EnvironmentOpinion

आम के आम… गुठलियोंके दाम केशवसृष्टीचा पर्यावरणपूरक उपक्रम

भरपूर आंबे खा.. पण कोयी आम्हाला द्या.. ! 

उन्हाळा आणि आंबा हे अनेक पिढ्यांपिढ्यांनी पाहिलेले, अनुभवलेले स्वादिष्ट असे  समीकरणच आहे. आंबे  केवळ उन्हाळ्यातच मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे  या काळात डाएट, उन्हाचा कडाका अशा कारणांना बुट्टी देऊन प्रत्येकजण आंब्यांवर ताव मारतात. चवीला मधूर आणि अत्यंत पौष्टिक अशा आंब्याला भारताप्रमाणे भारताबाहेरही मागणी आहे.अर्थात मुंबईतही आंब्यावर ताव मारणारे खवय्ये काही कमी नाहीत. मुंबईत दरवर्षी ६ कोटी आंबे खाल्ले जातात. एवढ्या मोठ्या संख्येने आंबे खाल्ल्यानंतर मात्र बरेचजण  त्याची कोय कचर्‍यात टाकून देतात.  ज्या कोयींचा आपण आंब्याची  झाडे लावण्यासाठी उपयोग करू शकतो. त्याच कोयी कचऱ्यात, नाल्यात इतस्त: टाकलेल्या दिसतात. जे आंबे खाऊन आपण  तृप्त होतो, तेच आंबे खाल्ल्यानंतर त्यांच्या  कोयीने आपण आपला परिसर परिणामी आपले शहर बकाल करीत असतो.

जुन्या काळात एक तरी आंब्याचे झाड लावले जात होते. आजोबांनी त्यांच्या नातवंडासाठी ही लागवड करावी, असा अलिखित नियमच होता. यातूनच प्रत्येक शेतावर आमराई निर्माण झाल्या होत्या.   पण, विकासाच्या नावावर या आमराईं पूर्वीच्या प्रमाणात  कमी दिसून येतात.  म्हणून आपल्या लाडक्या आंब्याच्या संवर्धनासाठी केशवसृष्टी या सामाजिक संस्थेने  पुढाकार घेतला आहे. ग्रामविकास, वनवासी विकास, अपारंपरिक ऊर्जेचा विकास, पर्यावरण रक्षण आणि गोवंश वृद्धी या  पाच मुख्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असणारी  भाईंदर, उत्तन येथील केशवसृष्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित सामाजिक संस्था आहे. या संस्थेने यावर्षी आंब्याच्या कोयी  संकलित करून  शेतकऱ्यांना देण्यासाठी एक उपक्रम राबविला असून जास्तीत जास्त लोकांना  या उपक्रमात   सहजपद्धतीने सहभागी होता यावे म्हणून त्यादृष्टीने कार्यरत आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचा फायदा म्हणजे आंबे तर आंबे खायचे आणि त्या खाल्लेल्या आंब्यांच्या कोयी कुठेही न फेकता त्या संकलित करून केशवसृष्टीकडे द्यायच्या.  केशवसृष्टीमार्फत या कोयी  शेतकऱ्यांना आंब्याच्या लागवडीसाठी दिल्या जाणार आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना आंब्याच्या लागवडीनंतर फायदाही होईल, तसेच आंब्याची जास्तीत जास्त झाडे लावली जातील. शेतकऱ्यांना,  पर्यावरणाला  आपला हातभार लागेल.  म्हणजेच आम के आम… गुठलियोंके दाम -अशा कार्यपद्धतीचा हा उपक्रम असणार आहे. 

उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला एकच करायचे ते म्हणजे आंब्याच्या कोयी चांगल्या  सफेद दिसेपर्यंत स्वच्छ धुऊन २ ते ३ दिवस वाळवायच्या.    पुरेशा  कोयी जमा झाल्या की त्या प्लास्टिक  पिशवीत भरून  केशवसृष्टीच्या आपल्या जवळील  केंद्रात नेऊन द्यायच्या किंवा त्यांच्याशी संपर्क करायचा. ते केशवसृष्टीचे कार्यकर्ते  स्वतः घरी येऊन कोयी घेऊन जातील. ओल्या किंवा नीट न वाळलेल्या कोयी पिशवीत तशाच भरू नयेत . एखादी कोय खराब असेल तर ती  फेकून द्यावी. इतर चांगल्या कोयीमध्ये ठेवू नयेत. आपल्या जवळील केंद्राशी संपर्क करायचा असेल अथवा अधिक माहितीसाठी  ८४५४८४१२५७ या क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नातेवाईक, शेजारी, मित्र परिवारालाही याबद्दल सांगावे.  सगळ्यांनी मिळून जमा झालेल्या कोयी शेतकऱ्यांना देऊया.  शेतकऱ्यांचा  फायदा करूया, पर्यावरणाला हातभार लावूया.. शहर स्वच्छ ठेवूया..  बहुविध प्रकारे संपन्न असलेल्या या उपक्रमात नक्की सहभागी होऊया.

– तृप्ती पवार, विश्व संवाद केंद्र, मुंबई     

**

Back to top button