CultureSpecial Day

बाबूजी:-सुधीर फडके

काव्याची समज अन् संगीताचं ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा

बाबूजी.अक्षरे केवळ तीनच. पण सातही सूर त्यात ओतप्रोत भरलेली. प्रत्येक स्वर सच्चा. आतून आलेला. काव्याची समज अन् संगीताचं ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा. त्यांचं हरएक गाणं म्हणजे एक आगळा अनुभवच. कारण तिथं प्रतिमेपेक्षा प्रतिभा मोठी.

सुधीर फडके यांचा जन्म २५ जुलै १९१९ ला कोल्हापुरातील विनायक वामन फडके यांच्या घरात झाला. त्यांचे मूळ नाव रामचंद्र फडके. सुधीर फडके यांचे वडिल कोल्हापुरातील नामांकित वकील होते. देशभक्त व समाज सेवक असणारे फडके वकील यांना आदराने लोक ‘कोल्हापुरचे टिळक’ म्हणून गौरवित असत. संगीत व साहित्यप्रेमी फडके वकिलांच्या घरी ग्रामोफोन रेकॉर्डचा उत्तम संग्रह होता.

घरी शास्त्रीय संगीताच्या दुर्मिळ तबकडयांचा खजिना. पण ही गाणी ऐकण्याच्याही अधीच वयाच्या तिस-या वर्षापासून राम (बाबुजीचं पाळण्यातलं पहिलं नाव) दारात येणा-या भिक्षेक-यांच्या गाण्यांची नक्कल करू लागला होता. वयाच्या सातव्या वर्षी वडिलांनी त्याला पं. वामनराव पाध्ये यांच्याकडे संगीत साधनेसाठी धाडलं. अकराव्या वर्षी पाध्येबुवांनी रामला कोल्हापुरात भरलेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या परिषदेत गायला लावलं आणि ह्या लहान वयात पोराने आपल्या गायकीने सा-यांना दिपवून टाकलं.

या थोर संगीतकाराचा महिमा सांगायला एक ‘गीत रामायण’ पुरेसं आहे. १९५५ सालच्या रामनवमीपासून पुणे आकाशवाणीवरून सुरू झालेलं ‘गीत रामायण’ मराठीपणाची सांस्कृतिक खूण म्हणून आजही ओळखलं जातं. गदिमांची गीतं आणि बाबुजींची स्वररचना यांनी मराठी मनावर मोठंच गारूड केलं. या कार्यक्रमाच्याही अनेक आख्यायिका आहेत. अगदी पहिल्या ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ या गाण्यापासून. हे गीतच म्हणे रेकॉर्डिंगपूर्वी हरवलं. प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या दिवशी पहाटे साडेचार वाजता गदिमांनी ते नव्याने लिहून दिलं आणि साडेसातला बाबुजींनी त्याला चाल लावून गाऊन ध्वनिमुद्रितही केलं आणि पावणेआठला ते प्रसारित झालं.

कलावंत म्हणून बाबुजींचा प्रवास असा समृध्द झालेला असला तरी त्यांनी स्वत:ला कलावंत म्हणवून घेण्यापेक्षा राष्ट्रभक्त म्हणवून घेणं जास्त पसंत केलं. त्यांनी हिंदूराष्ट्राचं स्वप्न पाहिलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मनस्वी प्रेम केलं.याच बांधिलकीतून आणि सावरकरांच्या प्रेमातून त्यांनी त्यांच्यावर भव्य चित्रपट निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं. हा चित्रपट पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांनी पराकोटीची शर्थ केली. आपल्या मनातलं चित्र पडद्यावर यावं, हा त्यांचा हट्ट होता. त्यापायी त्यांनी अनेकाचे रोष पत्करले. वाद ओढवून घेतले. टीका सहन केली. पण अंतिमत: स्वतंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पडद्यावर आला.

आपलं एक मोठं स्वप्न पूर्ण झाल्याची, कृतार्थतेची भावना घोऊन बाबुजी गेले आहेत. आपलं अमूल्य संगीतधन नव्या पिढीकडे सोपवून ते गेले आहेत. ही अक्षयधनाची पोतडी उघडून पाहताना ‘तुझे गीत गाण्यासाठी सूर राहू दे’ एवढंच आपण म्हणू शकतो.

Back to top button