HinduismNewsReligion

गीता प्रेस :- नाळ भारतीय संस्कृतीशी..

सर्व सामान्यांसाठी हिंदू संस्कृती सुलभ रितीने सांगणाऱ्या गीता प्रेसला २०२१ सालचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर..!

गेली १०० वर्षे हिंदू परंपरेचा वारसा अविरत जोपासणाऱ्या ‘गीता प्रेस’( geeta press gorakhpur) या प्रकाशन संस्थेला अहिंसक तसेच गांधीवादी मार्गाने सामाजिक,आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल २०२१ सालचा गांधी शांतता पुरस्कार( gandhi peace prize-2021)जाहीर झाला आहे.

गीता प्रेसच्या या कामाबद्दल गांधी शांतता पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. गीता प्रेसने यावर ‘या पुरस्काराने सन्मानित करणे ही अत्यंत सन्मानाची बाब आहे, परंतु प्रकाशक कोणत्याही प्रकारच्या देणग्या न घेण्याची परंपरा राखून या पुरस्काराची रोख रक्कम स्वीकारणार नाहीत, असे आवर्जून नमूद केले. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विश्वस्त मंडळाची रविवारी बैठक झाली आणि एक कोटी रुपयांचे रोख बक्षीस न स्वीकारण्याचा निर्णय या बैठकीत घेतला गेला. हा प्रतिष्ठित पुरस्कार दिल्याबद्दल प्रकाशकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे आभार मानले आहेत.

हा पुरस्कार जाहीर झाल्या बरोबर देशातील काँग्रेस सह काही राजकीय पक्षांनी याला कडाडून विरोध करायला सुरवात केली. या विरोधामागे काही राजकीय हेतू असतील तर आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचे नाही परंतु हा विरोध गीता प्रेसच्या श्रीमद भगवद्गीता, वेद ,पुराणे,उपनिषदे सारख्या भारतीय (हिंदू) तत्वज्ञानाचा प्रसार करण्यामुळे असला तर तो महात्मा गांधी , पंडित मदनमोहन मालवीय यासारख्या गीता प्रेसच्या काँग्रेसी समर्थक नेत्यांचा घोर अपमान आहे.

महात्मा गांधी (mahatma gandhi) यांच्या संकल्पनेतील सुराज्य हे रामराज्यच होते, ते गोहत्याबंदीचे कट्टर समर्थक होते, त्यांना श्रीमद भगवद्गीता अत्यंत प्रिय होती. महात्मा गांधींच्या प्रेमळ सूचनेनुसार गीता प्रेसने आपल्या प्रकाशनांमध्ये कधीही जाहिराती प्रसिद्ध होऊ दिल्ल्या नाहीत.,महात्मा गांधी व गीता प्रेस यातील जिव्हाळ्याचे संबंध विशद करणारे बोलके उदाहरण आहे.

आज त्याच गीता प्रेसला महात्मा गांधींच्या नावाने मिळणाऱ्या पुरस्काराला विरोध करून आजची काँग्रेस आपल्याच सर्वोच नेत्याचा अर्थात महात्मा गांधींचा उपमर्द करीत आहे.

महात्मा गांधींच्या जोडीला पंडीत मदन मोहन मालवीय(pandit madan mohan malviya) , सरदार वल्लभ भाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्यासारखे दिग्गज काँग्रेसी नेते देखील गीता प्रेसच्या मासिकांमधून लिखाण करीत असत. आजच्या काँग्रेसने पुरस्काराला केलेला विरोध म्हणजेच आपल्याच एकेकाळच्या महनीय नेत्यांच्या अब्रूची लक्तरे काढणे नव्हे काय ?

जगाला मानवतेच्या संदेश देणाऱ्या विशुद्ध भारतीय तत्वज्ञानाचा प्रसार करणाऱ्या गीता प्रेसला मिळालेल्या पुरस्काराला विरोध करण्याऱ्या आजच्या काँग्रेसची प्राचीन भारतीय संस्कृती प्रती असलेला हा द्वेष अनाकलनीय आहे.आणि आजच्या काँग्रेसचा गीता प्रेसला मिळालेल्या पुरस्काराला विरोध म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीचे पाईक असलेलया १०० कोटी सकल हिंदु समाजाचा घोर अपमान आहे. आजच्या काँग्रेसचा हिंदू द्वेष अत्यंत दुर्दैवी व निंदाजनक आहे.

