HinduismRSS

स्वयंसेवकांचा ‘भारत छोडो’ आंदोलनात सक्रिय सहभाग

(लेखमाला – विश्वगुरु भारत – भाग 15)

डॉ. हेडगेवार यांच्या मृत्यूपश्चात द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संघ नेते आणि स्वयंसेवकांनी संघविस्ताराचे कार्य संपूर्ण समर्पिततेने सुरू ठेवले. संघ नेत्यांच्या श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनाखालील सुसंघटित प्रयत्नांमुळे अनेक स्वयंसेवकांनी कुटुंबाचा त्याग करीत पूर्ण वेळ प्रचारक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या युवा प्रचारकांना देशाच्या विविध भागात पाठवण्यात आले होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व, विश्वसनीय आणि परिणामकारक अशा बंधुभावामुळे संघाचा विस्तार झाला. पूर्वी संघाची प्रशिक्षण शिबिरे ही केवळ नागपुरात होत असत. आता ती जवळपास सर्वच प्रांतांत होऊ लागली. स्वयंसेवक आणि शाखांच्या संख्येत भरीव स्वरुपात वाढ होऊ लागली. प्रत्येक शाखेत सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे, व्याख्याने/भाषणे यामुळे संपूर्ण स्वातंत्र्यासाठी अनेक चमू कार्यरत झाले.

ब्रिटिश अधिकाऱ्यांचे संघाच्या हालचालींकडे सूक्ष्म लक्ष

संघाच्या रुपात वृद्धिंगत होणारी हिंदू शक्ती ब्रिटिश सरकारचे अधिकारी आणि त्यांच्या कळसूत्री बाहुल्यांच्या डोळ्यात खुपत होती. ब्रिटिश सरकारने एक सूचना प्रसारित करून स्वयंसेवी संस्थांच्या लष्करी गणवेश घालण्यावर आणि कसरतींवर बंदी घातली. सरकारने संघाच्या कार्यावर लक्ष ठेवायला गुप्तसंस्थांची नियुक्ती केली. संघाचे मुख्य ध्येय हे स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांना हाटविण्याचे आहे असा अहवाल या संस्थांनी सरकारला दिला. श्रीगुरूजी, बाबासाहेब आपटे आणि संघाच्या अन्य कार्यकर्त्यांच्या भाषणाचे काही नमुने गुप्तचर संस्थांच्या अहवालाच्या माध्यमातून गोळा केले.

https://www.vskkokan.org/rss/2548/

सरकारी अभिलेखागारातील गुप्तचर संस्थांच्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ देवेंद्र स्वरुप म्हणाले की, गुप्तचर संस्थांच्या अहवालात म्हटले होते की, संघकार्याचा देशभरात फार वेगाने प्रसार होत आहे. प्रशिक्षण शिबिरे ११ ठिकाणी आयोजित केली जाऊ लागली आहेत. विविध राज्यांतील काही शे युवकांनी कुटुंबाचा त्याग करीत पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेतला आणि नव्या शाखा सुरू केल्या. सरसंघचालक मा. स. गोळवलकर यांनी शहरेच नव्हेत तर ग्रामीण व दुर्गम भागातही संघ कार्याचा विस्तार करण्यास स्वयंसेवकांना प्रोत्साहन दिले. त्यांनी स्पृश्यास्पृश्यतेसारख्या दुष्ट प्रथांचा त्याग करीत सर्व घटकांनी एकत्र यावे यासाठी नागरिकांना आवाहन केले.

त्याचप्रमाणे, एका गोपनीय अहवालात, संघाचा देशातील वाढता प्रभाव आणि त्याच्या भयाकारी सरकारविरोधी कारवाया यांचे चित्र रेखाटताना म्हटले आहे की, संघाचा छोट्या छोट्या संस्थांनांसह संपूर्ण देशभरात प्रसार झाला आहे. सशस्त्र दलांसह सरकारी सेवांमध्ये हा प्रसार झाला आहे. ही संघटना जातीय तेढ वाढविणारी आणि ब्रिटिशविरोधी आहे. ती दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चालली आहे. मा. स. गोळवलकर स्वयंसेवकांच्या या शक्तिशाली संघटनेचा वेगाने विस्तार करीत आहेत. आत्मविश्वासाने स्वयंसेवक आदेश पाळत आहेत आणि सूचना येताच कोणतीही कृती करण्यास वा सोपवलेले काम करण्यास तयार आहेत. गोळवलकर हे अत्यंत सावध, हुशार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे युक्तिबाज आहेत. या अहवालाच्या शेवटी संघ स्वयंसेवकांच्या दैनंदिन कसरती आणि प्रशिक्षण शिबिरांवर सक्तीने बंदी घालण्यात यावी अशा सूचना लिहिलेल्या आहेत.

