भारतीय चलनाचा प्रवास…
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये सामाजिक व आर्थिक बदल घडत असतानाच व्यापार व एकंदरीत अर्थव्यवस्थेसाठी ‘नाण्यांचा’ विकास झाला. व्यापारासाठी ‘देवाण-घेवाण’ या तत्कालीन व्यवस्थेवर अवलंबून न राहता नाण्यांचा शोध लागल्यामुळे आर्थिक व्यवहार सुकर होऊ लागले. कालानुरुप वेगवेगळ्या प्रकारची नाणी चलनात येऊ लागली. पुढे या नाण्यांप्रमाणेच कागदी नोटा चलनात आल्या. आजच्या आधुनिक भारतात तर प्लास्टिक मनी अर्थात डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसेच डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नाण्यांचा मेकओव्हर करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पुरातन काळापासून आपल्या या नाण्यांचा प्रवास कसा चालत आला आहे, याविषयी उहापोह करणारा हा लेख
प्राचीनकाळी जेव्हा नुकतीच शेतीची कला मानवाने अवगत केली, अगदी तेव्हापासून मानवी वस्त्यांमध्ये आपापसांत धान्य किंवा शेतीची अवजारे यांची देवाण-घेवाण व्हायची. गव्हासाठी तांदूळ किंवा एखादे शेतीसाठी उपयुक्त अवजार यांच्या अदलाबदलीवर आर्थिक-सामाजिक व्यवहार अवलंबून होते. यामध्ये व्यवहारसुलभता होती; पण आर्थिक न्याय नव्हता. शेतीसाठी एका नांगराच्या बदल्यात किती धान्य द्यायचे याचे प्रमाण निश्चित नव्हते. यातूनच अनेक समस्या उद्भवत. आर्थिक व्यवहारामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्राचीनकाळी मानवाने समान वजन असलेल्या ‘गुंजा’ (लाल व काळ्या रंगाच्या बिया), ‘कवडी’ (पांढर्या किंवा करड्या रंगाचे शिंपले) यांचा उपयोग आर्थिक व्यवहारांमध्ये सुरू केला. सहजपणे मिळणार्या गुंजा व कवडी यामुळे काही प्रमाणात आर्थिक व्यवहार सुकर झाले, परंतु प्रमाणबद्धता अजूनही निश्चित न झाल्यामुळे लांबच्या वसाहतीदरम्यानच्या व्यापारामध्ये समस्या येऊ लागल्या. ‘कवडीमोल दराने’, ‘फुटी कवडी’सारख्या उक्ती या ‘कवडी’रूपी नाण्यांमुळेच अस्तित्वात आल्या.
चांदी हा धातू भारतामध्ये सर्वप्रथम नाणी तयार करण्यासाठी वापरला गेला. इसवी सनापूर्वी ७ व्या ते ६ व्या शतकांदरम्यान चांदीची नाणी पाडली गेली. आयताकृती, चौकोनी व क्वचित गोलाकार स्वरूपाची ही नाणी प्रामुख्याने उत्तर भारतात सापडतात. यावर तत्कालीन राज्यांचे/शहरांचे किंवा व्यापारी वर्गाची चिन्हे सापडतात. भारतावर शासन करणार्या अनेक राजवंशांमध्ये काही ग्रीक होते, फारसी होते, बॅक्ट्रीयन, ससानियन होते. यांनीदेखील आपली नाणी भारतामध्ये चलनात वापरली. काही तुरळक पुरावे सोडता खर्या अर्थाने सुवर्णनाण्यांचा उपयोग सर्वप्रथम कुषाण राजवंशाने केला. शिव, विष्णूसारख्या देवदेवतांनादेखील याच काळात नाण्यांवर स्थान मिळाले.
