OpinionSeva

भारताला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा करणारी ‘सेवा इंटरनॅशनल’

भारत सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडला आहे. सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र कोविडच्या दुसऱ्या लाटेने भारताची आरोग्यसुविधा तिच्या कमाल क्षमतेपर्यंत ताणली आहे. देशाच्या आरोग्यसुविधांवर कमालीचा ताण निर्माण झाल्यामुळे हे लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी तसेच या महामारीशी झुंजणाऱ्या प्रत्येकाची यापासून सुटका करण्यासाठी भारतातील अनेक संस्था, व्यक्ती वैयक्तिकरित्या आपापल्या परीने या कोरोना संकटाशी लढण्यास सज्ज झाले आहे. आपल्या भारतवासियांना, आपल्या नागरिकांना या संकटातून बाहेर काढणे, पर्यायाने आपला देश या कोरोना संकटातून मुक्त व्हावा म्हणून प्रयत्नशील आहेत. जे जे शक्य आहे ते ते करीत आहेत. आपल्या भारतातील या सज्जनशक्तीसमवेतच जगातील विविध देशांकडूनही भारतात मदतीचा ओघ सुरु आहे. त्यासोबतच अमेरिका स्थित सेवा इंटरनॅशनल ही सेवाभावी संस्था देखील भारतातील नागरीकांच्या मदतीसाठी धावून आली आहे.

सेवा इंटरनॅशनल ही सेवाभावी संस्था २४ वर्षे जुनी असून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. सेवा इंटरनॅशनलचे कार्यकर्ते देशातील १५ हून अधिक राज्यांत सक्रिय असून जगातील २५ हून अधिक देशांत कार्यरत आहेत. आपत्ती व्यवस्थापन हे संघटनेचे मुख्य केंद्र असून मोठ्या आपत्तींमध्ये मदत आणि पुनर्वसनाचे काम त्यांनी युद्धपातळीवर केले आहे.

समाजाने समाजासाठी केलेले कार्य, या अनुषंगाने सेवा इंटरनॅशनलने अमेरिकेतील भारतीय-अमेरिकन नागरिकांकडून मिळालेल्या निधीतून १. ५ मिलियन डॉलर्सचे ४०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारी साधने भारतात दाखल केली आहेत. भारतातील आपल्या बंधू-भगिनींच्या वेदना, त्यांना होणारे त्रास तसेच कोरोना महामारीला लवकरात लवकर अटकाव बसावा म्हणून अमेरिकेतील भारतीय-अमेरिकन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हा निधी सेवा इंटरनॅशनलकडे सुपूर्द केला होता. पुढील काही दिवसांत आणखी २ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देखील भारतात रवाना होणार आहेत.

सेवा इंटरनॅशनलच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि वैद्यकीय सुविधांसोबतच देशातील सुमारे १० हजार गरजू कुटुंबे आणि १ हजाराहून अधिक अनाथाश्रमे व ज्येष्ठ नागरिकांना अन्न आणि औषधांचाही पुरवठा करण्यात येणार आहे. याचबरोबर सेवा इंटरनॅशनलचे कार्यकतें तसेच स्वयंसेवकांमार्फत ऍम्ब्युलन्स सर्व्हीस, रुग्णालयातील बेड उपलब्धता, रक्त आणि औषधांचे पुरवठा करणाऱ्यांची अधिकृत यादी डिजिटल स्वरूपात तयार करण्यात आली असून त्यांचा उपयोगही कॉरोनग्रस्त रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना होत आहे. सेवा इंटरनॅशनलच्या https://covidsewa.com/ या वेबसाइटवर अधिक माहिती गरजूंना मिळू शकते. केवळ भारतातील सज्जनशक्तीच नाही तर परदेशातही भारताचा आणि भारताच्या नागरिकांचा आपुलकीने, बंधुभावाने विचार करणाऱ्या या परदेशातील सज्जन शक्तीला अंक त्यांना एकत्र आणणाऱ्या सेवा इंटरनॅशनलच्या कामास मानाचा मुजरा.

तृप्ती पवार, विसंके, मुंबई

Back to top button