CultureHinduismNewsSpecial Day

जननायक भगवान बिरसा मुंडा..

Bhagwan birsa munda..

स्वातंत्र्यासाठी लढणारा जनजातीय योद्धा,जननायक बिरसा मुंडा यांचा स्मृती दिवस, त्यानिमिताने विनम्र अभिवादन..

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अत्यल्प जीवनकालात स्वयंप्रेरणेने मानवी जीवनाचे अत्युच्च शिखर गाठणारे बिरसा मुंडा यांचा स्मृती दिवस. आद्य जनजाती क्रांतीनायकाची भूमिका बजावत स्वकर्तुत्वाने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अतुलनीय योगदान देणारे भगवान बिरसा मुंडा केवळ जनजातींसाठीच नव्हेत तर समस्त भारतीयांसाठी सदैव संस्मरणीय, प्रेरणादायी आहेत.

पिता सुगना पुर्ति (मुंडा) व माता कर्मी पुर्ति यांचे सुपुत्र बिरसा पुर्ति (मुंडा) यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड मधील खुटी जिल्ह्यातील उलिहातू गावी झाला. हालाखीच्या परिस्थितीतही त्यांचे बालपण जंगलातील वृक्षांच्या सहवासात मातीत मनसोक्त खेळणं, बासरी वाजवणं, विविध वनस्पती गोळा करणं, धनुर्विद्या, नेमबाजीचा सराव करणं यात रममाण होतं.

गरिबी, धर्मांतरण आणि आत्मज्ञान

शिक्षणातील त्यांची रुची आणि गती पाहून शाळेतील जयपाल नाग यांनी पुढील शिक्षणासाठी बिरसाला ‘जर्मन मिशन स्कूल’ येथे पाठवण्याचा सल्ला दिला. त्यासाठी धर्मांतरण सक्तीचे होते. शिक्षणासाठी बिरसा मुंडा हे बिरसा डेविड झाले. येथील चार वर्षांच्या शिक्षण कालखंडात त्यांनी आपल्या लोकांवरील इंग्रजांचा अनन्वित अत्याचार आणि सक्तीचे धर्मांतरण जवळून अनुभवले. याचा प्रचंड तिरस्कार वाटून मिशनरी धर्म, मिशनरी नाव व पर्यायाने मिशनरी शिक्षणाचा त्याग केला आणि ते स्वधर्मात आले. मुंडा यांचा मिशनरींवर विश्वास होता तरी ते त्यांच्यातून बाहेर पडले आणि त्यांनी आपली मिशनरी शाळा सोडली.हा त्यांच्या आयुष्याचा परिवर्तनाचा काळ ठरला, त्यांनी पाहिले “ साहेब एक टोपी (म्हणजेच ब्रिटिश आणि मिशनरी एकच टोपी घालतात).” त्यातून त्यांच्या मनात मिशनरीविरोधी आणि ब्रिटिशविरोधी विचारांची बीजे रुजली गेली.

तत्कालीन प्रसिद्ध वैष्णव आनंद पांडा यांच्या सहवासात त्यांनी हिंदू धर्माची शिकवण आत्मसात केली. गीता, रामायण, महाभारत सारख्या हिंदू धर्मग्रंथांचे वाचन केले. अनेकविध वन्य औषधींची माहिती व त्याचा योग्य प्रयोग यावर अभ्यास केला. स्वधर्म, स्वसंस्कृतीविषयी आत्मीयता वाटून समाजाच्या सर्वतोपरी विकासाच्या दृष्टीने त्यांनी बिरसाईत पंथाची स्थापना केली. या अंतर्गत त्यांनी गावोगाव फिरून परिस्थितीने पिचलेल्या समस्त जनजातीला मानवी मूल्ये, स्वधर्माभिमान, स्वसंस्कृती जोपासना, मातृभूमी प्रेम, भूतदया, आरोग्य, शिक्षण इत्यादींचे महत्त्व पटवण्यासाठी प्रबोधन केले. कॉलरा ,प्लेग यांसारख्या महामारीच्या काळात निस्वार्थ जनसेवा केली.

