HinduismNews

सौगंध राम की खायी थी , हमने मंदिर वही बनाया है.. भाग ४

ayodhya ram mandir inauguration ramlala pran pratishtha Part 4

(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १७ भागांची रोमांचकारी मालिका)

इस्लाम नावाचे वादळ आणि रामजन्मभूमी..

रामजन्मभूमीला लक्ष्य मानून तेथील मंदिरांवर जो दुसरा हल्ला मुस्लिमांकडून झाला, तेव्हा एका वीर पुत्राने त्यांना असा जबरदस्त तडाखा दिला की, पुढे दोनशे वर्षांपर्यंत कोणत्याही विदेशी आक्रमकाला तिकडे नजर वळवून पाहण्याचे धाडस झाले नाही.

सम्राट विक्रमादित्यांनी अशाप्रकारे जीर्णोद्धार केल्यानंतर बरीच वर्षे गेली. हजारोंच्या संख्येने हिंदू जनता अयोध्येला येऊन शरयूच्या अथांग आणि पावन जलधारांत स्नान करून राममंदिरात दर्शनास जात असे आणि रामलल्लाचे दर्शन घेऊन मोठ्या समाधानाने आपापल्या गावी परतत असे.

मसूद सालार हा गझनवी सेना प्रमुख सतरिखपर्यंत (साकेत) आपल्या सैन्यासह मेरठ, फरूखाबाद, कनोज, लखनौ जिंकत पोहोचला होता. त्याने आपल्या वाटेतील मंदिरांचा आणि सतरिखच्याही प्रमुख मंदिरांचा नाश केला आहे. तिथल्या हिंदूंनी प्रखर विरोध केला, पण ते टिकू शकले नाहीत. सतरिख जिंकून तेथे त्याने आपला मुक्काम ठोकला होता.

सतरिख त्यावेळी एक फार मोठे धार्मिक केंद्र होते. मसुद सालारने सतरखा म्हणजेच साकेत जिंकून त्या ठिकाणी पूर्व हिंदुस्थानवर विजय मिळवण्यासाठी आपले मुख्य कार्यालय बनविले, त्याने मियाँ रज्जब कोतवाल आणि आपला काका सैफुद्दीन यांना बहराईचकडे, अमीर हसन अरब याला महूनाकडे आणि मलिक फजल याला वाराणसीकडे पाठवले आणि स्वतः मलिक फिरोजच्या सैन्यासह अयोध्येकडे निघाला. त्याने प्रथम कुबेरटिल्यावरील कुबेरनाथाचे मंदिर फोडले. त्याचा दुसरा हल्ला अयोध्येच्या प्राचीन कनकभवनावर होता. अयोध्येचा राजा प्रबळ होता. तिथल्या राजांच्या सामर्थ्यापुढे त्याला अधिक विध्वंस करता आला नाही.

राणा सुहेलदेव

राणा सुहेलदेवने त्या मसूदच्या एका मोठ्या तुकडीला सीतापूर जिल्ह्यापर्यंत पळवून लावले. बाडीग्राम या ठिकाणी त्याच्या ५ प्रमुख सरदारांना मारून टाकले. त्यांच्या कबरी आजही तेथे आहेत, त्यांना आजही पंचपीर म्हणतात. सालार मसूद रामजन्मभूमीपर्यंत येऊ शकला नाही, परंतु पुनः परतून विध्वंस करण्याचा विचार त्याने केला. हरदेव, रतन पांडे, राजा शंकर यांनीही त्या ठिकाणी मसूदला टक्कर दिली. दिगंबर आखाड्याच्या साधूनीही त्याच्याबरोबर तुंबळ युद्ध केले. दिगंबरी आणि हिंदू सेना यांनी असा भीषण प्रहार केला की रामजन्मभूमीला स्पर्श करण्याचे साहस मसूदला झाले नाही.

मसूदचा बाप सालारशाह मसूदच्या मदतीसाठी एक मोठे सैन्य घेऊन तेथे पोहोचला खरा, पण मसूदला आपल्या उरलेल्या सैन्यासह अयोध्या अविलंब सोडावी लागली, सुहेलदेवाच्या नेतृत्वाखाली सतरा राजे – राय सरईव, राय अर्जुन, राय भिकन, राय कनक, राय कल्याण, राय भकरू, राय सबरू, राय बिरबल, राय जयपाल, राय हरपाल, राय प्रभू, राय देवनारायण आणि नरसिंह यांच्या नेतृत्वाखाली दहा लाख घोडेस्वार आणि पंधरा लाख पायदळ एकत्र आले होते. बहराईचचा हकीम सय्यद सैफुद्दीन घाबरला, त्याच्या साहाय्यार्थ सालार मसूद आपली सारी सेना घेऊन सन १०३३ च्या श्रावण सप्तमीला बहराईच येथे येऊन धडकला आणि इथेच त्याला हिंदू राजांनी चारही बाजूने घेरले.

हिंदू राजाचा पराभव होण्याचे चिन्ह होते, परंतु हिमालयातील पर्वतीय राज्य साभूम येथून सुहेलदेव, बलूनाहून राय हरदेव आणि त्रिलोकचन्द्र आपापले सैन्य घेऊन कुटिला संगमाच्या दुसऱ्या बाजूकडून पुढे येऊन पोहोचले. बहराईचपासून ७ कोस अंतरावर प्रयागपूरजवळ घागरा नदीच्या किनारी महासमर घडून आले. सालार मसूद, सैफुद्दीन यांच्या पूर्ण सेनेला चारी बाजूंनी हिंदू वीरांनी घेरून टाकले. बरेच दिवस संग्राम चालू राहिला. मसूदची चारही बाजूने नाकेबंदी केली गेली.

उंदीर पिंजऱ्यात अडकतो तशी मसूदची अवस्था झाली. १४ जून १०३३ या तारखेला मसूदसहित संपूर्ण सेनेचा हिंदू वीरांनी सर्वनाश केला. पाणी द्यायलाही कोणी उरले नाही. सालारच्या मृत्यूनंतर अजमेरहून मुजफ्फरखान त्वरेने आला, पण त्यालाही मारले, एवढेच नव्हे तर त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना देखील हिंदूंनी पळवून लावले. ज्या मूर्ती मुस्लीम हल्लेखोरांनी फोडल्या होत्या, त्यांची पुनर्स्थापना झाली आणि हिंदुस्थानच्या भूमीवर मंदिरांच्या घंटा पुनः निर्वेधपणे वाजू लागल्या.

इस्लाम नावाचे जे वादळ अयोध्या आणि बहराईचपर्यन्त येऊन पोहोचले होते, ते सर्व थंडावले. या युद्धात अरबस्थान आणि इराणच्या प्रत्येक घरातील दिवा विझला, अशी इतिहासात नोंद झाली आहे. याच कारणाने दोनशे वर्षांपर्यन्त मुसलमानांच्या मनात भारतावर आक्रमणाचा विचार येऊ शकला नाही. यानंतर अयोध्येवर गढवाल वंशाचे राज्य आले. गोविंदचंद्र हा मदनपाल राजाचा युवराज होता, त्याने नंतरच्या काळी उरल्या सुरल्या परदेशी हल्लेखोरांचा चांगलाच समाचार घेतला. रामजन्मभूमी पुनः एकदा बरीच वर्षे संकटमुक्त झाली आणि मग आला तो अशुभ क्षण सन १५२६ मध्ये.

क्रमशः

Back to top button