National SecurityNaxalismNews

माओवादी दहशतवादाचा धोका..

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर अर्बन नक्षल अर्थात शहरी माओवाद हा विषय देशभर चर्चेत आला, उलट सुलट चर्चा झाली, वाद प्रतिवाद झाले. शहरी माओवा‌द्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे असे काही लोकांचे म्हणणे होते तर लोकांचा एक गट असे ठासून सांगत होता की शहरी माओवादी असा कोणताही प्रकार अस्तित्वातच नाही. जो कोणी मोदी, भाजपा आणि संघ परिवाराच्या विरोधात बोलतो त्यांच्यावर ‘अर्बन नक्षल ‘ असा ठपका ठेवून त्यांची मुस्कटदाबी केली जाते. या दोन परस्पर विरोधी प्रचारामुळे सामान्य माणूस संभ्रमात पडतो आणि सत्य परिस्थिती काय आहे हेच त्याला कळेनासे होते. माओवा‌द्यांनी लिहिलेल्या कागदपत्रांचा अभ्यास केला तर शहरी माओवादी, त्यांचे अस्तित्व आणि त्यांच्या कामाचे भयावह रूप उघड होते. सामान्यांना माओवादाचे आणि शहरी माओवा‌द्यांचे सत्य कळावे यासाठी हा लेख म्हणजे एक लहानसा प्रयत्न होय.

माओवादी हिंसाचाराच्या बातम्या नेहमीच वाचनात येतात. सुरक्षा दलांवर हल्ले, सामान्य नागरिकांच्या क्रूर हत्या करण्यामागे माओवा‌द्यांचा निश्चित उ‌द्देश काय ? त्यांना नक्की काय साध्य करावयाचे आहे हेच जनतेला समजत नाही. हे सर्व समजून घेण्यासाठी माओवा‌द्यांनी स्वतः लिहिलेल्या दस्तावेजाचे बारकाईने वाचन करणे आवश्यक आहे.

‘ भारतीय क्रांतीची रणनीती आणि डावपेच’ हे माओवा‌द्यांनी लिहिलेले सर्वात महत्त्वाचे दस्तावेज आहे. शहरी भागातील कामासाठी सविस्तर मार्गदर्शन करणारे दुसरे दस्तावेज म्हणजे ‘अर्बन परस्पेक्टिव्ह’. सर्वोच्च माओवादी नेतृत्वाने हे दोन दस्तावेज लिहिलेले आहेत आणि त्यांची संघटना या दस्तावेजात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे काम करते. माओवादी संघटनेला नक्की काय साध्य करावयाचे आहे ? त्यांचे उद्देश काय ? हे सर्व त्यांच्या ‘भारतीय क्रांतीची रणनीती आणि डावपेच’ या पुस्तकात अगदी स्पष्टपणे लिहिलेले आहे.

माओवादी अगदी स्पष्टपणे लिहितात, ” सशस्त्र युद्धाद्वारे भारताची राजकीय सत्ता ताब्यात घेणे, युद्धानेच या समस्येवर तोडगा काढणे हेच आमचे उ‌द्दिष्ट आहे. युद्ध करून भारतीय लष्कर, पोलीस आणि संपूर्ण नोकरशाही यंत्रणा नष्ट करून माओवादी यंत्रणेची स्थापना करणे हे माओवादी संघटनेचे प्रमुख कार्य आहे”. माओवा‌द्यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारलेले आहे याब‌द्दल आता तरी कोणाच्या मनात शंका राहू नये. माओवा‌द्यांना भारतीय संविधान मान्यच नाही आणि ही सर्व संवीधानिक चौकट नष्ट करून ते भारतात हिंसक हुकूमशाही राजवट स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे आता स्पष्ट झाले आहे.

