HinduismSeva

एक अनोखे गोसेवक – चिंचवडचे मोहन नाना

पिंपरी किंवा चिंचवड च्या भाजी मंडईत तुम्ही जात असाल आणि तिथे बॅटरी रिक्षा सह कोणी एक वृद्ध माणूस उरलेला भाजीपाला उचलून नेताना दिसल्यास त्यांना नमस्कार करायला विसरू नका.

बालपणापासूनच आपल्या मूळ गावी भोर मध्ये असताना रा. स्व. संघाचे संस्कार झालेले मोहन नाना गपचूप टाटा मोटर्स मधून निवृत्त झाल्यावर आपला बराचसा वेळ संघ कार्याला देतात. चिंचवड मधील रा. स्व. संघाने उभारलेले ईशान्य भारतातील मुलांचा छात्रावास असलेल्या ‘भारतमाता भवन’  मध्ये चालणाऱ्या योग वर्गात कडक शिस्तीच्या नानांना मी प्रथम भेटलो १० वर्षांपूर्वी म्हणजे २०११ मध्ये. आडनावाप्रमाणे त्यांची वागणूकही गुपचूप – फार बोलणं नाही. “गेल्यावेळी नाना आपल्याशी कधी बोलले होते? स्वभावानुसार आडनाव गपचूप नको तर गुपचूप पाहिजे” – असे आमचे विनोद योगवर्गात तेव्हा नानांबद्दल चालायचे.

नानांच्या पत्नी – स्मिता काकू म्हणजे माझी एक छान मैत्रिण. काकूंचा स्वभाव खूप बोलका. स्मिता काकूंमुळे नाना किमान माझ्याशी तरी बोलू लागले.

सकाळी ६ ला योग वर्ग सुरु होण्याच्या १ तास आधीच येऊन छात्रावासातील मुलांना उठवायचे, भवनाची स्वच्छता इ. कामे नाना गेली अनेक वर्षे रोज करत आहेत. सकाळी ७ ला योग वर्ग संपला कि पुन्हा संघाच्या शाखेत नाना हजर.

पद्मश्री ‘गिरीश प्रभुणे’ काकांचं चिंचवडच्या ‘गुरुकुलम’ या समाजातील वंचित घटकातील मुलांसाठी मोफत शिक्षणाचे महान कार्य करणाऱ्या संस्थेत एक गोशाळा पण आहे. हळू हळू तिथल्या देशी गायींची संख्या वाढत गेली. तेव्हा त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला. प्रभुणे काकांचे तरुणपणापासूनचे मित्र असणाऱ्या मोहन नानांनी यावर उपाय शोधला.

सुरुवातीला घरातील सदस्यांकडून आणि मित्र परिवाराकडून पैसे जमा करून चारा विकत घ्यायला सुरुवात केली. पण त्याने भागणार नव्हतं. मग पिंपरी व चिंचवड च्या भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांना भेटून उरलेला भाजीपाला गायींसाठी आपल्याला देण्याची विनंती केली. आधी काहींना पटलं नाही. पण शेवटी नाना एक स्वयंसेवक, थांबणार आहेत का ते? नाना वारंवार त्यांना भेटले. एक एक करून बरेचसे भाजी विक्रेते नानांना भाजी देऊ लागले. यामुळे भाजी विक्रेत्यांचं उरलेल्या भाजीपाल्याची विल्हेवाट लावण्याचं काम देखील सोपं झालं.

प्रतिसाद चांगला मिळू लागला, नानांचं काम वाढलं. भाजीपाला वाहून नेणं अवघड होऊ लागलं. मग त्यांनी स्वतःच्या पैशातून ₹ १.५ लाखाला एक बॅटरी रिक्षा घेतली, सोसायटीतच चार्जिंग ची व्यवस्था करून घेतली. रात्रभर रिक्षा चार्ज झाली कि रोज सकाळी आणि सायंकाळी नाना भाजी मंडई मध्ये जातात आणि गाईंसाठी भाजीपाला घेऊन येतात.

गुरुकुलम मध्ये हा भाजीपाला उतरवून गायींना तो भरवण्यासाठी त्यांना एक समवयीन मित्र श्री. पिंगळे काका पण मदत करतात. तसेच गुरुकुलमच्या गोशाळा विभागाचा प्रमुख बद्री पण तिथे असतोच. 

मारवाडी समाजातील एका कुटुंबाने नानांना चाऱ्याच्या कापणीसाठी ₹१ लाख किमतीचे मशीन पण तिथे लावून दिले. आता काही भाजी विक्रेते गायींसाठी ताजी भाजी, टमाटे देखील नानांकडे सुपूर्द करतात. नानांचे हे कार्य बघून परिसरातील सुमारे ८०० लोकांनी आतापर्यंत का सत्कार्याला विविध प्रकारे मदत केली आहे. यातील बरेचसे लोक दरमहा एक ठरलेली रक्कम यासाठी दान देतात.

प्राण्यांनादेखील प्रोटीन ची आवश्यतकता असते म्हणून संपूर्ण गपचूप कुटुंब घरातच प्लास्टिक च्या मोठ्या ट्रे मध्ये कडधान्य भिजत घालतात. त्यांना जरा मोठे मोड आले कि ते गायींना खायला देतात. नानांचं हे गोशाळेचं काम गेली ४-५ वर्षे अविरत सुरु आहे.

याव्यतिरिक्त मोहन नाना संघाच्या वसतिगृहांसाठी चालणारी मूठभर धान्य योजना देखील राबवत आहेत.

आपणही कधीतरी चिंचवडच्या गुरुकुलमला आणि तिथल्या ७० गायींच्या गोशाळेला नक्की भेट द्या, ७२ वर्षाच्या ‘तरुण’ अशा या मोहन नानांना पण आवर्जून भेटा. जमल्यास या कार्यात थोडासा हातभार लावा.

नानांचा समाजकार्याचा या वयातील उत्साह बघून एक लक्षात येतं: “once a स्वयंसेवक, always a स्वयंसेवक”. संघ स्वयंसेवक कधीही शांत बसू शकत नाही.

Back to top button