IslamNews

वसीम रिझवी मुस्लीम नसल्याचा मौलवींचा फतवा

नवी दिल्ली, दि. १६ मार्च : दहशतवादाचे शिक्षण देणार्‍या कुराणमधील काही आयती वगळण्यात याव्यात, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करणारे ‘सुन्नी वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवी हे मुस्लीम नसल्याचा फतवा शिया आणि सुन्नी मौलवींनी जाहीर केला आहे.  

मुस्लिमांचा धर्मग्रंथ असलेल्या कुराणमधील २६ आयती या दहशतवादाचे शिक्षण देतात. त्यामुळे त्यांना कुराणातून वगळून सुधारित आवृत्ती तयार करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका वसीम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, त्यावरून मुस्लीम समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास प्रारंभ झाला आहे.  

लखनऊ येथे शिया आणि सुन्नी पंथांच्या उलेमांनी एकत्र येऊन वसीम रिझवी हे कुराण आणि इस्लामचे शत्रू असून ते दहशतवादी असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे रिझवी हे आता मुस्लीम राहिले नसून त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर मुस्लिमांच्या दफनभूमीमध्ये दफन केले जाणार नसल्याचाही फतवा जारी करण्यात आला आहे. दिल्ली येथील जामा मशिदीमध्ये दि. १९ मार्च रोजी शिया आणि सुन्नीपंथीय मुस्लीम संयुक्त मोर्चा काढणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे.

 सर्वोच्च न्यायालयाने वसीम रिझवी यांची याचिका फेटाळून त्यांना मोठा आर्थिक दंड करावा, त्याचप्रमाणे त्यांच्याविरोधात दहशतवादाचा गुन्हा दाखल करावा, अशीही विनंती करण्यात आली आहे. रिझवी आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर सामाजिक बहिष्काराचा आदेश मौलवींनी दिला आहे. त्याचप्रमाणे रिझवी यांच्या कुटुंबाने त्यांच्यासोबतचे सर्व संबंध तोडले असल्याचेही त्यांच्या भावाने जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button