आपले उ‌द्दिष्ट माओवादी कसे साध्य करणार आहेत याबद्दल ते याच दस्तावेजात पुढे लिहितात की भारताची राजकीय सत्ता युद्धा‌द्वारे ताब्यात घेण्यासाठी सर्वात प्रथम माओवादी लष्कर उभारणे आवश्यक आहे. यासाठी दुर्गम जंगल भागात ‘ सुरक्षित माओवादी झोन’ निर्माण करून तेथे या माओवादी लष्कराची उभारणी केली पाहिजे. बस्तर – गडचिरोली (दंडकारण्य झोन) बालाघाट – मंडला (एम एम सी झोन) आणि झारखंड मधील सुरक्षित माओवादी झोन निर्माण करून त्या त्या भागात माओवा‌द्यांनी हजारोच्या संख्येत एक माओवादी लष्कर उभे केलेले आहे. माओवादी पुढे म्हणतात की एकदा असे सुरक्षित तळ आणि लष्कर तयार झाले की मग हळूहळू ग्रामीण भाग ताब्यात घेणे आणि सरते शेवटी शहरांना वेढा घालून शहरे ताब्यात घेणे या पद्धतीने आपण काम केले पाहिजे. वर लिहिलेल्या या बाबी त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवल्या आहेत.

6 फेब्रुवारी 2004 च्या रात्री ओरिसा राज्यातील कोरापुट या जिल्ह्याच्या ठिकाणावर शेकडो माओवा‌द्यांनी हल्ला केला. साधारणपणे सहा तास या शहरात माओवा‌द्यांनी हैदोस घातला. शहरातील पाच पोलीस ठाणे, जिल्हा शास्त्रागार, कारागृह आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून माओवा‌द्यांनी अंदाजे पन्नास कोटी रुपयांची शस्त्रे लुटून नेली.

  • 16 फेब्रुवारी 2008 ओरिसा राज्याच्या राजधानी भुवनेश्वर पासून जेमतेम शंभर किलोमीटर अंतरावर असलेले नयागड हे जिल्ह्याचे ठिकाण, रात्री दहा / अकरा वाजताच्या सुमारास शेकडो सशस्त्र माओवादी स्त्री-पुरुष वेगवेगळ्या वाहनातून या शहरात आले आणि तेथील पोलीस प्रशिक्षण केंद्र, शस्त्रागार आणि पोलीस ठाण्यावर हल्ला करून 14 पोलिसांना ठार मारले आणि अंदाजे 1200 बंदुका आणि एक लाख काडतुसे लुटून नेलीत.

दुर्गम भागात सुरक्षित तळ तयार करून नंतर एक लष्कर उभारून पुढे शहरांवर हल्ले करणे ही माओवा‌द्यांची कार्यप्रणाली आता वाचकांना पुरेशी लक्षात आली असेल.

अर्बन नक्षल

आता वळू शहरी माओवा‌द्यांकडे. माओवादी संघटनेचे दोन भाग आहेत. एक भाग जंगलातील सशस्त्र माओवादी आणि दुसरा भाग शहरातील गुप्तपणे काम करणारे शहरी माओवादी. जंगलातील माओवादी चक्क गणवेश घालून, बंदूक घेऊन खुलेआम फिरतात त्यामुळे त्यांना सहज ओळखता येते पण शहरी माओवा‌द्यांना ओळखणे अत्यंत कठीण आहे. ते स्वतःला कधीही माओवादी म्हणवून घेत नाही आणि वेगवेगळ्या संघटनांच्या आडून काम करतात. सभ्यतेच्या वेगवेगळ्या मुखवट्या आडून हे शहरी माओवादी आपल्या फ्रंट संघटना चालवत असतात आणि समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरतात.

शहरी माओवा‌द्यांचे काम फार पूर्वीपासून सुरू आहे. शहरी भागातील कामाब‌द्दल त्यांचा पहिला ठराव 1973 मध्ये आंध्र प्रदेश राज्याच्या माओवादी राज्य समितीने पारित केला होता . कालांतराने आंध्र प्रदेश च्या पीपल्स वॉर ग्रुप (पी डब्ल्यू जी) ने 1995 साली या माओवादी शहरी कार्याच्या ठरावाचा फेरआढावा घेतला आणि त्या सुधारणा केल्या. 2004 साली सीपीआय (माओ) पक्ष स्थापन झाल्यानंतर त्यांच्या महत्त्वाच्या दस्तावेजात शहरी कार्याला विशेष महत्व दिलेले आहे. त्यामुळे शहरी माओवाद्यांच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरी माओवाद्यांचे निश्चित उदिष्ट काय आहे हे नीट समजून घेणे जरुरी आहे.

