News

धर्मांतरविरोधी वटहुकूमानुसार उत्तर प्रदेशात पहिला गुन्हा दाखल

बरेली, दि. ३० नोव्हेंबर : उत्तर प्रदेशात विवाहासाठी जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या धर्मांतरविरोधी वटहुकुमानुसार बरेली जिल्ह्यात पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला आहे.  मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

बरेली जिल्ह्यत देवरीनियान पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा दाखल झाला असून शरीफ नगर खेड्यातील रहिवासी टिकाराम यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच ठिकाणी राहणाऱ्या उवैश अहमद याने  टिकाराम यांच्या मुलीला प्रलोभने दाखवून धर्मांतर  करण्याचा प्रयत्न केला. उवैश अहमद याच्या विरोधात नवीन धर्मांतर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी धर्मातरविरोधी वटहुकूम मंजूर केला होता. त्यानुसार विवाहासाठी प्रलोभने दाखवून धर्मांतर करणाऱ्याला १० वर्षे तुरुंगवास व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. उत्तर प्रदेश बेकायदा धर्मांतर वटहुकूम २०२० चार दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ सरकारने तयार केला होता. त्यात विवाहाच्या निमित्ताने होत असलेल्या धर्मांतरांना पायबंद घालण्याचा उद्देश आहे.

वरिष्ठ पोलिस अधीक्षक रोहित सिंह सजवान यांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेत टिकारामची मुलगी व अहमद हे बारावीला एकत्र शिकत होते. तीन वर्षांपूर्वी अहमद याने मुलीवर धर्मांतरासाठी दबाव आणला. तिने विरोध केल्यानंतर तिचे अपहरण केले. नंतर मुलीचा दुसऱ्याच मुलाबरोबर जूनमध्ये विवाह झाला. तरी अहमदने तिचा माग सोडला नाही. धर्मांतर करून आपल्याशी तिचा विवाह करा, असे सांगून तो मुलीच्या कुटुंबियांना धमकावून सांगत असे.  त्यामुळे टिकाराम यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button