क्षत्रप राज्यांच्या नाण्यांवर ‘राज्ञो श्री महाक्षत्रपस’ किंवा ‘राज्ञो श्री क्षत्रपस’ अशी बिरुदे सापडतात. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक या प्रदेशांमध्ये सातवाहन राजांच्या राजवटींदरम्यान तांब्याची नाणी मोठ्या प्रमाणात चलनामध्ये होती. भारत व रोमन व्यापारादरम्यानची अनेक रोमन सुवर्णनाणी भारतभर सापडली आहेत. गुप्त काळातील सुवर्णनाणी, त्यावरून आढळणारे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक जीवन, कलाकुसर, धातुशास्त्रीय तंत्रज्ञान हे सर्व वाखाणण्याजोगे आहे. सुवर्ण, रौप्य, तांबा या धातूंमधून आढळणारी गुप्त राजांची नाणी हा खर्या अर्थाने संशोधनाचा विषय आहे. या नाण्यांवर गुप्त साम्राज्याचा गरुडध्वज, राजदंड, राजा, राजाचे नाव हे सर्वकाही आहे. विष्णू-लक्ष्मीसारख्या देवी-देवता आहेत. अश्वमेध यज्ञ केल्यानंतर पाडलेली नाणीदेखील आहेत. राजाचे चित्रणदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. अश्वारूढ राजा, वीणा वाजवणारा राजा, सिंहाची शिकार करणारा राजा, राणीसोबत राजा असे वेगवेगळे चित्रण गुप्त राज्यांच्या नाण्यांवर आढळते. चंद्रगुप्त, विक्रमादित्य, समुद्रगुप्त यांसारखे विश्वविख्यात शासक या काळात होऊन गेले.
गुप्त काळाच्या समाप्तीनंतर भारताच्या राजकीय व आर्थिक जीवनात अनेक स्थित्यंतरे आली. परकीय आक्रमणे, व्यापारातील मंदी यामुळे गुप्त काळानंतर कमी दर्जाची नाणी पाडलेली आढळतात. सोन्याच्या नाण्यांमधून सोन्याचे प्रमाण कमी झालेले आढळले. अनेक राजवंशांनी स्वतःची नाणी न काढता अगोदरची नाणी चलनात ठेवली. मुसलमानी आक्रमकांनी तर भारतातील अमाप संपत्ती लुटून नेली. हजारो-लाखो नाणी भारताबाहेर नेऊन वितळवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तांब्याची ‘शिवराई’ ही नाणी अस्तित्वात होती. सोन्याच्या नाण्यांना ‘होन’ हे नाव होते.
वसाहतीच्या व व्यापाराच्या उद्देशाने आलेल्या युरोपीयन व्यापार्यांनी अगोदरच्या काळात भारतीय राजांची नाणी वापरली, परंतु नंतरच्या काळात त्यांनी मुघलांकडून नाणी पाडण्याची परवानगी मिळवली. त्यात ब्रिटिश, डच, फ्रेंच, पोर्तुगीज होते. भारतीय पद्धतीनुसार व नंतर स्वतःच्या राजांची नाणी पोर्तुगीज, ब्रिटिश यांनी काढली. युरोपीय टांकसाळीतून तयार होणारी नाणी ही सुबक व उत्तम दर्जाची असल्यामुळे अनेक भारतीय शासक ब्रिटिशांकडून आपल्या राज्यासाठी नाणी बनवून घेऊ लागले. यात मराठे होते तसेच मुघल शासकदेखील. युरोपीय यांत्रिकीकरणाचा प्रभाव भारतीय नाण्यांवरही दिसू लागला. मशिनीद्वारे बनवलेली नाणी चलनात आली. ग्वाल्हेर, बडोदासारख्या राज्यांची नाणी युरोपीय नाण्यांच्या धर्तीवर बनली. धातुमूल्याऐवजी टोकन पद्धती अस्तित्वात आली.
भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर देखील इंग्रजांनी चलनात आणलेल्या मुद्राच भारतात सुरु राहिल्या. १९२८ साली नासिक येथे नोटांचे मुद्रणालय सुरु होण्यापूर्वी सगळ्या नोटा बँक ऑफ इंग्लंड द्वारे छापल्या जात असत. यानंतर १९३५ साली भारतीय धनाच्या नियोजनाची संपूर्ण जवाबदारी नव्याने तयार झालेल्या रिजर्व बँक ऑफ इंडियावर सोपविण्यात आली. १९४४ साली भारतीय रिजर्व बँकेने नकली नोटांवर रोख लावण्याकरता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नोटांमध्ये संरक्षण धागे आणि वॉटरमार्क चा उपयोग केला. १९४९ साली स्वतंत्र भारतात पहिली नोट ही एक रुपयाची छापण्यात आली. त्यावर सारनाथ येथील सिंह असलेली अशोक स्तंभाची प्रतिकृती छापण्यात आली. पुढे हे चिन्ह भारताचे राष्ट्रीय चिन्ह ठरले.
स्वातंत्र्यानंतर नाणी तांब्याच्या धातूंपासून बनविल्या जात होती, पुढे १९६४ मध्ये अॅल्युमिनियम पासून आणि १९८८ मध्ये स्टेनलेस स्टील पासून नाणी बनविल्या जाउ लागली.
दृष्टीबाधित दिव्यांग असोत किंवा ज्यांना नोटांवरचा आकडा समजण्यास त्रास होतो अशांकरता रिजर्व बँक ऑफ इंडियाने १९६० साली वेगवेगळ्या रंगांमध्ये नोटा छापण्यास सुरुवात केली जेणेकरून रंगांच्या वेगळेपणावरून या लोकांना नोटा ओळखता येतील.
१९८० नंतर नोटांवर कला, संस्कृती, आणि ज्ञान-विज्ञाना संबंधित चित्र व्यापक स्वरुपात छापल्या जाउ लागले. त्यापूर्वी काही राष्ट्रीय स्मारकांची चित्र देखील छापण्यात आली होती. २०११ साली नोटांवर रुपयाचे नवे चिन्ह (”) अंकित केल्या जाऊ लागले.
नुकत्याच छापण्यात आलेल्या भारतीय नोटांवर ‘स्वच्छ भारत’ अभियानाचे चिन्हं आहे. ५०० च्या नोटेवर लाल किल्ला छापण्यात आला असून आणि दोन हजार च्या गुलाबी नोटेवर मंगलयाना चे चित्र छापण्यात आले आहे. कुठल्या मूल्यात किती नोटा छापायच्या हे देशातील विकास दरावर आणि मुद्रास्थितीच्या दरावर ठरविण्यात येते. किती नोटा फाटल्या, तुटल्या आणि खराब झाल्या आहेत, राखीव साठ्याची किती आवश्यकता आहे, हे देखील विचारात घेतले जाते. नोटांच्या छपाई करता संपूर्ण देशात चार बँक नोट प्रेस, चार टाकसाळ, आणि एक पेपर मिल आहे.
नोटांची प्रेस मध्यप्रदेशातील देवास, महाराष्ट्रातील नाशिक, सालबोनी आणि मैसूर येथे आहे. दोन हजाराच्या नोटेची छपाई मैसूर येथे केली जाते, मध्यप्रदेशातील देवास इथल्या नोटांच्या प्रेस मध्ये दर वर्षाला तब्बल २६५ कोटींपेक्षा अधिक नोटांची छपाई करण्यात येते. नोटांच्या छपाईकरता ज्या शाईचा उपयोग करण्यात येतो ती शाई देवास येथेच तयार करण्यात येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. त्या दिवशी मध्यरात्रीपासून चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या होत्या. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी नोटबंदी निर्णयाला ५ वर्ष पूर्ण झाली. यादरम्यान एक विशेष गोष्ट घडली आहे. अर्थ मंत्रालय लवकरच १, २, ५, १० आणि २० रुपयांची नाणी चलनात आणत आहे. ही नाणी अधिसूचित केली असून, त्याला १ रुपया, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपये नियम २०२१ असे संबोधण्यात येईल. ज्या दिवशी ही अधिसूचना गॅझेटमध्ये प्रकाशित होईल, त्या दिवसापासून हा नवा नियम अस्तित्वात येणार आहे.