राष्ट्रीय अभिलेखागाराच्या अधिकृत अहवालांत संघाचा उल्लेख

राष्ट्रीय अभिलेखागारात गुप्तचर संस्थांचे अनेक गोपनीय अहवाल जतन करून ठेवण्यात आले आहेत. ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल अटक झालेल्या व तुरुंगवास भोगलेल्या संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या नावांचा उल्लेख या अहवालांत आढळतो. या अहवालातून असेही समजते की विदर्भातील चिमूर व आष्टी या गावांत संघाच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र भारताचे हंगामी सरकारही स्थापन केले होते. या कार्यकर्त्यांना इंग्रजांनी अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण केली होती. त्या सरकारशी संबंधित सुमारे १२ स्वयंसेवकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. नंतर त्यांची सुटका झाली असली तरी, नागपुरातील रामटेक नगर प्रमुख रमाकांत देशपांडे यांना ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या सद्गृहस्थांनीच पुढे वनवासींच्या सन्मान आणि मूळ हक्कांसाठी काम करणाऱ्या वनवासी कल्याण आश्रम नावाच्या संघटनेची स्थापना केली.

गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीत देशभरातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. तालुक्यात आणि जिल्ह्यातील अनेक इमारतींवर तिरंगा फडकवून स्वयंसेवकांनी सत्याग्रह केला. अनेक स्वयंसेवक पोलिसांच्या गोळीबारात आणि लाठीहल्ल्यामध्ये जखमी झाले. देशभरात झालेल्या आंदोलनांत रा. स्व. संघाचा सहभाग दिसून आला.

गांधीजींच्या समर्थनार्थ आणि ब्रिटिश सरकारविरोधात घोषणा देत नागरी वेशातील स्वयंसेवकांचा जत्था रस्त्यांवरून फिरत असे. ते ठरलेल्या जागी पोहचत असत व कायदा मोडून अटक करवून घेत. गांधीजींच्या मार्गदर्शनाला अनुसरून ते अत्यंत संयमाने वागत आणि पोलिसांशी वाद टाळत असत.

काँग्रेस नेत्यांना संघ कार्यकर्त्यांचे छत्र आणि मदत

आपले डावपेच आणि राजकीय हितसंबंध यासाठी भारतातील कम्युनिस्टांना ब्रिटिशांनी भारत सोडावा असे वाटत नव्हते, हे सगळ्यांना माहीत आहे. ब्रिटिश, गुप्तचर, पोलीस यांना आपल्या विरोधातील देशभक्तांना अटक करण्यास ते मदत करीत असत. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण आणि काँग्रेस नेते अरुणा असफ अली यांना दिल्लीच्या संघचालकांनी आपल्या घरात आश्रय दिला होता. हे नेते भूमिगत निवासातूनच आपापल्या संघटना चालवीत होते. प्रसिद्ध सामाजिक नेते अच्युतराव पटवर्धन आणि साने गुरुजी गुप्तपणे भाऊसाहेब देशमुखांच्या घरातून सूत्रे हलवित होते. प्रसिद्ध क्रांतिकारक नाना पाटील सातारा जिल्हा संघचालक सातवळेकर यांच्या घरात आश्रयाला होते.

गुप्तचर विभागाने त्यांच्या अहवालात संघाची एक गुप्त बैठक २० सप्टेंबर १९४३ रोजी झाल्याचे नोंदवले आहे. या बैठकीत आझाद हिंद सेनेचे जपान्यांच्या सहकार्याने भारताकडे कूच सुरू होण्याबाबतच्या संभाव्य नियोजनाची चर्चा झाली असावी, असेही या अहवालात म्हटले आहे. जेव्हा स्वयंसेवकांनी सत्याग्रहात स्वतःला अटक करून घेण्यास सुरूवात केली, तेव्हा श्रीगुरुजींनी ज्यांना अटक झाली नाही त्यांना बाहेर राहण्यास व सत्याग्रही तसेच त्यांच्या कुटुंबियांस मदत करण्यास सांगितले. या स्वयंसेवकांनी केवळ आंदोलनाच्या गुप्त समन्वयकांना व नेत्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनाही मदत केली.

संघाचे ‘भारत छोडो’ आंदोलनातील स्थान अगदी स्पष्ट होते. तत्कालीन सरसंघचालक श्रीगुरुजी म्हणाले होते की, आम्ही जी प्रतिज्ञा घेतो त्यात म्हटले आहे की – आम्ही संघात हिंदू राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आलो आहोत. यातूनच स्वयंसेवकांची स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याची तीव्र इच्छा प्रकट होते. पण या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसला अन्य संघटनांना बरोबर घेण्यात काही रस नाही. अन्य देशभक्त संघटनादेखील देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होत्या. परंतु, भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना सोबत घेऊन एक संयुक्त आघाडी तयार करण्याबाबत मात्र काँग्रेसला आस्था वाटली नाही. तरीही स्वयंसेवकांनी मात्र गांधीजींच्या नेतृत्वातील ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी होणे सुरू ठेवले. रा. स्व. संघ ही स्वयंसेवकांच्या रुपात देशभर कार्यकर्ते असणारी आणि देशासाठी, समाजासाठी निःस्वार्थीपणे समर्पिततेने कार्य करणारी संस्था होती. स्वयंसेवकांनी ‘भारत छोडो’ चळवळीत स्वतःहून सहभाग घेतला होता.  

