HinduismRSS

डॉ. हेडगेवारांना पुन्हा एकदा सश्रम कारावास(लेखमाला – विश्वगुरु भारत – भाग 12)

असहकार आंदोलनाच्या अपयशातून धडा घेतल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. नव्या ‘सविनय कायदेभंग’ चळवळीचे नेतृत्व गांधीजी करणार होते. ६ एप्रिल १९२० रोजी ऐतिहासिक दांडीयात्रेपासून गांधीजींनी या चळवळीस प्रारंभ केला. तत्कालीन मीठाचा कायदा मोडून गांधीजींनी देशातील नागरिकांना या कृतीचे अनुकरण करत सत्याग्रहात सहभागी होण्याचे आवाहन केले. मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रव्यापी अहिंसा चळवळ उभी राहण्यात याची परिणती झाली.

सविनय कायदेभंग चळवळीस संपूर्ण पाठिंबा

स्वातंत्र्य चळवळीत संघ एकही पाऊल उचलणार नाही असे कसे शक्य होते? तरुण स्वयंसेवकांच्या चमूने गांधीजींनी सूचित केलेल्या ठिकाणी जाऊन आंदोलने करण्यास सुरुवात केली. स्वयंसेवकांचा उत्साह आणि देशभक्तीचा आत्मा लक्षात घेऊन संघचालकांनी गांधीजींच्या नेतृत्वाखालील चळवळीला बिनशर्त पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.

मनापासून चळवळीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना डॉक्टरांनी बोलावून घेतले. चळवळीत सहभागी होण्यासाठी सर्व स्वयंसेवकांना वैयक्तिक स्वरुपात संघचालकांकडून परवानगी घेणे आवश्यक होते. डॉक्टर म्हणाले की स्वातंत्र्य चळवळ ही कोणा व्यक्तिशी वा पक्षाशी संबंधित नसून ते एक राष्ट्रकार्य आहे. संपूर्ण स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य चळवळ सुरू राहिली पाहिजे. विविध पक्ष आणि नेत्यांनी एका छत्राखाली, सामंजस्याने काम न केल्यास ते दीर्घकाल कोणत्याही फलदायी कारणासाठी लढू शकणार नाहीत. ते म्हणाले की, आपण गांधीजींचे नेतृत्व मान्य केले पाहिजे व आपसांतील फरक आणि मतभेद दूर ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले पाहिजे.

डॉक्टरांनी स्वतः सत्याग्रह करून तुरुंगात जाण्याचा निर्णय घेतला. मध्यप्रांतात १८१६ मैल वनक्षेत्रात प्रवेश करण्यास त्याकाळी सरकारने मज्जाव केला होता. कोणालाही आपल्या पशूंकरिता चारा आणण्याची आणि वनात घरे बांधण्याची परवानगीही मिळत नव्हता. त्यामुळे पशूपालन करणारे आणि वनोत्पादनांवर अवलंबून असणाऱ्यांचे हाल होऊ लागले. डॉक्टर हेडगेवार यांनी हा कायदा मोडून सत्याग्रह करण्याचे ठरवले.  
सत्याग्रह करण्यापूर्वी डॉ. हेडगेवार यांनी सरसंघचालकपदाचा राजीनामा दिला व डॉ. परांजपे यांना त्याजागी सरसंघचालक करण्यात आले. जे सगळे स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होतील ते स्वतःच्या वैयक्तिक क्षमतेनुसार सहभागी होतील असेही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या तत्त्वज्ञानात किंवा कार्यात कोणताही बदल झाला नाही आणि निष्ठाही तशीच राहिली.

