CultureReligion

एकात्मता आणि नवचैतन्याची संजीवनी देणारे श्री गुरू नानक

श्री गुरू नानक (१४६९-१५३९) हे बनारसचे संत कबीर आणि रवीदास तसेच बंगालचे चैतन्य आणि आसामचे शंकरदेव यांच्यासारख्या भारताच्या विविध भागांतील आध्यात्मिक गुरूंचे समकालीन होते. युगचैतन्याच्या प्रभावामुळे या संतांच्या आध्यात्मिक सत्याविषयीच्या विचारांत सारखेपणा असला तरी मानवसमाजातील दलित वर्गाविषयी करुणा, अन्यधर्मीयांविषयी असलेले औदार्य आणि न्यायपूर्ण समाजासाठी केलेले तळमळीचे आवाहन यामुळे गुरू नानकांची जीवनदृष्टी आणि जीवनजाणीव वेगळेपणाने उठून दिसते. आपल्या द्रष्टेपणामुळे त्यांनी निरंकुश राज्यकर्ते यांच्यापासून मुक्त अशा आध्यात्मिकतेने व नैतिकतेने प्रेरित होणाऱ्या एकात्म व कर्मशील जीवनाचे स्वप्न पाहिले. सत्य-ज्ञान, भक्ती आणि कर्माचा मार्ग दाखवून, अध्यात्माच्या युगानुकूल आचरणातून समाजाचे उत्थान व आत्मोद्धार करण्याचा मार्ग दाखवला. यामुळे संभ्रमीत झालेल्या भारतीय समाजाला एकात्मता आणि नवचैतन्याची संजीवनी मिळाली.   

गुरू नानकदेव यांनी समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी संवादाचा मार्ग अवलंबला. आयुष्यभर त्यांनी संपूर्ण भारतासह अनेक देशांच्या यात्रा म्हणजे उदासी केल्या. प्रथम तीन यात्रा भारतातील चार दिशांना केल्या. मुलतानपासून श्रीलंका आणि लखपत (गुजरात) ते कामरूप, ढाकासह देशभरातील सर्व आध्यात्मिक केंद्रांना त्यांनी भेट दिली. चौथ्या उदासीत भारताबाहेर बगदाद, इराण, कंदाहार, दमास्कस, इस्रायल, मक्का व मदिनापर्यंत प्रवास केला.  किरत कर, नाम जपुं, वंड छँख अर्थात पुरुषार्थ करा, देवाचे स्मरण करा आणि वाटून खा असा उपदेश त्यांनी समाजाला केला.  

जीवनपट

गुरू नानकांचा जन्म मध्य पंजाबातील लाहोरजवळ राय-भोए-की तलवंडी या गावात (आता ते पाकिस्तानात आहे) झाला. नंतर हे गाव त्यांच्या नावावरुन नानकाना साहिब म्हणून ओळखले जाऊ लागले. गुरू नानक लहानपणापासूनच चिंतनशील स्वभावाचे होते आणि जसजसे मोठे होत गेले तसतसे विविध धर्मांतील संतांचा आणि साक्षात्कारी पुरुषांचा सत्संग करण्याची त्यांची आवड वाढतच गेली. पुढे त्यांनी शिखांच्या उदासी नावाच्या संप्रदायाची स्थापना केली. या पंथाचे अनुयायी विरक्त जीवन जगत धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ज्ञानसाधना करतात. अठराव्या शतकात जेव्हा शिखांचा छळ करण्यात येत होता तेव्हा यांनी परंपरागत शीख धर्माचा स्वीकार केलेला नसल्यामुळे ते राज्यकर्त्यांच्या क्रोधाला बळी पडले नाहीत. शिखांच्या मंदिरांची देखभाल करीत त्यांनी सामान्य जनतेत शीख धर्माचा प्रचार केला.

मतमतांतरांनी फूट पाडणारी विभाजक रेखा ही मानवनिर्मित आहे, तिला परमेश्वराची मान्यता नाही.  त्यांनी आपल्या सर्व भौतिक गोष्टींचा त्याग केला आणि ईश्वराची साधना करण्याचा उपदेश देण्यात आपले सर्वस्व समर्पण करण्याचा निश्चय केला. धर्माधर्मातील भांडणात मोडून पडलेल्या भारतात सर्वव्यापक अशा संप्रदायमुक्त सद्‌भावाच्या विश्वात्मक  उदारमताचा प्रचार करण्यासाठी गुरू नानकांनी देशभर यात्रा करायचे ठरवले. धर्मप्रचारासाठी त्यांनी अनेक यात्रा केल्या. या यात्रा त्यांनी अनेक दिशांना केल्या. अनेक वर्षांच्या या दीर्घ प्रवासात त्यांनी जेथे गेले तेथे, संकुचितपणाचा त्याग करण्याचा, मैत्रीचा आणि बंधुभावाचा उपदेश केला आणि सर्वांचा निर्माणकर्ता असलेल्या व समदृष्टीच्या अनन्य अशा परमेश्वराची उपासना करण्यावर जोर दिला. अशा रीतीने त्यांनी अनेक संकुचित सांप्रदायिक प्रवृत्ती नाहीशा केल्या आणि सर्व लोकांना प्रेमाच्या बंधनात बांधले. त्यांनी भारतातील आणि भारताबाहेरील मुस्लिम केंद्रांनाही भेटी दिल्या. मक्केला आणि बगदादलाही ते जाऊन आले. मुस्लिमांना त्यांनी करुणेचा आणि वैराग्यपूर्ण जीवनाचा संदेश दिला. घृणा आणि कट्टरपणा या भावनांनी भरलेल्या वातावरणात ज्या गोष्टीचा अभाव होता त्याची म्हणजेच हिंदू-मुसलमानांनी भावाभावासारखे राहावे याची शिकवण दिली.