‘अर्बन पस्पॅक्टिव्ह’ हे माओवा‌द्यांचे शहरी भागातील कामाब‌द्दल सर्वात महत्त्वाचे दस्तावेज आहे. यात माओवादी अगदी स्पष्टपणे लिहितात, ” शहरे ताब्यात घेणे हे माओवादी क्रांतीचे अंतिम उ‌द्दिष्ट असल्यामुळे शहरी भागात माओ कार्य मजबूत करणे हे अत्यंत आवश्यक आहे”. ते पुढे लिहितात की शहरी माओवा‌द्यांनी व्यापक जन संघटना उभ्या केल्या पाहिजेत आणि शहरांमध्ये मोठमोठे जन आंदोलने घडवून आणली पाहिजेत. शहरी माओवा‌द्यांचे हेच सर्वात महत्त्वाचे काम आहे. या कामाबरोबरच त्यांनी जंगलातील माओवादी लष्कराला (पी एल जी ए) ला कार्यकर्ते, नेते, शस्त्र, दारुगोळा, औषधे, अन्नधान्य, विविध उपकरणे आणि इतर सर्वच प्रकारची मदत केली पाहिजे. जंगलातील सशस्त्र माओवादी लष्कराचे (PLGA) कार्य सर्वात महत्त्वाचे आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करणे हेच शहरी माओवा‌द्यांचे काम आहे.

अर्बन नक्षल चे उ‌द्दिष्ट स्पष्ट केल्या नंतर शहरी भागात त्यांनी कुठे आणि कसे काम करावे हे या माओवादी दस्तावेजात लिहिलेले आहे, ” शहरी माओवा‌द्यांनी शेतकरी, कामगार, वि‌द्यार्थी, स्त्रिया, मध्यमवर्ग, विचारवंत, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाज इत्यादी सर्व घटकात काम उभे केले पाहिजे. थोडक्यात त्यांनी सर्व समाजावर प्रभाव टाकला पाहिजे. माओवादी पुढे असेही लिहितात,” अर्बन माओवा‌द्यांनी पोलीस, अर्ध सैनिक दले आणि भारतीय लष्करात देखील घुसखोरी केली पाहिजे. शहरी भागातील कार्यकर्त्यांनी आपली माओवादी ओळख लपवून ठेवली पाहिजे.

माओवादी संघटनेशी असलेले आपले संबंध कधीही उघड करू नये. उघडपणे काम करणाऱ्या माओवादी फ्रंट संघटना आणि भूमिगत माओवादी संघटना यांचे परस्पर संबंध उघड होणार नाहीत याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. शहरी कार्यकर्त्यांनी व्यापक जनसंपर्क ठेवून नवीन नवीन संघटना स्थापन केल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर इतर सामाजिक संघटनांमध्ये घुसखोरी केली पाहिजे. शहरी भागात मोठ्या जन संघटना स्थापन करून त्यानंतर प्रचंड जन आंदोलने करणे याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे “. काही काळापूर्वी दिल्लीत झालेले किसान आंदोलन, CAA विरोधी आंदोलन, रोहित वेमुला बद्दल झालेले आंदोलन, कोरेगाव भीमा आंदोलन इत्यादी यात माओवा‌द्यांचा पूर्ण सहभाग होता.