दरम्यान ब्रिटिश राजवटीचे झारखंड जंगल भागातील अतिक्रमण, अत्याचार तसेच सक्तीच्या धर्मांतरणासाठी मिशनऱ्यांचा प्रादुर्भाव व्यापक प्रमाणावर जोर धरू लागला होता. १८८२ मध्ये ‘भारतीय जंगल अधिनियम कायदा’ करून त्याचा गैरवापर सुरू केला. जनजातींवर कराची सक्ती करून त्यांना त्यासाठी कर्जबाजारी केले. या कायद्याने त्यांचे जंगल हिरावून घेतले जात होते, शेती करण्यावर निर्बंध आणले जात होते. आधीच आर्थिक दृष्ट्या हालाखीचे जीवन जगणाऱ्या जनजातींना इंग्रजांच्या असह्य अत्याचार आणि शोषणामुळे नरक यातनांना सामोरे जावे लागत होते.

वास्तविक जनजाती बाहेरच्या जगापासून अलिप्त राहून आपल्या जंगलात प्राप्त परिस्थितीत समाधानाने जीवन व्यतीत करणारा जनसमुदाय ! पण स्वार्थापोटी इंग्रज राजवटीने त्यांचे हे साधेसुधे जीवनमान सुद्धा उधळून लावण्याचा सपाटा सुरू केला होता. बिरसा यांनी याविरुद्ध जनजागृती सुरू केली. बिरसांच्या विद्रोही हालचालींमुळे २४ ऑगस्ट १८९५ रोजी इंग्रजांनी त्यांना व त्यांच्या काही साथीदारांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा केली.

सुटकेनंतर बिरसा रांची येथील जगन्नाथ मंदिरात वास्तव्यास आले. येथील दोन वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी जगन्नाथाची भक्ती व जनजातींची सेवा अविरत सुरू केली. सोबतच गुप्तपणे सशस्त्र उठावाची रचना केली. मुंडा, कुल, संथाल, उराव इत्यादी अनेक जनजातींना संघटित केले. आपल्या या धुरंधर क्रांतीनायकाच्या नेतृत्वात सहा हजार जनजाती पुरुष, महिला,अबालवृद्ध तीर-कमान, भाले ,कु-हाडी इत्यादी हत्यारांसह मातृभूच्या स्वतंत्रतेसाठी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठावास सज्ज झाले.

२५ डिसेंबर १८९९ रोजी गनिमी युद्धास अतिशय जोशपूर्ण सुरुवात झाली. हेच ” उलगुलान ” होय !जनजातींच्या या मातृभूमीच्या प्रेमाने भारलेल्या सशस्त्र मा-यापुढे इंग्रजांच्या बंदुका व तोफा निष्प्रभ होऊन त्यांची पिछेहाट होऊ लागली. इंग्रजांनी बिरसा यांस पकडून देणा-यास ५०० रु. इनाम जाहीर केले. इनामाच्या लोभाला बळी पडलेल्या स्वजनांच्या फितुरीने बिरसा ३ मार्च १९०० रोजी इंग्रजांच्या हाती पकडले गेले. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ९ जून १९०० रोजी कारावासातच भगवान बिरसांचा रहस्यमय मृत्यू झाला.

सार्वजनिक प्रेरणा स्थान ‘बिरसा मुंडा’

या समृद्ध इतिहासाची काही तुरळक उदाहरणे असूनही १९८२ साली मुंडा यांचा पुतळा खुंटीपासून १३० किलोमीटर दूर ओडिशाच्या राउरकेला येथे पोलिसांच्या अत्याचाराला तोंड देणार्‍या रोजंदारी कामगारांनी उभारला होता. आजही बिरसा मुंडा सामाजिक चेतना जागविण्याचे काम करतात. १९८९ मध्ये मुंडा यांच्या छायाचित्राचे संसदेत अनावरण करण्यात आले आणि १९९८ मध्ये एक पुतळा उभारण्यात आला. गेल्या वर्षीपासून, केंद्र सरकार बिरसा मुंडा यांची जयंती १५ नोव्हेंबर हा ‘आदिवासी गौरव दिवस (आदिवासी गौरव दिवस) म्हणून साजरा करत आहे’. १५ नोव्हेंबर रोजी, भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान मानल्या जाणार्‍या उलिहाटू येथे त्यांना आदरांजली वाहिली.

महान स्वतंत्रता सेनानी,जनजातीय योद्धा,जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !!!

Back to top button