गुरू नानकांच्या उपदेशांचे सारभूत सिद्धांत एकेश्वरवाद आणि सर्वात्मवाद हे आहेत. त्यांच्या आध्यात्मिक प्रक्रियेचे मुख्य अंग आहे भक्ती म्हणजेच परब्रह्मावर निष्ठापूर्वक प्रेम. त्यांनी आपल्या शिकवणीत श्रवण, आध्यात्मिक उपदेश ऐकणे व आत्मसात करणे (सुनियाई), मनन(मन्नेई) आणि ध्यान म्हणजेच अंत:समाधी या तीन गोष्टींवर भर दिला आहे. यांना जोड दिली आहे मानवतेची सेवा आणि करुणा या दोन गोष्टींची. कारण यांच्याशिवाय कोणताच आध्यात्मिक शोध पूर्ण होऊ शकत नाही.  गुरू नानकांच्या उपदेशात विनम्रता आणि अहंकाराचा बहिष्कार या दोन गोष्टींवर पुन: पुन्हा जोर देण्यात आला आहे. अहंकार कायम ठेवून ईश्वराशी तादात्म्य होऊ शकणार नाही ही गोष्ट पुन:पुन्हा सांगितली आहे. जीवात्म्याचे अंतिम ध्येय जन्ममरणाच्या चक्रातून प्रार्थना आणि सेवा या मार्गाने सुटका करून घेणे हे आहे. पण काही झाले तरी माणसाने एकट्याने मोक्षाचा शोध घेऊ नये. आपली शिकवण आणि आचरण याद्वारे इतरांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करावा. जग ही एक धर्मशाळा आहे. धर्माचरण करण्याचे स्थान आहे. या जगात राहूनच माणसाने मोहापासून मुक्त झाले पाहिजे. आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गात मोह हा मोठाच अडथळा आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याला प्रतिरोध केलाच पाहिजे. गुरू नानकांनी मोठ्या निष्ठेने आपल्या आदर्शांचा प्रचार केला आणि ते जेथे जेथे गेले तेथे तेथे लोकांनी त्यांचे म्हणणे सन्मानपूर्वक श्रद्धेने ऐकले.

धर्मप्रचाराची त्यांची ही यात्रा जवळपास वीस वर्षे चालली. या यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात ते आपल्या कुटुंबासह रावी नदीच्या किनारी एक लहानसे शेत घेऊन राहिले. हे ठिकाण सध्या गुरदासपूर जिल्ह्यात आहे. या ठिकाणाला करतारपूर म्हणजे परब्रह्माची जहागीर असे नाव दिले गेले. येथेच ते उपदेश करीत राहिले आणि येथेच त्यांनी ‘गुरुबानी’ या पवित्र शब्दग्रंथाची रचना केली. मानवजातीला आध्यात्मिक ज्ञानाचा आणि श्रेष्ठ प्रकारच्या वैराग्याचा उपदेश देण्यात रमून गेलेल्या गुरू नानकांनी आश्विन कृष्ण दशमीला वयाच्या सतराव्या वर्षी सप्टेंबर १५३९ मध्ये या नश्वर जगाचा निरोप घेतला.

गुरू नानकांनी आपल्या आयुष्यातील अखेरचे दिवस करतारपूरच्या आश्रमात ध्यानावस्थेत आणि भक्तीची शिकवण देणाऱ्या उदात्त वाणीची रचना करण्यात घालवले. या बाजूने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना ते आपल्या ज्ञानाचा संदेश देत राहिले. हा आश्रम म्हणजे एक प्रकारची धर्मशाळाच होती आणि येथे बाहेरून येणाऱ्या लोकांच्या भोजनाची सोय केली जात असे. शीख पंथाच्या परिभाषेत याला ‘लंगर’ असे म्हणतात. ही प्रथा गुरू नानकांच्या वेळेपासून आजतागायत चालत आलेली आहे आणि शिखांच्या धार्मिक आचरणाचे अंग बनून राहिली आहे. ही जागा आता पाकिस्तानात आहे. रावीच्या पश्चिम किनाऱ्यावर या जागी आता एक भव्य गुरुद्वारा आहे. मूळ स्थान रावी नदीच्या पुरात वाहून गेले होते, म्हणून रावीच्या पूर्वेकडच्या किनाऱ्यावर भारताच्या हद्दीत डेरा बाबा नानक हा प्रसिद्ध गुरुद्वारा बांधला गेला आहे. गुरू नानकांचे नातू बाबा धर्मचंद यांनी त्याची स्थापना केली. ते आता एक गजबजलेले शहर झाले आहे.