हजारो स्वयंसेवकांसह डॉक्टरांचा तुरुंगवास

जंगल कायद्याचा भंग २४ जुलै रोजी करण्यात येईल असे निश्चित करण्यात आले. एका विस्तीर्ण मैदानात भगव्या ध्वजाला स्वयंसेवकांनी झुकून अभिवादन केले, प्रार्थना म्हटली. सर्वांना गवत कापण्यासाठी विळे आणि लाकूडफाट्यासाठीची आयुधे देण्यात आली होती. यवतमाळच्या लोहरा जंगलात दहा किमी आत असणाऱ्या एका गावात हा सत्याग्रह करण्यात येणार होता. दहा हजारांहून अधिक लोक हा सत्याग्रह पाहण्यासाठी जमले होते. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जोरदार घोषणा देत डॉक्टरजी आणि त्यांच्या चमूने झाडे आणि गवत कापण्यास सुरुवात केली. कायदेभंग केल्याबद्दल सगळ्यांना अटक झाली. डॉ. हेडगेवार यांना नऊ महिन्यांच्या कठोर कारावासाची शिक्षा झाली. तर अन्य सत्याग्रहींना चार महिन्यांचा तुरुंगवास सुनावण्यात आला. हा जंगल सत्य़ाग्रह स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात यशस्वी सत्याग्रह मानला जातो. डॉ. हेडगेवार यांना पाठिंबा देत त्यांच्या सत्कारार्थ काँग्रेसने एक जाहीर सभाही आयोजित केली.
डॉक्टरांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेची माहिती मिळताच स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी सत्याग्रह सुरू केला आणि भव्य लोकसमुहामध्ये स्वातंत्र्याची ज्योत चेतवली. सरकारने स्वातंत्र्य सावरकरांच्या पुस्तकांवर बंदी घातली. स्वयंसेवकांनी या पुस्तकांचे सार्वजनिक ठिकाणी जाहीर वाचन करून कायदेभंग केला. बाबूराव वैद्य, मार्तंडराव जोग, सीताराम हेकर, विठ्ठलराव गाडगे या संघ कार्यकर्त्यांनी सत्याग्रहात सहभाग घेतला, त्यांना चार महिन्यांचा तुरुंगवास सुनावण्यात आला. अप्पा जोशी आणि दादाराव परमार्थ अशा डॉक्टरांच्या नजिकच्या सहकाऱ्यांनी सत्याग्रह केला आणि स्वयंसेवकांच्या मोठ्या समुहासह ते तरुंगात गेले. नक्की किती स्वयंसेवकांनी सत्याग्रह करून शिक्षा भोगली याचा नेमका आकडा आता देता येणे शक्य नाही, कारण स्वयंसेवकांनी आपली स्वयंसेवकाची ओळख विलीन करून टाकली होती.

आंदोलक स्वयंसेवकांशी वर्तणूक करताना पोलिसांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. शंभराहून अधिक जण गंभीर जखमी झाले. सरकारने जखमींच्या उपचारांसाठी काहीही व्यवस्था केली नाही. संघाच्या कार्यकर्त्यांनी ‘शुश्रुषा पथक’ नावाने स्वतःचे एक वैद्यकीय पथक तयार केले. शंभराहून अधिक सत्याग्रही जखमी स्वयंसेवकांच्या शुश्रुषेत मदत करीत होते. डॉ. परांजपे यांनी आपल्या खासगी दवाखान्यात निशुल्क सेवा देण्यास सुरुवात केली.

तुरुंगातही संघकार्याची सुरुवात

तुरुंगात डॉ. हेडगेवारांनी संघकार्याचे मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. तिथे काही काँग्रेसमधील काही बंदीवानही होते जे संघ आणि त्याच्या विस्तारामुळे दुःखी होते. पण डॉक्टरांनी स्वतःच्या संवादकौशल्याच्या बळावर त्यांची मतेच केवळ बदलली नाहीत तर मित्रवत आचरणाने त्यांचेही स्वयंसेवकांत रुपांतर केले. अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात हिंदुत्व, हिंदुराष्ट्र, संपूर्ण स्वातंत्र्य या विषयांवर तिथे तासन तास विस्तृत चर्चा होत असत.