आजपर्यंत या प्रकाशन संस्थेने श्रीमद भगवद्गीता तब्बल १६ कोटी २१ लाख प्रती तर इतर १४ भाषांमध्ये सुमारे ४१ कोटी ७ लाख प्रती प्रकाशित केल्या आहेत.

आधी आपण गांधी शांतता पुरस्काराबद्दल जाणून घेऊया…

“गांधी शांतता पुरस्कार” हा १९९५ साली गांधीजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सरकार ने सुरू केलेला वार्षिक पुरस्कार आहे. महात्मा गांधीच्या तत्वज्ञानाला वाहिलेली ही आदरांजली आहे.म्हणूनच हा बहुमान भारत सरकारकडून महात्मा गांधींच्या नावे दिला जातो.हा पुरस्कार राष्ट्रीयत्व, वंश, भाषा, जात पंथ किंवा लिंग याचा विचार न करता प्रदान केला जातो. १ कोटी रूपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयाने दिली आहे.

गीता प्रेसची आगळीवेगळी परंपरा..

गीता प्रेसचा इतिहास काय?

हिंदू धर्म जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे योगदान…

गीता प्रेस ही एक ना-नफा,ना-तोटा तत्त्वावर चालविली जाणारी प्रकाशन संस्था आहे; जी कमीत कमी किंमतीत धार्मिक हिंदू पुस्तकांचे प्रकाशन व विक्री करते. जय दयाल गोयंडका, घनश्याम दास जालान आणि हनुमान प्रसाद पोद्दार यांनी २९ एप्रिल १९२३ रोजी या प्रकाशन संस्थेची सुरुवात केली. १९२६ साली ऑगस्ट मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या अंकात महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींनी योगदान दिले होते. मूलतः या प्रकाशन संस्थेची स्थापना ही कोलकात्यात झाली होती.

गीता प्रेस, गोरखपूर- १९२३

गीता प्रेसची स्थापना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात १९२३ मध्ये झाली. पण त्याआधीची कथाही खूप रंजक आहे…

खरं तर, गीताप्रेस १९२१ मध्ये कोलकाता, पश्चिम बंगाल येथे स्थित गोविंद भवन ट्रस्ट मधेच झाली होती. या ट्रस्टच्या माध्यमातून भगवद्गीता प्रकाशित झाली. पण या प्रकाशनाच्या वेळी गीतेत काही चुका राहिल्या. यादरम्यान जय दयाल गोयंका यांनी प्रेस मालकाकडे याबाबत तक्रार केली असता प्रेस मालकाने स्पष्टपणे सांगितले की,जर तुम्हाला गीतेचे शुद्ध प्रकाशन हवे असेल तर तुमची स्वतःची स्वतंत्र प्रेस स्थापन करा.

यानंतर गोरखपूरमध्ये गीताप्रेसची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि जयदयाल गोयंका, घनश्याम दास जालान आणि हनुमान प्रसाद पोद्दार यांनी मिळून २९ एप्रिल १९२३ रोजी गोरखपूरमध्ये गीताप्रेसची स्थापना केली. तेव्हापासून हे “गीता प्रेस गोरखपूर” असे बिरुद रूढ झाले.

भाड्याच्या घरातून गीताप्रेस सुरू करण्यात आली.गीताप्रेसने तेच घर १९२६ साली विकत घेतले. हिंदू धर्मातील सर्वाधिक धार्मिक पुस्तके प्रकाशित करण्याचे श्रेय गीता प्रेसला जाते. गीता प्रेसमुळे सर्व धार्मिक पुस्तके साध्या आणि सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोहचवली जातात,जी प्रत्येक भारतीय वाचतो आणि त्यातून अध्यात्माचा बोध घेतो.

गीता प्रेसचा मुख्य उद्देश हा हिंदू धर्माची शिकवण लोकांपर्यंय पोहोचवणे हाच आहे. गीता प्रेसने रामायण, हनुमान चालीसा आणि शिव चालीसा यांसारखी पुस्तके तसेच लहान मुलांसाठी देवी- देवतांच्या कथांची पुस्तके उपलब्ध करून देत हिंदू धर्म सर्वसामान्यांपर्यंत पोहचवला. या प्रकाशन संस्थेने १४ पेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये ग्रंथ-पुस्तके प्रकाशित केली आहेत.

