CultureHinduismNewsSpecial Day

कान्होजी आंग्रे… बस नाम काफी है ! – भाग १

sarkhel kanhoji angre...

सरखेल कान्होजी आंग्र्यांचा पराक्रम सांगणारी २ भागांची विशेष मालिका ..

इंग्रजांकडून देखील कर वसूल करणारा शूरवीर…कान्होजी आंग्रे !

{ काही दिवसांपूर्वी गुगल आणि विकिपीडियावर सरखेल कान्होजी राजे आंग्रे (kanhoji aangre ) यांचा समुद्री चाचे (pirates) असा उल्लेख केल्याने नेटकरी भयंकर संतापले होते .याबाबत तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर विकिपीडियावर दुरुस्ती करण्यात आली आहे.गुगल आणि विकिपीडिया हे दैनंदिन माहिती मिळण्याचे स्त्रोत समजले जातात. जगभरातील माहिती गोळा करण्यासाठी या दोन माध्यमांची मदत घेतली जाते. मात्र गुगल वर कान्होजी आंग्रे हा शब्द सर्च केल्यानंतर तिथे कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख पायरेट्स अर्थात समुद्रीचाचे असा करण्यात आल्याचं दिसून आलं यानंतर याच्या समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.}

ज्याचे आरमार त्याचा समुद्र… ही युक्ती जाणून भारतात आलेला प्रत्येक व्यापारी देश समुद्रावरचं आपलं स्थान बळकट करत होता.

या परकीय सत्तांना तोंड द्यायचं आणि आपलं सार्वभौमत्व अबाधित ठेवायचं असेल तर आरमार पाहिजेच हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. त्यामुळेच कल्याणच्या खाडीच्या मुखावर वसुबारस (गोवत्स द्वादशी) अर्थात अश्विन कृष्ण एकादशी, शालिवाहन शक १५७९, हेमलंबी संवस्तर (इंग्रजी दिनांक २४ ऑक्टोबर १६५७) या शुभमुहूर्तावर दुर्गाडी किल्ला व जहाज बांधणी कारखाना उभारणीस सुरुवात करून हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. सिंधूबंदी उल्लंघन करून धार्मिक कायद्याला छेद देत , दर्यावर राज्य करण्याच्या दृष्टीने एक दमदार पाऊल टाकले. म्हणूनच वसुबारस हा दिवस “आरमार दिन” म्हणून साजरा केला जातो.

आरमाराच्या बाबतीतच बोलायचे झाले तर, शिवाजी रचिला पाया, कान्होजी झालासे कळस असा भीम पराक्रम सरखेल कान्होजी आंग्रे यांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी ,समुद्रात हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची दहशत निर्माण करून दाखवून दिला.

कान्होजी आंग्र्यांच्या शिक्कामोर्तबी शिवाय कोणाचेही जहाज पश्चिम किनाऱ्यावर फिरू शकत नव्हते. तेवढी दहशत व दरारा कान्होजी आंग्रे यांनी निर्माण केला होता. तसेच शिवरायांची नीती वापरून त्यांनीही विजयदुर्ग येथे आरमारी गोदी निर्माण केली. ज्यात मोठ्या गलबत गुराबांची डागडुजी केली जात असे . फिरंगी तर कान्होजी आंग्रे यांस लँड शार्क म्हणत आंग्रेंची जहाजं अंदमान -निकोबार बेटांपर्यंत गेल्याचे इतिहासात नमूद आहे.

पोर्तुगीज, इंग्रज, डच, आदिलशहा, मुघल, सिद्दी अशा सगळ्या सत्तांना तोंड देण्यासाठी या आरमाराचा मोठा उपयोग हिंदवी साम्राज्याला झाल्याचं दिसून येतं.

युद्धनौकांच्या बांधणीबरोबर जलदुर्गांकडेही शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष दिलं होतं. त्यांच्या काळात दुर्गाडी, सिंधुदुर्ग, खांदेरी, कुलाबा असे जलदुर्ग उभे राहिले. तसेच विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, जयगड, गोपाळगड हे जलदुर्ग त्यांनी स्वराज्यात आणले आणि त्यांची डागडुजी केली.

महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर या आरमारामुळे एक जलदुर्गांची माळच उभी राहिलेली दिसते. रत्नागिरी जिल्ह्यात उत्तरेस बाणकोट म्हणजेच हिम्मतगडापासून ते दक्षिणेस यशवंतगडापर्यंत अनेक दुर्ग आहेत.

शिवाजी महाराजांच्या सैन्यातील लोकांना इंग्रज सुद्धा घाबरत असत.असेच एक वीर पुरुष कान्होजी आंग्रे ज्यांनी १७ शतकात युरोपियन शक्तींचा प्रतिकार केला आणि मराठा साम्राज्याचे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील वर्चस्व आणि सार्वभौमत्वाचे अधिकार यावर त्यांनी जोर दिला. आपले समुद्रावरील सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी फिरंगी गलबतांवर कर बसवला. कान्होजी आंग्रांच्या शिक्का मोर्तब असलेल्या ना-हरकत पत्राशिवाय (NOC) हिंदवी स्वराज्यात व्यापाराची परवानगीच नव्हती. हिंदवी साम्राज्याच्या नौसेनेचे प्रमुख कान्होजी आंग्रे होते.त्यांचा वचक स्वतःला अजिंक्य समजणाऱ्या इंग्रज आणि पोर्तुगिजांना देखील होता. या दोन्ही सैन्यात प्रचंड सैन्य असूनसुद्धा कान्होजी आंग्रे यांचे स्वराज्याचे आरमार अजिंक्यच राहिले.

कोण होते कान्होजी आंग्रे…

कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे या गावी झाला.मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे हे एक, पुणे जिल्ह्यातील कोळसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव, परंतु आंगरवाडी या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांना आंग्रे हे नाव प्राप्त झाले.कान्होजींच्या आधीच्या पिढ्या शिवाजी महाराजांच्या पदरी होत्या.

१६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कोकणच्या किनारपट्टीवर विजय मिळवला तेव्हा सुवर्णदुर्ग किल्ल्याचा संरक्षक म्हणून कोन्होजीच्या वडिलांची नेमणूक शिवाजी महाराजांनी केली.कान्होजींचा जन्म याच किल्ल्यावर झाला आणि पुढे त्यांनी या समुद्रकिनाऱ्याचे संरक्षणही केले.

१६८० मध्ये त्यांचे वडील तुकोजी आंग्रे यांचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी आंग्रे यांनी आपल्या वडिलांचे कार्य संपूर्ण ताकदीने पुढे चालू ठेवले.१७ व्या आणि अठराव्या शतकाच्या सुरुवातीस युरोपियन उपनिवेशवादांच्या उद्रेक काळात,कोकण किनाऱ्यावर कोकण किनारपट्टीवर १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे यांना हिंदवी साम्राज्याच्या नौसेनेचे प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले.कान्होजींनी कोळी आणि मच्छीमार समुदायाशी मैत्री केली. ज्यांनी त्यांना समुद्राचे कौशल्य शिकवले. कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा यांची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही त्यांनी स्वपराक्रमाने स्वत:चा एक ठसा संबंध देशाच्या इतिहासात उमटविला. त्यांचा पराक्रम लक्षात घेऊन महाराजांनी त्यांना ‘सरखेल’ हा किताब प्रदान केला. .

सरखेल कान्होजी आंग्रे यांची मुद्रा –

क्रमशः

Back to top button