CultureHinduismNewsSpecial Day

छत्रपती संभाजीमहाराज

sambhaji maharaj balidan din 2024

[१४ मे १६५७ – ११ मार्च १६८९ (फाल्गुन अमावस्या)]

श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।
यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।।

अर्थ : संभाजीराजांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे (प्रभे) शोभते आणि राजमुद्रेची आश्रित असलेली लेखा कोणावरही अंमल गाजविते अशी ही शिवपुत्र शंभूची मुद्रा प्रकाशित आहे.

ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा !

सन १६८२…. फितुरीच्या जहाल अस्त्राच्या सहाय्याने औरंगजेबाने महाराष्ट्राभोवती आपला फास आवळायला सुरुवात केली. मराठे सरदार, वतनदार यांना या अस्त्राच्या मोहजालात अडकवून मराठेशाहीची धार बोथट करण्याचा प्रयत्न औरंगजेबाने चालवला होता. मात्र जोपर्यंत हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजीमहाराज हे दख्खनमध्ये पाय रोवून होते तोपर्यंत औरंगजेबाला संपूर्ण महाराष्ट्रावर आपला मोगली अंमल पसरविणे केवळ दुरापास्त होते. मात्र काळाच्या मनात काही वेगळेच होते. औरंगजेबाने याच फितुरी अस्त्राच्या बळावर स्वराज्याच्या दुसर्याह छत्रपतीला बेसावध अवस्थेत कैद केले आणि आनंदोत्सवाप्रित्यर्थ संभाजीराजे आणि कवी कलश या दोघांची अत्यंत दयनीय अवस्थेत उंटावरून सर्व लोकांसमोर बहादूरगड येथे धिंड काढली.

धिंड संपल्यावर औरंगजेबाने पूर्ण दरबार भरवला. औरंगजेबाने आसनावरून उठून गालिच्यावर बसून डोके जमिनीवर टेकले आणि हात वर करून खुदाचे आभार मानले. फक्त डोळे आणि जीभ सोडून अन्य सर्व अवयव साखळदंडाने जखडलेल्या अवस्थेतील संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबासमोर आणण्यात आले. मात्र बादशहापुढे हे छत्रपती अजिबात न झुकता ताठ मानेने उभे होते. संभाजीराजांना आपला मृत्यू समोर दिसत होता. मात्र त्याही अवस्थेत त्यांनी औरंगजेबाला व त्याच्या सरदारांना भर दरबारांत अपमानास्पद शब्द व शिव्यांची लाखोली वाहिली. चिडलेल्या औरंगजेबाने त्या दोघांची रवानगी कोठडीत केली. दोन दिवसांनी औरंगजेबाने आपल्या सरदारामार्फत संभाजीराजांना विचारणा करण्यास सुरुवात केली की, ‘तुझा खजिना व इतर संपत्ती कोठे आहे ? कोणकोणत्या मोगल सरदारांशी संधान आहे ?’

चिटणीस बखरीत पुढील उल्लेख सापडतो, पादशहानी पाहून विचार केला की, ‘यास बाटवावा, मुसलमान करून नंतर मनसब सरदारी देऊन ठेवावा. त्याप्रमाणे विचारावयास पाठविले की, तुम्ही बाटावे म्हणजे जीव वाचवून तुमची दौलत तुमचे स्वाधीन करितो. त्यावरून राजे यांनी उत्तर केले की ‘बाटा म्हणता तरी हे गोष्ट घडावयाची नाही. ज्या अर्थी कैदेत आले, तेव्हा वाचणे ते काय ? तुमचे विचारास येईल ते करावे. तथापि तुमची बेटी द्यावी म्हणजे बाटतो.’ ऐसे उत्तर सांगून पाठविले. सरदार रहुल्लाखानाने बादशहाला हे सांगितल्यावर औरंगजेब क्रूद्ध झाला. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने संभाजीराजे आणि कवी कलश यांच्या जीभा मुळासकट उपटून टाकण्याची आणि तप्त सळई डोळ्यात फिरवून डोळे काढण्याची आज्ञा दिली. अशा प्रकारे संभाजीराजांच्या बाणेदार वर्तणुकीमुळे संतापून औरंगजेबाने त्यांचे हालहाल करून मारण्याचे आदेश दिले.

दोघांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर ३ मार्च १६८९ हे औरंगजेबाच्या राज्यारोहणाचे ३२ वे वर्ष होते. ते साजरे करण्यासाठी औरंगजेब बहादूरगडहून कोरेगाव ऊर्फ फतेहाबाद या ठिकाणी पसरलेल्या आपल्या बलाढ्य छावणीत येऊन पोहोचला. तेथेच संभाजीराजे आणि कवी कलशाचे मस्तक तलवारीने उडवून ठार मारण्याची आज्ञा त्याने दिली. डोळे आणि जीभ उपटल्यानंतर संभाजीराजांनी अन्नपाणी वर्ज्य केले होते. त्यातच त्यांचे हाल सुरू झाले. प्रथम त्यांची कातडी सोलण्यात आली. त्यावर मीठ टाकण्यात आले. नंतर शरीराचे तुकडे तुकडे करून वढू-तुळापूर संगमस्थानी फेकण्यात आले. तीच फाल्गुन वद्य अमावस्या शके १६१०.

‘अजो नित्यः शाश्वआतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥’

म्हणजेच ‘पार्थिव शरीराला मारण्याने माणूस मरत नाही. माणूस मुळातच अजरामर आहे.’ या गीतेतील श्लोकाप्रमाणे छत्रपती संभाजीराजांची काया मृत्यूंजय झाली !

संभाजीराजे यांच्या देहाचे होणारे हाल पाहिले म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मनाला एक गोष्ट स्पर्शून जाते, ती म्हणजे संभाजीराजांची अंतःशक्ती किती प्रबळ, प्रखर, प्रभावी अन् प्रसन्न होती. संभाजी राजांच्या हौतात्म्यामुळेच पुढे मराठ्यांच्या तलवारींना तेज आले. भाल्यांना बळ आले. तोफांना ताकद आली. मराठी मनात चैतन्याच्या, स्वाभिमानाच्या, राष्ट्रीयत्वाच्या, स्वधर्मरक्षणाच्या मशालीने पेट घेतला आणि त्या प्रकाशात त्यांनी औरंगजेबाला आपली उर्वरित हयात मराठ्यांशी झुंजण्यात खर्च करावयास लावली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले आहे, ‘संभाजीराजांनी आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजीमहाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही तर ती अनेकपटींनी उज्ज्वलतम आणि बलशाली केली !’

आपला क्षात्रधर्म शेवटी संभाजीराजांनी आपल्या हौतात्म्याने सिद्ध केला. हा चिरंतन वज्रलेप मराठ्यांच्या इतिहासात लिहिला गेला. त्यांच्या संघर्षमय जीवनातून त्यांच्यानंतर मराठेशाहीचा धगधगता इतिहास निर्माण झाला. मराठ्यांनी आपले ज्वलज्ज्वलनतेज संपूर्ण हिंदूस्थानात प्रकट केले.

समर्थ रामदासांनी म्हटले आहे, ‘सूर्यास खडतरता चढे । हलकल्लोळ चहूकडे । कोसळती मेरूचे कडे । घडघडायमान ॥’

असे सूर्यमंडलाला हादरवून सोडणारे छत्रपती संभाजीराजांचे हौतात्म्य त्या कपिकुलोत्पन्न वज्रहनुमानाप्रमाणे चिरंजीव झाले आणि केशवपंडितांनी म्हटल्याप्रमाणे तो हिंदूस्थानात ‘ज्वलज्ज्वलनतेजस छत्रपती’ झाला !

लेखक :- प्रसन्न खरे

(संदर्भ : कै. डॉ. सदाशिव शिवदे लिखित ‘ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा’)

Back to top button