गुरू नानकांची शिकवण सर्व धर्मांविषयी सदभाव बाळगण्यास सांगते. प्रत्येक धर्मातील मूलभूत, नैतिक आणि आध्यात्मिक मर्म शोधून काढण्यावर त्यांचा भर होता. समाजात फूट पाडणाऱ्या मतभेदांना व भेदभावांना थारा देणाऱ्यांची त्यांनी निंदा केली.  हिंदू-मुसलमानात त्यांनी निष्पक्षपणाचे आणि सदभावाचे सारखेच वर्तन ठेवले. करूणेने आणि सत्याने आचरण करणाराच त्यांच्या मते खरा हिंदू होय आणि हेच त्यांच्याही धर्माचे सर्वोच्च आणि आदर्श स्वरुप होते. ज्या देशात स्पृश्यास्पृश्य भेदभाव माजलेला होता त्या देशात दीनदलितांबद्दल गुरू नानकांच्या मनात अतीव सहानुभूती होती. या बाबतीत आणि धार्मिक सहिष्णुतेसारख्या अन्य अनेक बाबतीत गुरू नानक आधुनिक विचारांचे अग्रदूत होते. 

आपल्या जीवनसमाप्तीपूर्वी गुरू नानकांनी एका योग्य वारसाची नेमणूक करायचे ठरवले. गुरूची गादी ही कौटुंबिक वारशाची गोष्ट नव्हती. गुरूंचा उपदेश योग्यतापूर्वक आणि सामर्थ्यपूर्वक पुढे नेणे हे महत्त्वाचे होते. गुरूच्या उच्चपदावर सर्वात योग्य व्यक्तीची करण्याची ही परंपरा शीख धर्माच्या विकासाबरोबर आणखीच दृढ होत गेली. त्याचा परिणाम असा झाला की, उच्च उदात्त स्वभावाचे गुरू मिळत गेले आणि आधीच असंख्य संप्रदाय-उपसंप्रदायांची गर्दी असलेल्या या देशात एका संप्रदायाची भर असे न होता एक क्रांतिकारक चैतन्य निर्माण झाले. त्याने उत्तर भारताच्या इतिहासावर मोठा प्रभाव टाकला आणि लाखो लोकांना मोक्षावस्था मिळवून दिली. गुरू नानकांच्या साधनेने, आणि मूल्यभावाने शीख धर्माचा अभ्युदय झाला. गुरूपदावर बसलेल्या नऊ वारसांनी त्याचा विकास केला. एक देशभक्तिपूर्ण शक्ती म्हणून तो पुढे आला. त्याच्या जोरावर उत्तर पश्चिमेकडून होत असलेल्या आक्रमणांचा त्याने मोठ्या शौर्याने सामना केला होता.  

समारोप

भारतवर्षातील आध्यात्मिक गुरूंमध्ये गुरू नानकांचे स्थान अनन्यसाधारण आहे. सामाजिक न्यायाची सखोल जाणीव आणि एक न्यायपूर्ण समाज निर्माण करण्याची त्यांची तीव्र ओढ ही त्याची कारणे आहेत. सामाजिक विषमतेविषयीचा त्यांचा रोष प्रचंड होता. सिंहासनाधिष्ठित राजापासून ते अधिकाऱ्यांच्या आणि खुशामतखोरांच्या तसेच दिखाऊ धर्माच्या लोभी आणि स्वार्थी उपदेशकांपर्यंत सर्वांच्याच सामाजिक विषमतेविरुद्ध त्यांनी आपल्या शिकवणीतून अनेक प्रकारे प्रहार केले आहेत. उच्छृंखल आक्रमणकाऱ्यांनी भारतातील हिंदू-मुस्लिम महिलांचा अपमान केला आहे हीच गोष्ट त्यांच्या अंत:करणाला टोचत होती. त्यांनी आपल्या दु:खाला आणि आंतरिक वेदनेला जो स्वर दिला तो कोणत्याही एका बाजूसाठी नव्हता. सर्वांसाठी होता.

श्री गुरू नानक यांचे संदेश आजही कालसुसंगत व तितकेच प्रभावी आहेत.  त्याचे अनुसरण करून सर्वदूर प्रसार करणे नक्कीच हितावह आहे. 

Back to top button