Health and WellnessNews

‘आम्ही कोरोनातून बरे झालो’ आशयाच्या पोस्टर्समुळे शहरात सकारात्मकतेचे वातावरण

सटाणा, दि. २६ एप्रिल : कोरोनाने गेल्या काही दिवसांत उच्चांकाची परिसीमा गाठली आहे.  परिणामी कोरोना बाधितांसह, मृत्यूदरात वाढ होत असल्याने भयभीत झालेल्या नागरिकांमध्ये चिंतेचे,  नैराश्येचे प्रमाण वाढले आहे.  त्यांचे मनोबल खच्ची होत आहे. नागरिकांना या दडपणातून बाहेर काढण्यासाठी, तसेच   कोरोना बाधितांना  या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शहरातील कोरोना योद्धयांनी एक युक्ती शोधून काढली आहे. शहरातील मुख्य चौकात बॅनर लावून त्याद्वारे ‘आम्ही कोरोनामुक्त झालो, घाबरू नका तुम्हीही व्हाल’ असा संदेश दिला.

सटाणा शहरात व परिसरात गेल्या महिनाभरापासून कोरोना महामारीने डोके वर काढले आहे. यामध्ये अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले.  आपल्या आप्तस्वकीयांच्या अचानक जाण्याने शहरात  प्रचंड भीती पसरली आहे. त्यातच शहरातील विविध चौकात भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर पाहून कोरोना रुग्णांच्या मनातील भीती आणखी वाढत  असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या लक्षात आले. त्यांनी शहरातील एका सोशल ग्रुपवर याबाबत मत व्यक्त करताच शहरातील श्रद्धांजलीचे बॅनर काढण्यात आले. व त्याऐवजी ‘आम्हालाही कोरोना झाला होता, आम्ही त्यातून बरे झालो’ या आशयाचे व संबंधित व्यक्तींचे छायाचित्र असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. या सकारात्मक विचाराच्या पोस्टर्स मुळे शहरात सकारात्मकतेचे  वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button