‘भारत छोडो’ आंदोलनाचे नेतृत्व दिशाहीन

भूतकाळातील अनुभवांवरून ब्रिटिश सरकार आपल्याला चर्चेस बोलावेल अशी गांधीजींना आशा होती आणि पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा त्यांना आंदोलन संपुष्टात आणायला कारण मिळणार होते. पण ब्रिटिशांनी तडकाफडकी सूत्रे हलवली आणि काँग्रेस समितीच्या सर्व सदस्यांना तीन चार दिवसांत अटक केली. सरकारने त्यांना कोणताही योजना व चर्चा करण्यास वेळ दिला नाही. काँग्रेस पक्ष बेकायदेशीर म्हणून जाहीर करण्यात आला आणि पक्ष व आंदोलन दोन्ही नेतृत्वहीन, दिशाहीन बनले.

इतिहासतज्ज्ञ डॉ. सतीश मित्तल यांच्या मते, स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या वेगवेगळ्या पक्षांचे दृष्टीकोन सरळ व प्रामाणिक नव्हते. यांपैकी सर्वात धोकादायक दृष्टीकोन होता तो भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा. कम्युनिस्ट पक्षाने देशभक्त स्वातंत्र्य सैनिकांवर लक्ष ठेवणारे ब्रिटिश सरकारचे हेर म्हणून काम केले. कम्युनिस्ट पक्षाची समिती आणि गृह मंत्रालय सचिव यांच्यात झालेल्या करारानुसार कम्युनिस्ट नेते पी.सी. जोशी यांची ब्रिटिशांच्या मदतीसाठी नेमणूक करण्यात आली होती.

‘भारत छोडो’ आंदोलनास सुरुवात करण्यापूर्वी काँग्रेस पक्षाने कोणत्याची सामाजिक, धार्मिक आणि राजकीय पक्षाशी चर्चा केली नाही हे निर्विवाद सत्य आहे. ८ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेसने गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक चळवळ सुरू करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला.

देशव्यापी ‘भारत छोडो’ चळवळीत आंदोलनाच्या रणनीतीबाबत कोणतीही कार्यपद्धती तयार करण्यात आली नव्हती. कोणाला अटक होईल आणि बाहेर राहून कार्यकर्त्यांचे आणि आंदोलनाच्या साखळीचे नेतृत्व कोण करेल याबाबत कोणतीही योजना नव्हती. जिल्हा व तालुका स्तरावरील नेतृत्व कोण करेल, बैठका, एकत्रिकरण आणि संघटनात्मक रचना याबाबतही काही ठरवण्यात आले नव्हते. यामुळे अर्थातच चळवळ मोडून पडली.

ब्रिटिशांनी आपला देश का व कसा सोडला?

पाचवे सरसंघचालक के. सी. सुदर्शन यांनी ‘राष्ट्र धर्म’ मासिकाच्या नोव्हेंबर २००९च्या अंकात लिहिले आहे की, ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ऍटली यांच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळाले. ते १९६५मध्ये कोलकात्यात आले होते. सरन्यायाधीश आणि राज्यपाल सी.डी. चक्रवर्ती यांच्यासोबत राजभवनात ते राहिले होते. चक्रवर्तींनी ऍटली यांना विचारले की, आपण युद्ध जिंकले होते आणि भारत छोडे आंदोलनही बंद झाले होते मग ब्रिटिशांनी भारत का सोडला? ते म्हणाले, ‘भारत छोडो’ आंदोलनामुळे ब्रिटिश भारत सोडून गेले नाहीत. आझाद हिंद सेना इंफाळला पोहोचली होती आणि नौदलाने-वायू दलाने उठाव केला म्हणून ब्रिटिशांनी भारत सोडला.

‘भारत छोडो’ आंदोलन दिशाहीन झाल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश साम्राज्यवादाला जपानच्या साहाय्याने जोरदार धडक देण्याची तयारी केली. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि स्वा. सावरकर यांनी हिंदू महासभेचा विस्तार करण्यास सुरुवात केली. गोळवलकर गुरुजींनी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी ठरवलेल्या, अखंड भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी काम करण्यास सुरुवात केली.  नैतिक मुल्यांवर आधारित वर्तन आणि शांततेचे प्रतीक म्हणून भारतीय संस्कृतीने विश्वगुरूचे स्थान प्राप्त केले होते. पुन्हा एकदा आपल्या देशाला परमवैभवाप्रत नेण्याचे त्यांचे स्वप्न होते. संघाही देशाला हे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.  

क्रमशः

Back to top button