RSSSeva

‘अनंता’नुभव नव्हे ‘अमृता’नुभव – भय्याजी जोशी

डॉ. अनंत कुलकर्णी यांच्या अनुभवांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि. 25 डिसेंबर(वि.सं.कें.) – एखाद्या व्यक्तीला जेव्हा समाजाची अडचण समजते, कमतरता लक्षात येतात, गरज जाणवते आणि त्यातून बोध घेऊन जेव्हा कृती केली जाते तेव्हाच त्याचा योग्य परिणाम दिसून येतो. सामाजिक प्रश्न लक्षात आल्याशिवाय चांगले कार्य उभे राहात नाही. डॉ. अनंत कुलकर्णी यांच्यासारखी व्यक्ती जेव्हा सामाजिक कार्यात उतरते तेव्हा ती स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करते. त्यांच्या ३५ वर्षांच्या या वैद्यकीय कार्याचे संकलन असणारे ‘अनंता’नुभव पुस्तक खरे म्हणजे अमृतानुभवच आहे. वाचकांना, या क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्यांना ते नित्य प्रेरणा देत राहील असे मनोगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

दीर्घकाळ सामाजिक क्षेत्रात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. अनंत कुलकर्णी यांच्या अनुभवांचे संकलन असणाऱ्या ‘अनंता’नुभव या पुस्तकाचे गुरुवारी भय्याजींच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी मंचावर डॉ. अनंत कुलकर्णी, या पुस्तकाचे लेखक-ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, गीता कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते. विश्व संवाद केंद्र, मुंबई व स्नेहल प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भय्याजी जोशी म्हणाले की, भारतातील सर्वात प्रभावी सेवा कार्यांपैकी एक असणाऱ्या आरोग्यरक्षक योजनेचा प्रारंभ हा डॉ. कुलकर्णी यांच्या माध्यमातून त्यांचेच कार्यक्षेत्र असणाऱ्या जव्हार मोखाड्यात झाला आहे. जनकल्याण समितीच्या माध्यमातून देशभरात रक्तपेढ्यांची साखळी उभारण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी केले आहे. अनंतरावांनी परिश्रम, चिंतन, नव्या आयामांचा विचार करीत या सामाजिक कार्याचा विस्तार केला आहे. दुसऱ्याचे दुःख बघण्याची दृष्टी असल्याशिवाय एवढे व्याप्त सेवा कार्य उभे राहू शकत नाही.

डॉ. अनंत कुलकर्णी यांच्या अनुभवांना पुस्तकाचे रूप देणारे, लेखक सुधीर जोगळेकर म्हणाले की, अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवेच्या आडून धर्मप्रसार करणाऱ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांची संख्या फार मोठी आहे. विदेशातून मिळणाऱ्या पैशाचा वापर करून वैद्यकीय सेवांच्या मुखवट्याआड धर्मप्रसार केला गेला. अशा परिस्थितीत कोणत्याही आमिषाला बळी न पडता सुरूवातीला वेतन न घेता आणि नंतर अत्यल्प मानधनावर तब्बल पस्तीस वर्षे डॉ. अनंत कुलकर्णी समाजसेवा सुरू ठेवली. संघाच्या माध्यमातून दाई प्रशिक्षण, आरोग्यरक्षक प्रशिक्षण असे अभिनव प्रकल्प त्यांनी सुरू केले. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन अनेक युवक वैद्यकीय क्षेत्राकडे वळतील, अनेक सामाजिक कार्यकर्ते तयार होतील.

या पुस्तकाचे प्रकाशक रवींद्र घाटपांडे म्हणाले की, असे अनुभव पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अशा अनुभवसंचितामुळेच अन्य कार्यकर्त्यांना दिशा मिळत असते. अनंतानुभव असेच प्रेरणा देण्याचे काम करेल.

Back to top button