लग्नं करण्याची प्रक्रियाही अतिशय सोपी आहे. मुस्लिम स्त्री-पुरुषांचे पासपोर्टस, मेहर (हुंडा) म्हणून पुरुषाने स्त्रीला काहीएक रक्कम देण्याची तयारी, जन्माला येणारी अपत्यं मुस्लिम म्हणूनच वाढवण्यात येतील अशी खात्री आणि दोन मुस्लिम पुरुष साक्षीदार (स्त्री साक्षीदार चालत नाहीत) आणले की हे निकाह लावले जातात. आणि हे अशा प्रकारचे निकाह करण्याच्या प्रकरणांत अगदी सुशिक्षित लोकांचाही अपवाद नाही. हे सर्रास सगळीकडे, सर्व आर्थिक, सामाजिक स्तरांमध्ये चालतं.

ग्लास्गो (glasgow)

लेखकाला ग्लास्गोमध्ये आलेला एक अनुभव तर ब्रिटिश मुस्लिमांच्या निष्ठा कुठल्या दिशेने आहेत यावर सुस्पष्टपणे प्रकाश टाकतो. ग्लास्गोमध्ये एका मशिदीत लेखकाला मेजर अब्दुल्ला बटल नावाचा एक ब्रिटिश मुस्लिम सैनिक भेटला. त्याने विषण्ण करणारे अनुभव सांगितले. इराक युद्धातून परत आलेल्या ब्रिटिश मुस्लिम सैनिकांवर इथल्या मुस्लिम जनतेने हल्ले केले, त्यांच्या अंगावर थुंकण्यात आलं. कारण एकच की ते मुस्लिम असूनही इराकमधल्या मुस्लिम लोकांशी लढले. मेजर अब्दुल्लाच्या तीन पिढ्या ब्रिटिश सैन्यात आहेत. आणि तरीही तो सैन्यात आहे हे तो ज्या मशिदीत नमाज पढायला येतो तिथे उघडपणे कोणालाही सांगत नाही. कारण त्यांच्या दृष्टीने मुस्लिमांशी लढणारे मुस्लिम सैनिक (ब्रिटिश असले तरी) धर्मद्रोही आहेत.

लंडन (london)

लंडनमध्ये पाहिली मशीद बांधायला परवानगी देऊन, वर त्या मशिदीला भरघोस आर्थिक मदत करण्याचं ‘पुण्यकर्म‘ हे अनेकांना प्रातःस्मरणीय असलेल्या विन्स्टन चर्चिल याच्या नावे आहे. १९४० साली बांधण्यात आलेल्या या मशिदीकडे आखाती देश आणि तिथल्या मुस्लिम लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल यादृष्टीने या घटनेकडे बघितलं गेलं.

लंडन हे ब्रिटनमधलं सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेलं शहर आहे. दुकानं, टॅक्सी, बँका, हॉटेल्स इत्यादी सर्वत्र त्यांचं वर्चस्व आहे. लंडनमध्ये शिया जमातीचंही भरपूर प्रस्थ आहे. मोहरमच्या वेळी काढण्यात आलेल्या मोठ्या मिरवणुकीचं (जलूस) वर्णन करताना लेखकाने त्याला आलेले धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. मोहरमच्या आदल्या दिवसापासून लंडनच्या प्रमुख वस्तीत असलेल्या मोठ्या मशिदीपासून ते मोठ्या रस्त्यापर्यंतचा सगळा परिसर बंद केला जातो. चौकाचौकातून दुसऱ्या दिवशीच्या मोहरमच्या मिरवणुकीचे फलक पोलीस स्वतः लावतात. दुसऱ्या दिवशी कित्येक तास आरडाओरडा करत, गोंधळ घालत ती मिरवणूक चालू असते. त्यात शिया जमातीचा प्रेषित अली च्या मृत्यूनिमित्त शोक व्यक्त केला जातो. पुरुष, लहान मुलं, स्त्रिया स्वतःला जखमा करून घेतात. मिरवणुकीतही स्त्रियांची जागा दुय्यमच असते. स्त्रिया मिरवणुकीच्या शेवटी चालत असतात.

मिरवणूक संपल्यावर लेखक त्या मिरवणुकीच्या मार्गावर असलेल्या अनेक घरांमध्ये जातो आणि तेथील लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. ती मिरवणूक, आरडाओरडा, मारामारी, स्त्रियांना दिली जाणारी वागणूक या सर्वांबद्दल सर्व रहिवाश्यांच्या मनात अतिशय चीड आहे. परंतु त्याविरोधात काहीही करू शकत नसल्याने सगळेजण हतबलही आहेत. नगरपालिका, पोलीस यांच्याकडे या विरोधात तक्रार केली तर तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण मुस्लिमांविरुद्ध काही कारवाई करण्याचा प्रयत्न झाला तर पोलीस आणि प्रशासनावर जातीयवादी आणि इस्लामोफोबिक असल्याचे आरोप होतात. त्यामुळे त्या भीतीने त्यांच्या विरोधात कोणीही काहीही कारवाई करत नाही. “हे लोक आमच्या देशाचा सर्वनाश करणार आहेत!!.” अशी तिथल्या नागरिकांची सार्वत्रिक भावना आहे.

२०१२ मध्ये ब्रिटनमध्ये एक प्रचंड मोठं लैंगिक शोषणाचा प्रकरण (सेक्स स्कॅण्डल) उघडकीस आलं ज्यात २० ते ५० वयोगटतल्या शेकडो पाकिस्तानी पुरुषांनी संपूर्ण इंग्लंडभर १२ ते १८ वर्ष वयोगटातल्या सुमारे एकोणीस हजार मुलींचं वर्षानुवर्षं, वारंवार, सतत लैंगिक शोषण केलं, त्यांना धमक्या दिल्या, मारहाण केली, बलात्कार केले. कैक घटनांमध्ये दुर्दैवी मुली आणि त्यांचे पालक यांनी पोलीस आणि प्रशासनाकडे असंख्य तक्रारी केल्या. परंतु एकही तक्रारीची दखल घेतली गेली नाही. कारण एकच.. “इस्लामोफोबिया( islamophobia) आणि जातीयवादी असण्याचा आरोप होण्याची भीती”. या लैंगिक शोषणाच्या दुर्दैवी प्रकरणात सुमारे १९००० अल्पवयीन ब्रिटिश मुलींवर अत्याचार झाले असा अंदाज आहे.

या लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर अनेक पुस्तकं लिहिली गेली, अनेक चित्रपट आणि माहितीपट प्रदर्शित करण्यात आले.
पुस्तकं
-Just a Child: Sammy Woodhouse
-Broken and Betrayed: Jayne Senior
-Pimped : Samantha Owens
-Girl for Sale: Lara McDonnell
-Three Girls (मिनिसिरीज)
-Betrayed Girls (माहितीपट)

लेखक :- हेरंब ओक

(क्रमशः)

Back to top button