Opinion

ब्लॉकचेन लग्न: भविष्याची नांदी

नोव्हेंबर २०२१ मध्ये पुण्यातील अनिल नरसीपुरम आणि श्रुती नायर या दाम्पत्याने ब्लॉकचेन लग्न केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ साठीच्या अर्थसंकल्पात डिजिटल मालमत्ता आणि त्यांचे व्यवहार यांचा उल्लेख केला. डिजिटल मालमत्तांच्या व्यवहारात प्राप्तकर्त्यावर ३०% कर आकारण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय म्हणजे अप्रत्यक्षरीत्या डिजिटल मालमत्तांना मान्यता देण्यासारखेच आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर मध्ये झालेले हे लग्न चर्चेत आले आहे.

प्रक्रिया काय?
पुण्यातील जोडप्याने आधी नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर इथरीयम (ethrium) स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट एनएफटी (NFT) च्या माध्यमातून पक्के केले. त्यासाठी मेटामास्क वॉलेट दोघांच्या लॅपटॉपवर सेट करण्यात आले. एनएफटी तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या इमेजमध्ये वधूच्या अंगठीचा समावेश होता, त्यावर लग्नावेळी दिलेल्या वचनांचा अंतर्भाव होता. डिजिटल पुजारी अनुप पक्की यांनी ओपनसी या प्लॅटफॉर्म वर एनएफटी मिंट केले. वधू-वरांनी आपापली वचने उधृत केली. त्यानंतर मिंट करण्यात आलेला एनएफटी जोडप्याकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यांच्या वचनबद्धतेचे हे सार्वजनिक रेकॉर्ड आहे.

एनएफटी म्हणजे काय?
नॉन फंजिबल टोकन हे विशिष्ट ओळख क्रमांक असलेले डिजिटल कॉपीराईट आहे. ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ताच आहे. याची नक्कल करणे, बेकायदेशीरपणे हस्तांतरित करणे अशक्य आहे. या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या डिजिटल मालमत्ता सुरक्षित मानल्या जात आहेत. या डिजिटल मालमत्ता निर्माण करण्याची प्रक्रिया जलद आहे. एकदा तयार झाल्यानंतर ही मालमत्ता ब्लॉकचेन विश्वात कायमस्वरूपी राहते.

इतर उदाहरणे,
दिनेश एस पी आणि जगननाधिनी या जोडप्याच्या लग्नात एनएफटी आणि आभासी प्रतिमा निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. त्या आभासी लग्नात वधू-वरासह १२ जणांची आभासी प्रतिमा तयार करण्यात आली. त्यात वधूच्या दिवंगत वडलांच्या आभासी प्रतिमेचा देखील समावेश होता. लग्नाच्या स्वागत समारंभाचे आभासी स्वरूपात गुगल मीट च्या माध्यमातून ४०० अभ्यागतांसाठी प्रक्षेपण करण्यात आले.

जागतिक पातळीवर काय परिस्थिती?
अमेरिकेतील ज्यू जोडपे रिबेका रोज (Rebbeca Rose) आणि पीटर केचरगिन्सकी (Peter Kacherginsky) पारंपरिक ज्यू विवाह सोहळ्यात नॉन फंजिबल टोकन (Non Fungible Token) म्हणजेच आपापल्या आभासी अंगठ्यांची स्मार्टफोनवरून अदलाबदल केली. हा विवाह मार्च २०२१ मध्ये झाला. इथून पुढे ब्लॉकचेन आधारित व्यवहारांबरोबरच लग्न आदि गोष्टीदेखील होणार आहेत. जग झपाट्याने त्या दिशेने वाटचाल करत आहे.

  • शौनक कुलकर्णी
    लेखक – पब्लिक पॉलिसी आणि आर्थिक धोरणाचे अभ्यासक आहेत.
Back to top button