RSS

काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा (लेखमाला – विश्वगुरु भारत – भाग 6)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या(CONGRESS) अहिंसा चळवळीत डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. मातृभूमी परकियांच्या पाशातून संपूर्णपणे मुक्त झाली पाहिजे हेच त्यांचे एकमेव ध्येय होते. तातडीचे लक्ष्य आणि साधने वेगवेगळी असली तरी ते एकाच अंतिम ध्येयाप्रत जाणारे होते. त्यामुळेच काँग्रेसच्या अहिंसक चळवळींत सहभागी होतानाच सशस्त्र क्रांतिकारकांशी असलेला डॉक्टरांचा संपर्क व त्यांना असलेला त्यांचा पाठिंबा कायम राहिला.

स्वातंत्र्यलढ्यादरम्यान सामाजिक परिवर्तनाच्या तसेच अनेक प्रकारच्या राजकीय चळवळी, सशस्त्र क्रांतिकारी संघटना, अशा प्रकारच्या राष्ट्रीय चळवळींत डॉ. हेडगेवार(HEDGEWAR) यांनी भाग घेतला. राष्ट्रकार्याची तीव्र आस असल्याने या कार्यांत डॉक्टर एकनिष्ठपणे सहभागी झाले. त्यासोबतच त्या-त्या संस्थांच्या कार्यपद्धतीचा त्यांनी जवळून अभ्यास केला. ब्रिटिश राज्यकर्त्यांना देशाबाहेर हाकलण्यासाठी कोणताही मार्ग हा न्याय्य आहे, असे डॉक्टरांचे मत होते. याच विचारातून त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अहिंसा चळवळीतही सहभाग घेतला होता. मातृभूमी परकियांच्या पाशातून संपूर्णपणे मुक्त झाली पाहिजे हेच त्यांचे एकमेव ध्येय होते.

तातडीचे लक्ष्य आणि साधने वेगवेगळी असली तरी ते एकाच अंतिम ध्येयाप्रत जाणारे होते. त्यामुळेच काँग्रेसच्या अहिंसक चळवळींत सहभागी होतानाच सशस्त्र क्रांतिकारकांशी असलेला डॉक्टरांचा संपर्क व त्यांना असलेला त्यांचा पाठिंबा कायम राहिला.  


काँग्रेसच्या मंचावर डॉ. हेडगेवार

महात्मा गांधी(MAHATMA GANDHI) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा राष्ट्रव्यापी विस्तार झाला होता. त्याकाळी लोकमान्य टिळक महाराष्ट्रातील सर्वमान्य नेतृत्व होते.  सांस्कृतिक राष्ट्रवादाबाबत कॉंग्रेसमध्ये एकूण अनास्था असली तरी, टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाने भारलेल्या डॉ. हेडगेवारांनी काँग्रेसच्या मंचावरून सांस्कृतिक राष्ट्रवादाची ठोस मांडणी सुरू केली. आपल्या काही काँग्रेसी मित्रांना सोबत घेऊन त्यांनी नागपूर राष्ट्रीय संघ उभा केला. या संघटनेने संपूर्ण स्वातंत्र्याची उघड मागणी केली आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाची हिरीरीने मांडणी सुरू केली. दरम्यान, मध्य प्रांतातील काँग्रेसच्या समितीने डॉ. हेडगेवार यांची संकल्प या साप्ताहिकाच्या संरक्षकपदी नेमणूक केली. डॉक्टरांनी ही जबाबदारी एकनिष्ठपणे स्वीकारली. महाकौशल प्रांताचा दौरा करताना त्यांचा अनेक युवकांशी संपर्क झाला.