या सगळ्याची परिणिती तुरुंगात संघाचे कार्य सुरू होण्यात झाली. सगळे सकाळी एका रांगेत उभे राहात असत व प्रार्थना म्हणत. अशाच एका प्रार्थना सभेत डॉक्टरांनी भाषण केले. ते म्हणाले, आपल्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आपण सातत्याने आंदोलन करीत आहोत. सरकारने स्वातंत्र्य सेनानींवर क्रूरपणे चालवलेली दडपशाही ही त्यांच्या मनातील भीतीच दर्शवत आहे. मूठभर परकीय माणसे इकडे येऊन आपल्याला गुलाम करत असतील तर त्याचा विचार आणि विश्लेषण करणे आवश्यक आहे. क्षणिक उत्साह आणि धडपड याने ध्येय साध्य होणार नाही. आपण सातत्याने दीर्घकालीन संघर्षाकरिता तयार असले पाहिजे.
डॉ. हेडगेवार यांना तुरुंगात असतानाही संघाच्या कार्याची काळजी होती. डॉ. परांजपे आणि भाऊराव कुलकर्णी हे संघाचे महत्त्वाचे नेते त्यांना संघामधील घडामोडींची माहिती देत असत. आपल्या अनुपस्थितीतही संघाचे कार्य वृद्धिंगत होत आहे आणि अनेक युवक शाखांमध्ये येऊ लागले आहेत याचा डॉक्टरांना आनंद होता.

गुलामीच्या बेड्या तोडण्याची ललकारी

दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी गणवेशातील स्वयंसेवकांच्या चमूने शहरांतील मार्गांवर केले जाणारे संचलन हा स्थानिकांचा आकर्षणाचा विषय होता. पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांचे सांगितिक सुरांवर एका लयीत एकत्रितरित्या सुरू असणारे संचलन पाहून लोकांनाही हे सगळे सुरक्षित आणि एकसंघ असल्याचा विश्वास वाटत असे. १९३० सालच्या दसरा संचलनात डॉक्टरांनी लिहिलेले पत्र संचलनाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये वाचले गेले. स्वयंसेवकांना स्वातंत्र्यासाठी मनापासून झटण्यासाठी प्रेरित करणारा मजकूर आणि देशभक्तीपूर्ण संदेशाचा अंतर्भाव त्या पत्रात करण्यात आला होता. त्या पत्रात म्हटले होते, जोपर्यंत आपण गुलामीच्या या बेड्या तोडत नाही तोपर्यंत आपण राष्ट्रास परमवैभवाच्या शिखरापर्यंत नेऊ शकत नाही. तोपर्यंत आपणास शांत बसण्याचा अधिकार नाही. आपली आई दुःखित, कलंकित आणि गुलामगिरीत असताना मुले भौतिक सुखांमध्ये रममाण असतील तर अशा मुलांचा काही उपयोग नाही.

डॉ. हेडगेवार हे केवळ सेवाभावी वृत्तीचे नेते नव्हते तर अतुलनीय देशभक्त आणि संघटनकारी व्यक्तिमत्त्व होते. क्रांतिकारकांसोबत काम करताना, काँग्रेसच्या मंचावर वा त्यांच्या आंदोलनांत अथवा तुरुंगवासात असताना त्यांना काही वेगळी वैशिष्ट्ये असणाऱ्या व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे आणि उत्साहाने भारलेले युवक सापडले. राष्ट्रनिर्माणासाठी डॉक्टरांनी त्यांना घडवले.

१४ फेब्रुवारी १९३० रोजी डॉ. हेडगेवार यांची तुरुंगातून मुक्तता झाली. अकोला आणि वर्धा येथे डॉक्टरांच्या स्वागतार्थ सभांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते या स्वागत सभांत सहभागी झाले. नागपुरातील हाथीखाना येथे डॉ. हेडगेवार यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. परांजपे यांनी सरसंघचालकपदाची सूत्रे पुन्हा एकदा त्यांच्याकडे सोपवली. जणू काही प्रभू श्रीराम वनवासातून अयोध्येत परतले आहेत आणि त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार पाहणाऱ्या भरताने त्यांची राजगादी त्यांच्याकडे सोपवावी अशाच पवित्र वातावरणात,  त्याच पद्धतीने डॉ. परांजपे यांनी डॉक्टरांकडे सरसंघचालकपद पुनश्च डॉक्टरांकडे दिले.

……क्रमशः
(लेखक पत्रकार व संतभलेखक आहेत)

Back to top button