या नाण्यांच्या डिझाईनविषयीची माहिती अहवालात देण्यात आली आहे. त्यानुसार २० रुपयाच्या नाण्याच्या दर्शनी भागावर अशोक स्तंभावरील तीन सिंहांची राजमुद्रा असेल तसेच `सत्य मेव जयते` असे लिहिलेले असेल. हिंदीत भारत आणि इंग्रजी भाषेत इंडिया असे लिहिलेलं असेल. मागील बाजूस `आजादी का अमृत महोत्सव` चा अधिकृत लोगो असेल. या लोगोखाली 20 रुपये लिहिलेले असेल. इंग्रजीत `75TH YEAR OF INDEPENDENCE` असे लिहिलेले असेल. ज्यावर्षी हे नाणे तयार होईल, त्या वर्षाचा उल्लेख त्यावर असेल.
१० रुपयाच्या नाण्याच्या मागील बाजूस `आजादी का अमृत महोत्सव` चा अधिकृत लोगो असेल. या लोगोखाली १० रुपये लिहिलेले असेल. इंग्रजीत `75TH YEAR OF INDEPENDENCE` असे लिहिलेले असेल. ज्यावर्षी हे नाणं तयार होईल, त्या वर्षाचा उल्लेख त्यावर असेल. पुढील बाजूला अशोक स्तंभावरील राजमुद्रा असेल. तसेच `सत्यमेव जयते` असे लिहिलेले असेल. हिंदीत भारत आणि इंग्रजी भाषेत इंडिया असे लिहिलेले असेल.
१ रुपयाच्या नाण्याच्या पुढील बाजूला अशोक स्तंभावरील राजमुद्रा असेल आणि `सत्यमेव जयते` असं लिहिलेलं असेल. हिंदी भाषेत भारत तर इंग्रजी भाषेत इंडिया असे लिहिलेले असेल. मागील बाजूला `आजादी का अमृत महोत्सव` असा अधिकृत लोगो असेल. लोगोखाली १ रुपया असे लिहिलेले असेल. इंग्रजीत `75TH YEAR OF INDEPENDENCE` लिहिलेले असेल. ज्या वर्षी या नाण्याची निर्मिती केली जाईल, त्या वर्षाचा उल्लेख नाण्यावर असेल.
२ रुपयाच्या नाण्याच्या मागील बाजूला `आजादी का अमृत महोत्सव` हा अधिकृत लोगो असेल. लोगो खाली २ रुपये असे लिहिलेलं असेल. तसेच इंग्रजीत `75TH YEAR OF INDEPENDENCE` लिहिलेले असेल. ज्या वर्षी या नाण्याची निर्मिती केली जाईल त्यावर्षाचा उल्लेख नाण्यावर असेल. पुढील बाजूला अशोक स्तंभावरील राजमुद्रा असेल. तसेच सत्य मेव जयते लिहिलेले असेल. हिंदी भाषेत भारत तर इंग्रजीत इंडिया लिहिलेले असेल.
५ रुपयाच्या नाण्याच्या मागील बाजूला `आजादी का अमृत महोत्सव` हा अधिकृत लोगो असले. लोगो खाली ५ रुपये लिहिलेलं असेल. तसेच इंग्रजीत `75TH YEAR OF INDEPENDENCE` लिहिलेले असेल. ज्या वर्षी नाण्याची निर्मिती होईल, त्या वर्षाचा उल्लेख नाण्यावर असेल. नाण्याच्या पुढील बाजूला अशोक स्तंभावरील राजमुद्रा असेल. तसेच `सत्यमेव जयते` लिहिलेले असेल. हिंदीत भारत तर इंग्रजी इंडिया लिहिलेले असेल.
१, २, ५, १० आणि २० रुपयांची नाणी टाकसाळीमध्ये तयार करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या परवानगीनंतर टाकसाळीद्वारे ही नाणी जारी करण्यात येतील.