गीता प्रेस आणि भारतीय रेल्वे

गीता प्रेस आणि भारतीय रेल्वे (indian railways) यांचे अतूट नाते आहे. लांबच्या पल्ल्याच्या ट्रेन प्रवासाने गीता प्रेसला सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवले. रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सवर गीता प्रेसची पुस्तके प्रामुख्याने मिळतात. संस्कृतीप्रिय,वाचनप्रिय भारतीयांनी प्रवासादरम्यान गीता प्रेसची पुस्तके आपसूकच आपलीशी केली. अजूनही लांबच्या पल्ल्याच्या प्रवासादरम्यान भारतीय रेल्वेच्या अनेक बुक ठिकाणी अशा स्वरूपाचे स्टॉल्स आहेत, जिथे गीता प्रेसची पुस्तके उपलब्ध असतात.

श्रीमद भगवत गीता” आणि प्रेसची सुरुवात

गीता प्रेसची सुरुवात भगवद्गीतेच्या प्रकाशनापासून झाली. यंदा, ही १८०० पुस्तकांचे प्रकाशन करण्याचे प्रकाशन संस्थेचे उद्दिष्ट आहे. संस्थेतर्फे दररोज सरासरी ६० हजार पुस्तके वितरित केली जातात.

“कल्याण मासिक”:-

कल्याण” हे मासिक ही या प्रकाशन संस्थेची खास ओळख आहे. आजपर्यंत कल्याण या मासिकाच्या सुमारे १६ कोटी ७४ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.

एप्रिल १९२६ मध्ये दिल्लीत झालेल्या मारवाडी अग्रवाल सभेच्या ८ व्या अधिवेशनात घनश्यामदास बिर्ला यांनी भाईजींना त्यांचे विचार आणि तत्त्वांवर आधारित मासिक काढण्याचा सल्ला दिला. गीताप्रेसचे संस्थापक सेठजी जयदयाल गोयंका यांच्या संमतीने २२ एप्रिल १९२६ रोजी मासिकाचे नाव “कल्याण” असे निश्चित करण्यात आले. त्याच वर्षी कल्याणचा पहिला अंक मुंबईहून भाईजी हनुमानप्रसाद पोद्दार यांच्या संपादनाखाली प्रकाशित झाला.

गीता प्रेसने गाठलेले उच्चांक…

गीता प्रेसने ४१ कोटींहून अधिक पुस्तके प्रकाशित केल्याचा दावा केला आहे. यामध्ये भगवत् गीतेच्या १६. २१ कोटी, तुलसीदासांवरील ११.७३ कोटी, पुराण-उपनिषदांच्या २.६८ कोटी आणि मुलांसाठी प्रकाशित ११.०९ कोटी प्रतींचा समावेश आहे. २०२२ मध्ये त्यांच्या ग्रंथांची विक्री १०० कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे मानले जाते, तर २०२१ मध्ये ही विक्री ७८ कोटी रुपये इतकी होती. २०१९ मध्ये ६९ कोटी रुपयांची वार्षिक विक्री उलाढाल नोंदवली गेली. तर २०१८ मध्ये ६६ कोटी, २०१७ मध्ये ४७ कोटी आणि २०१६ मध्ये ३९ कोटी इतकी उलाढाल होती. गीता प्रेस त्यांच्या पुस्तकांच्या कमी किमतीचे श्रेय थेट कच्चा माल खरेदी ज्यांच्याकडून केली जातो, त्या स्रोतांना देते. त्यामुळे ग्राहकांसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नाही, किंबहुना हे प्रकाशन प्रत्यक्ष प्रकाशनासाठी कोणतीही देणगी स्वीकारत नाही किंवा ते त्यांच्या प्रकाशनांची कुठलीही प्रसिद्धी,जाहिरातही करत नाही.

जगातल्या सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक असणाऱ्या गोरखपूरस्थित गीता प्रेससंस्थेला २०२१ सालचा “गांधी शांतता पुरस्कार” जाहीर झाल्या बद्दल “गीता प्रेस” तसेच सकल हिंदू समाजाचे हार्दिक अभिनंदन…

https://www.gitapress.org/

https://www.drishtiias.com/hindi/daily-news-analysis/gandhi-peace-prize

Back to top button