१९१९ साली नागपुरात असताना युवकांच्या सभांमध्ये हेडगेवारांनी राष्ट्रभक्तीवर अनेक व्याख्याने दिली. त्या व्याख्यानांनी भारलेल्या अनेक युवकांनी देशसेवेसाठी आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा डॉक्टरांनी युवकांचा उत्साह आणि चैतन्याचा योग्य दिशा देण्यासाठी राष्ट्रीय उत्सव मंडळाची स्थापना केली. पुढे अनेक वर्षे ते या संघटनेचे कार्यवाह होते. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून या संघटनेने युवकांना हिंदू धर्म, राष्ट्रीय संस्कृती, स्वातंत्र्याचे महत्त्व आणि ब्रिटिश शासकांनी आपली संस्कृती व आस्था नष्ट करण्यासाठी आखलेले षडयंत्र याबाबत युवकांना जागृत करण्याचे कार्य केले. मध्यप्रांतातील डॉ. मुंजे, लोकमान्य अणे, शरद पेंडसे अशा अनेक प्रतिष्ठित नेत्यांनी या संघटनेच्या सभांमध्ये युवकांसमोर प्रेरणादायी भाषणे केली.

वेगवेगळी मातृभाषा आणि धर्म असणाऱ्या युवकांनी भारतमातेचा आदर करणे सुरू केले आणि थोड्याच काळात एक सशक्त संघटना उभी राहण्यास प्रारंभ झाला. १९२० साली काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात होते. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठीच्या तयारीचा भाग म्हणून जानेवारी महिन्यात डॉ. हेडगेवार यांच्या मदतीने डॉ. परांजपे यांनी भारतीय सेवक मंडळाची स्थापना केली. लोकसहभागाचे उपक्रम चालविणे आणि युवकांना समाजसेवेत सहभाग वाढविणे यासाठी काम करणाऱ्या या मंडळाचे अध्यक्षपद स्वाभाविकपणे डॉक्टरांकडे आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे एक हजार युवक संस्थेशी जोडले गेले. हे अधिवेशन लोकप्रिय करण्यासाठी अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या. डॉ. हेडगेवार यांना व्यवस्थापन समितीत महत्त्वाचे स्थान देण्यात आले.

काँग्रेस अधिवेशनात कार्यकर्ताप्रमुख डॉ. हेडगेवार


काँग्रेसचे अधिवेशन २६ डिसेंबर १९२० रोजी सुरू झाले. तत्पूर्वी डॉ. हेडगेवार आणि त्यांच्या काँग्रेसमधील मित्रांनी संपूर्ण स्वातंत्र्य हे आपले लक्ष्य असा ठराव तयार केला व तो गांधीजींपुढे मांडला. मात्र, स्वराज्य या शब्दात स्वातंत्र्य अनुस्यूत असल्याचे  गांधीजीनी शांतपणे दाखवून दिले आणि ते ठराव बारगळला. तरीही डॉ. हेडगेवार आणि त्यांचे मित्र यांनी नागपूर अधिवेशनात सहभाग घेतला. अत्यंत भव्य आणि यशस्वी झालेले हे अधिवेशन काँग्रेसचे आजवरचे सर्वात मोठे अधिवेशन आहे.

स्वयंसेवी कार्यकर्ता दलाचे प्रमुख म्हणून अधिवेशनाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित जनसमुदायासाठी मोजक्या वेळात उत्तम व्यवस्था डॉ. हेडगेवार यांनी उभी केली. शिस्तबद्धता, एकनिष्ठता आणि प्रखर इच्छाशक्ती नसेल तर सेवेची आवड असणारा माणूससुद्धा उदात्त लक्ष्यापासून विचलित होऊ शकतो या काळात डॉक्टरांच्या लक्षात आले.  

