(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)
स्वातंत्र्यानंतर आंदोलनाची धार वाढली..
स्वातंत्र्यानंतर आधुनिक सनदशीर मार्गांनी रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आंदोलन सुरु झाले होते पं. मदन मोहन मालवीय यांनी पुढाकार घेऊन १९३० साली ‘अखिल भारतीय रामायण महासभा’ नावाची संघटना स्थापन केली होती. ह्या संघटनेला म. गांधींचा आशीर्वाद लाभलेला होता. ह्या संघटनेने पहिली काही वर्षे अर्ज विनंत्या करणारा पत्र व्यवहार इंग्रज सरकारबरोबर केला. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. म्हणून १९४० सालानंतर सनदशीर आंदोलन सुरु करण्याचा प्रयत्न केला. त्यातून १९४४ साली सत्याग्रह देखील केला गेला. पण नंतर स्वातंत्र्यलढ्याची धार वाढली तसे हे आंदोलन काहीसे मागे पडले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अखिल भारतीय रामायण महासभेने पुन्हा उचल घेतली व सोरटी सोमनाथप्रमाणेच अयोध्येच्या रामजन्मस्थान मंदिराचा जीर्णोद्धार स्वतंत्र भारताच्या सरकारने करावा ह्या मागणीसाठी सत्याग्रह सुरु केला. ते आंदोलन १९४८ साली झालेल्या म. गांधींच्या खुनामुळे थांबवावे लागले तरी १९४९ साली पुन्हा सुरु झाले. त्यावर्षीच्या २२/२३ डिसेंबरच्या मध्यरात्री ‘त्या’ इमारतीच्या गर्भगृहात बालरूपातील रामाची ‘रामलल्ला’ची मूर्ती प्रकट झाली.दुर्दैवाने स्वतंत्र भारताच्या पं. नेहरू सरकारने त्या आंदोलनाची उपेक्षा केली. त्यामुळे व त्या इमारतीत ‘रामलल्ला’ची पूजा अर्चा नियमित सुरु झालेली असल्यामुळे काही काळ ते आंदोलन बाजूला पडले. पण, १९८०च्या दशकात त्या विषयाने पुन्हा एकदा उचल खाल्ली. पुढची चाळीस वर्षे अयोध्या व रामजन्मभूमी हा मुद्दा देशाच्या सामाजिक,राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिला.
७ एप्रिल १९८४ रोजीचे अधिवेशन आणि लढ्याची नांदी…
रामजन्मभूमी मुक्तीकरिता एक दिर्घकाळ चालणारा, अत्यंत सुनियोजित असा लढा १९८३ साली सुरु झाला. केवळ पाच वर्षांच्या आत या लढ्याने राष्ट्रव्यापी चळवळीचे रुप धारण केले. हे आंदोलन सुरु केले होते विश्व हिंदू परिषदेने !
१९६४ साली स्थापन झालेल्या विश्व हिंदू परिषदेने स्थापनेपासूनच परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुननिर्मितीचा आग्रह धरला होता. विहिंपच्या पुढाकारातून १९८३ साली उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथे एक हिंदू संमेलन झाले. त्या संमेलनात अयोध्या, मथुरा व काशी ही स्थाने व तेथील मंदिरे मुक्त करण्याबाबत ठराव केला गेला. ह्या ठरावाचे पुढचे पाऊल म्हणून जनजागृती करून हिंदू समाज संघटीत करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घ्यावा असेही त्या संमेलनात निश्चित केले गेले. त्या ठरावाला अनुसरून ७ एप्रिल १९८४ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे विश्व हिंदू परिषदेने धर्मसंसदेचे पहिले अधिवेशन आयोजित केले. त्या अधिवेशनात या लढ्याची नांदी झाली.
अनेक पंथोपपंथांचे शेकडो धर्माचार्य या अधिवेशनात एकत्र आले होते. ह्या धर्मसंसदेपूर्वी विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेऊन ‘विराट हिंदू समाज’ नावाच्या व्यासपीठाचे आयोजन केले होते.
याच येळाव्यात राम-जन्म-भूमी-मुक्ती-यज्ञ-समितीचे महामंत्री दाऊ दयाळ खन्ना यांनी ४ प्रस्ताव ठेवले. ते पुढीलप्रमाणे…
(१) रामजन्मभूमीला लावलेली कुलुपे ताबडतोब काढण्यात येऊन ती वास्तू हिंदूच्या स्वाधीन करण्यात यावी.
(२) मथुरेतील कृष्ण जन्मभूमीवरील ईदगाह हिंदूंच्या ताब्यात आणि काशी विश्वनाथाच्या मंदिरावर बांधलेली ग्यानव्यापी मशीद काशी विश्वनाथाच्या न्यासाला देण्यात यावी.
(३) हिंदू जनतेला हे विशाल संमेलन आवाहन करत आहे की, हे कार्य पूर्ण होईपर्यन्त हिंदूंनी संघटितपणे तन-मन-धन अशा सर्वप्रकारे त्याग आणि बलिदानासाठी तयार असावे.
(४) मुस्लीम बांधवांनी हजरत मुहम्मद साहेबांचा आदर्श ठेवून, कब्जा केलेली मंदिरे हिंदूंना परत करण्यास मदत करावी…
अयोध्येची रामजन्मभूमी, मथुरेची श्रीकृष्ण जन्मभूमी व काशीविश्वेश्वराचे मूळ स्थान ही तीन पवित्र धर्मस्थळे सरकारने मुक्त करुन हिंदूंच्या ताब्यात द्यावीत व हिंदू समाजाने त्यांचे पुननिर्माण करावे यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय या धर्मसंसदेने घेतला व या आंदोलनाची उभारणी करण्याचा आदेश विश्व हिंदू परिषदेला दिला.
सर्वप्रथम श्री रामजन्मभूमी मुक्तीचा प्रश्न हाती घ्यावा असेही ह्या धर्मसंसदेने ठरवले व त्यासाठी ‘श्रीरामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती’ स्थापना केली. ह्या समितीच्या नेतृत्वाखाली ३५ वर्षे अविरत चाललेला हा संघर्ष २०१९ साली पूर्ण यश मिळाल्यानंतरच संपला.
क्रमशः