शहरी माओवा‌द्यांचे एक विशिष्ट प्रकारचे काम आहे ज्याला ते ‘फॅक्शनल वर्क’ म्हणतात. अत्यंत गोपनीयतेने केले जाणारे हे काम तितकेच घातक आहे. फॅक्शनल वर्क ही एक प्रक्रिया आहे. सर्वप्रथम एक माओवादी कार्यकर्ता एका बिगर – माओवादी संघटनेत प्रवेश करतो, त्यानंतर तो इतर मोजक्याच माओवादी कार्यकर्त्यांना या संघटनेत प्रवेश मिळवून देतो. हळूहळू हे सर्व लोक त्या बिगर माओवादी संघटनेत पदाधिकारी होतात आणि अशा रीतीने त्या बिगर माओवादी संघटनेचा पूर्ण ताबा घेतात व पुढे अशा संघटनेचा माओवादी कामासाठी वापर करून घेतात. हे फॅक्शनल वर्क चे काम इतक्या हुशारीने आणि गोपनीयतेने केले जाते की त्या संघटनेतील सामान्य कार्यकर्त्यांना कधी लक्षातच येत नाही की त्यांच्या संघटनेचा ताबा माओवा‌द्यांनी घेतलेला आहे आणि हे कार्यकर्ते स्वतः अप्रत्यक्षपणे माओवादी – दहशतवादी संघटनेच्या कामात मदत करीत आहेत.

अर्बन पस्पॅक्टिव्ह या दस्तावेजात माओवादी पुढे लिहितात, ” या पद्धतीने जर आपण काम केले तर त्याचा दीर्घकालीन फायदा होतो. जर आपला खरा माओवादी चेहरा लपवण्यात आपण यशस्वी ठरलो तर सरकारी यंत्रणेचा ससेमिरा आपल्या मागे कधीही लागत नाही म्हणूनच शहरी भागात फॅक्शनल वर्क प्रमाणे काम करणे सर्वात योग्य आहे “.

फॅक्शनल वर्क प्रमाणे काम करून या शहरी माओवा‌द्यांनी देशभरातील अनेक सामाजिक संघटना ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्यांचा वापर आपल्या दहशतवादी संघटनेच्या कामासाठी सुरू आहे. अश्या घुसखोर माओवा‌द्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करणे आणि त्यांना न्यायालयीन खटल्यात शिक्षा करणे हे अत्यंत जिकिरीचे काम आहे.

जंगलातील आणि शहरातील माओवादी संघटनेचे अक्राळविक्राळ आणि भयावह स्वरूप आता वाचकांच्या लक्षात आलेच असेल. पुढे प्रश्न असा पडतो की सर्वसामान्य माणसाने या दहशतवादी संघटनेच्या विरुद्ध करावे तरी काय ?? पोलीस आणि गुप्तचर विभाग तर त्यांचे काम करीतच आहेत पण राष्ट्रीय सुरक्षा ही बाब सुरक्षा दले आणि सामान्य नागरिक यांची संयुक्त जबाबदारी आहे हे आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे. माओवादी दहशतवादी संघटना आणि त्यांच्या फ्रंट संघटना यांच्या विरोधात सर्व समाजाने संघटित होऊन व्यापक जनजागरण आणि जनआंदोलन केले पाहिजे.

जगभरातील सर्वच दहशतवादी संघटनांची पाळेमुळे शेवटी समाजात रुजलेली असतात. जोपर्यंत समाजातून त्यांना समर्थन मिळते तोपर्यंत या दहशतवादी संघटना काम करू शकतात, ज्या क्षणी समाज त्यांच्या विरोधात उभा राहतो त्याच क्षणी अशा संघटनांचे अस्तित्व संपून जाते. देशद्रोही, संविधानद्रोही हिंसक माओवादी संघटने विरुद्ध सर्व भारतीय समाजाने एल्गार पुकारण्याची वेळ आली आहे असे वाटते. समाजाने त्यांच्याविरुद्ध जन जागरण, जन संघटन आणि जन आंदोलन सुरू केले तर ही हिंसक माओवादी – दहशतवादी संघटना नामशेष होण्यास काहीच वेळ लागणार नाही हे निश्चित..

लेखक – मिलिंद महाजन

Back to top button