RSS

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीस अहमदाबादमध्ये सुरुवात

कर्णावती(अहमदाबाद),दि. ५ जानेवारी (वि.सं.कें.)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विविध संघटनांमध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठकीस ५ जानेवारीपासून कर्णावती(अहमदाबाद) येथे सुरुवात झाली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ४ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुणकुमार यांनी ५ ते ७ या तीन दिवसांच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीची माहिती दिली. 

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी, संघाचे अखिल भारतीय अधिकारी आणि संघप्रेरित विविध २५ संघटनांचे अखिल भारतीय अध्यक्ष, महामंत्री आणि संघटन मंत्री, काही निवडक कार्यकर्ते, तसेच राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका, सहसंचालिका या बैठकीस आमंत्रित आहेत. वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र जी खराडी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नवे अध्यक्ष छगनभाई पटेल, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, भारतीय मजदूर संघाचे हीरेनभाई पांड्या, राष्ट्र सेविका समिती प्रमुख संचालिका वं. शांताक्का, विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार, स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय आयोजक तामिळनाडूचे के. आर. सुंदरम् विद्याभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राम कृष्ण राव या बैठकीत सहभागी होत आहेत.

समन्वय बैठक हा निर्णय घेणारा मंच नाही. सर्व संघटना या स्वतंत्र, स्वायत्त आणि स्वावलंबी आहेत. त्या संघटना आपली घटना आणि व्यवस्थेच्या अंतर्गत कार्य करतात.

हे सर्व कार्यकर्ते संपूर्ण देशात प्रवास करतात आणि बऱ्याचशा अनुभवींना, तज्ज्ञांनाही भेटतात. वैविध्यपूर्ण माहिती त्यांना या भेटीतून प्राप्त होते आणि फिरल्यामुळे, वर्षानुवर्षे काम केल्यामुळे अनेक गोष्टींचे आकलनही होत जाते. आपले अनुभव आणि आकलनांचे आदानप्रदान तसेच प्राप्त माहितीचे ज्ञान सर्वांना व्हावे हा या बैठकीचा उद्देश आहे.

या बैठकीत सुमारे १५० कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी एका आव्हानात्मक परिस्थितीतून संपूर्ण जगाला जावे लागले. आव्हान मोठे असले तरी प्रसन्नतेची बाब म्हणजे या परिस्थितीतही भारताने उल्लेखनीय आणि अनुकरणीय उदाहरण जगापुढे ठेवले. संघ तसेच विविध संघटनांनी या कालखंडाच समाजासाठी यथाशक्ती जे योगदान दिले, वर्षभरात कशा स्वरुपाचे कार्य केले त्याची समीक्षा केली जाईल, माहिती-अनुभव एकमेकांना सांगितले जातील.

या प्रतिकूल परिस्थितीत संघटनांनी आपले कार्य सुरू ठेवले व परिस्थितीच्या मर्यादेमुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला. या कालखंडात संघटनांची व्याप्ती वाढली असून कार्यविस्तार झाला असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला. अनुवर्तनात अनेक योजना तयार करण्यात आल्या. त्याची माहितीही यावेळी सगळ्यांसमोर मांडण्यात येईल.  

मागील वर्षी झालेल्या समन्वय बैठकीत पर्यावरण रक्षण आणि कुटुंबव्यवस्था सुदृढ करण्याच्या हेतूने समाज संस्काराच्या योजना तयार करण्यावर विचार करण्यात आला होता. या कालखंडात भारतीय जीवनशैलीबाबत लोकांची जागरुकता वाढल्याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. कुटुंब भावना आणि तिचे महत्त्व आणि स्वदेशी तसेच आत्मनिर्भरतेबाबच समाजात जागरुकता वाढली आहे. आपापल्या संघटनेत याबाबत कोणत्या योजना तयार करण्यात आल्या आहेत याबाबत या बैठकीत चर्चा केली जाईल. श्री रामजन्मभूमीबाबत न्यायालयाचा सर्वसंमत निर्णय आला होता. हिंदू समाजाच्या इच्छेनुसार भव्य राम मंदिराच्या निर्माणाचा अर्थ प्रशस्त झाला. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या लक्षात आले की एवढ्या मोठ्या कार्यात समाजाचे योगदान आवश्यक आहे. त्या दृष्टीने न्यासाने समाजातील  प्रत्येक व्यक्तीच्या धन योगदानातून हे कार्य पूर्णत्वास नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने घराघरात लोकांशी संपर्क केला जावा असे आवाहन केले आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या व्यतिरिक्त देशाचे वर्तमान परिदृष्य आणि सद्यकालीन महत्त्वपूर्ण विषयांवरही यावेळी चर्चा होऊ शकते.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button