News

यू एन मध्ये ‘नित्य’ उद्योग

शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की यू एन मध्ये नेमके काय सुरु आहे ? तर झाले असे की नित्यानंद बाबाने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला त्याच्या “‘युनाइटेड स्टेट्स ऑफ कैलासा” देशातून शिष्टमंडळ पाठवले आहे.वाह रे नित्यानंद बाबा..

कोण आहे हे नित्यानंद बाबा…

नित्यानंदांचे (nithyananda swami) खरे नाव राजशेखरन असून त्यांचा जन्म १ जानेवारी १९७८ साली तामिळनाडू राज्यात झाला. त्यांचा वडीलांचे नाव अरुणाचलम आणि आईचे नाव लोकनायकी आहे. १९९५ साली नित्यानंदने मॅकेनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. असे सांगितले जाते की, वयाच्या १२ व्या वर्षांपासूनच त्याने रामकृष्ण मठात धार्मिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. १ जानेवारी २००३ रोजी त्यांनी स्वतःचा पहिला आश्रम बंगळुरुच्या बिदादी येथे सुरू केला. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी आश्रम सुरू केले.नित्यानंद स्वामी स्वतःला ईश्वरीय अवतार मानतात.

२०१० साली दोन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप नित्यानंदांवर करण्यात आला होता. या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर बलात्कार प्रकरणात पौरुषत्वाची चाचणीचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. २०१९ साली गुजरात पोलिसांनी नित्यानंदानी भारतामधून पलायन केल्याची माहिती न्यायलयाला दिली. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ साली नित्यानंदांना जामीन मंजूर झाला.याचाच फायदा घेऊन देशातून पळून गेले.

बलात्काराच्या आरोपाखाली भारताबाहेर पळालेल्या स्वयंघोषित स्वामी नित्यानंद यांनी केलेल्या एका दाव्यामुळे त्यांचा तथाकथित देश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २४ फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या जिनिव्हा येथे संपन्न झालेल्या “आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क” परिषदेत ( United Nations Committee on Economic, Social and Cultural Rights – CESCR) चर्चा करण्यासाठी नित्यानंदच्या तथाकथित देश ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’चे प्रतिनिधी सहभागी झाले होते. स्वतः नित्यानंद बाबांनी आपल्या ट्विटरवर या बैठकीचे फोटो ट्विट केले आहेत.

विशेष म्हणजे नित्यानंदांचा ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’ (USK) हा देश संयुक्त राष्ट्र संघाच्या नोंदणी केलेल्या १९३ देशापैकी नाही. २०१९ साली नित्यानंदांवर बलात्कार आणि लहान मुलांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नित्यानंदानी भारतातून पलायन केले. २०२० साली नित्यानंदानी इक्वाडोरच्या समुद्रकिनारी असलेले एक बेट विकत घेऊन तिथे स्वतःचा देश स्थापन केल्याचा दावा केला. या देशाला ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’( united states of kailasa) असे नाव देण्यात आले असून त्यांचा स्वतःचा ध्वज आहे, संविधान, आर्थिक व्यवस्था, पासपोर्ट देखील आहे.

संयुक्त राष्ट्र(united nation) संघातर्फे जिनिव्हामध्ये “आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क” परिषदेची १९ वी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत युएसके(united states of kailasa) कडून काही सदस्य सहभागी झाले. त्यांनी युएसकेकडून चर्चेत सहभाग घेतला, असे आयएएनएस या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.युएसकेच्या प्रतिनिधिंनी या चर्चेत सहभाग कोणत्या आधारावर घेतला, हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

युएसकेच्या विजयाप्रिया नित्यानंद यांनी दावा केला की, कैलासा हा प्राचीन हिंदू विचारांची अंमलबजावणी करणारा देश आहे. हिंदू तत्त्वांनी वेळोवेळी आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. शाश्वत विकासासाठी स्वदेशी उपायच योग्य असल्याचे विजयाप्रिया यांनी सांगितले. तसेच नित्यानंद यांचा भारतात छळ करण्यात आल्याचेही विजयाप्रिया यांनी नमूद केले. नित्यानंद यांच्या प्रवचनावर बंदी घालण्यात आली तसेच त्यांना मातृभूमीतून हद्दपार व्हावे लागले. नित्यानंद यांना मदत करण्यासाठी काय केले जाऊ शकते? असा प्रश्न विजयाप्रिया यांनी सभागृहाला विचारला. आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार पॅनेलमधील कोणत्याही तज्ज्ञाने युएसकेच्या प्रश्नांना किंवा टिप्पण्यांना उत्तर दिले नाही.

‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’ नेमके आहे कुठे ?

दक्षिण अमेरिकेच्या इक्वाडोर येथील एक बेट नित्यानंद यांनी विकत घेतले आहे. भारतापासून १७ हजार किमीच्या अंतरावर हे बेट आहे. लोकसंख्येच्या बाबत बोलायचे झाल्यास कैलासाच्या वेबसाईटने दावा केला आहे की, हिंदू धर्माला माननारे जगातील २०० कोटी लोक त्यांचे नागरिक आहेत. मात्र संयुक्त राष्ट्र संघात बोलत असताना विजयाप्रियाने कैलासामध्ये २० लाख हिंदू राहत असल्याचे सांगितले. तसेच १५० देशांमध्ये कैलासाने दूतावास कार्यालय आणि स्वयंसेवी संस्था स्थापन केल्या आहेत. या देशाचा हिंदू हा एकमेव धर्म असून इथे संस्कृत, हिंदी, तामिळ आणि इंग्रजी वापरल्या जातात. तसेच कैलासामध्ये स्वतःची घटना असून हिंदू धर्म शास्त्र आणि मनुस्मृतीच्या आधारावर ही घटना आहे.

स्वयंघोषित नित्यानंद बाबांच्या हिंदुराष्ट्राला विरोध असण्याचे काहीच कारण नाही पण भारतात खंडणी, बलात्कारासारख्या जघन्य अपराधांचे आरोप असलेल्या या स्वयंघोषित नित्यानंद बाबांनी सार्वभौम भारताच्या न्यायव्यवस्थेला झोकांडी देऊन असे परागंदा होण्यापेक्षा; भारतात येऊन न्याय प्रक्रियेला सामोरे जाणेच न्यायोचित ठरेल.

भारतात साधू-संतांना अटक होणे काही नवीन नाही. २००४ साली जयेंद्र शंकराचार्यांना तर एन दिवाळीच्या दिवशी अटक करण्यात आली होती.ते धीरोदात्तपणे या अटकेला सामोरे गेले आणि पुढे भारताच्या न्यायव्यवस्थेने खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. आपल्या देशाला हिंदू राष्ट्र म्हणणाऱ्या स्वयंघोषित नित्यानंद बाबांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधी शंकराचार्यांचा आदर्श डोळ्यासमोर हे उचित नव्हे का ?

भारताच्या न्याय प्रक्रियेतून तावूनसुलाखून बाहेर पडल्यावर या स्वयंघोषित नित्यानंद बाबांनी जगाच्या पाठीवर कुठेही जरूर हिंदू राष्ट्राची(hindurashtra ) स्थापना करावी. जगभरातील हिंदू समाज त्यांचे खुल्या दिलाने स्वागतच करेल.

“India is the mother of religion. In her are combined science and religion in perfect harmony, and that is the Hindu dharma, and it is India that shall be again the spiritual mother of the world” – Annie Besant

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/shankaracharya-jayendra-saraswathi-overcame-ordeal-of-murder-charge-in-2013/articleshow/63109696.cms

Back to top button