आयोजन समितीच्या बैठकीत काँग्रेसच्या उद्दिष्टांबाबतचा ठराव मांडताना – भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना आणि भांडवलवादाच्या शोषणातून अन्य देशांची मुक्तता – असे शब्द डॉक्टरांनी वापरले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी आणि ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरोधात अन्य देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न प्रस्तावाच्या या भाषेवरून सहज लक्षात येतो. हा प्रस्ताव म्हणजे दूरगामी परिणाम करणारे राजकीय, सामरिक व दूरदर्शी पाऊल होते. परंतु, त्यांची दृष्टी आणि खोली समजून घेण्यात कमी पडलेल्या नेत्यांमुळे हा प्रस्ताव संमत झाला नाही. डॉ. हेडगेवार यांच्या नागपूर अधिवेशनातील सहभागामुळे त्यांचे प्रखर व्यक्तिमत्त्व, राष्ट्रवादाप्रति कुठल्याही तडजोडीशिवाय असणारी एकनिष्ठता, संपूर्ण स्वातंत्र्यासाठी धडपड आणि वैचारिक पार्श्वभूमीवर आपल्याच नेत्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याची तयारी अशा अनेक गुणांची सर्वांना जाणीव झाली. काँग्रेसमधील मित्रांशी वैचारिक मतभेद असूनही एक आदर्श नेत्याच्या रुपात ते डॉक्टरांकडे पाहात होते. असहकार चळवळीत निर्भिडपणे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करताना त्यांनी आपल्या प्रखर राष्ट्रवाद आणि तत्त्वांशी अजिबात तडजोड केली नाही हे आवर्जून नमूद करायला हवे.

कौशल्यविकास आणि ध्येयपूर्तीचा विचारप्रवाह

नागपूर अधिवेशनापूर्वी काँग्रेसच्या प्रांतीय समितीने मध्यप्रांतात असहयोग मंडळाची स्थापना केली. डॉक्टरांना यात लोकसभा आयोजित करण्याचे महत्त्वाचे काम देण्यात आले. त्यांची कार्यपद्धती आणि समर्पण पाहून काँग्रेस नेतृत्त्व प्रभावित झाले. डॉक्टरांची ओळख आता काँग्रेसचा नेता अशी होऊ लागली. डॉ. हेडगेवारांचे जवळचे सहकारी नारायण हरी पालकर यांनी त्यांच्या चरित्रात लिहिले आहे की, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रसंगी अहिंसेचा मार्ग पत्करायला त्यांची ना नव्हती. त्याचप्रमाणे याच लक्ष्यासाठी असहकाराचा मार्ग अवलंबावा लागला तरी त्यांना हरकत नव्हती. परकियांना देशाबाहेर हाकलून देण्यासाठी पुढे येणाऱ्या प्रत्येकासाठी डॉक्टरांना अत्यंत आदर होता. अशा व्यक्तींना त्यांनी मोठ्या मनाने सहकार्य केले. नागपुरातील अनेक समित्यांमध्ये कार्यरत असताना संघटन कौशल्य आणि ध्येयाप्रती असणारी निष्ठा यांचा खोल ठसा त्यांनी निर्माण केला. संपूर्ण स्वातंत्र्यासाठी असहकार किंवा सशस्त्र अशा प्रत्येक मार्गाशी आपण वचनबद्ध आहोत हे त्यांनी स्पष्ट केले होते. लवकरात लवकर भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे हीच त्यांची इच्छा होती. सर्व नद्यांचे अंतिम लक्ष्य समुद्राला जाऊन मिळणे हेच असते. तसेच स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, सत्याग्रही, राष्ट्रवादी कवी, इतकेच काय आपापल्या घरात ब्रिटिशांच्या विरोधात देवाला प्रार्थना करणारे या सगळ्यांचे एकच लक्ष्य आहे, ते म्हणजे अखंड भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य असे त्यांचे मत होते. अशा प्रकारे मी च्या भावनेपासून उन्नत होत आपण तत्त्वाचा प्रसार करणाऱ्या डॉक्टरांनी  देशकार्यासाठी विविध विचारधारांच्या स्वातंत्र्यसैनिकांशी तनमनधन पूर्वक जोडले जाण्यात कधीही कमीपणा मानला नाही.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक आहेत)

Back to top button