Opinion

‘श्री गुरुजी’ माधव सदाशिव गोळवलकर यांचा स्मृतिदिन

उत्तूंग व्यक्तिमत्व, निरभ्र चारित्र्य, ज्वलंत राष्ट्रनिष्ठा आणि संघटना कौशल्य असणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सारथ्य करणारे गोळवलकर गुरुजी हे हजारो लाखोंच्या मनात आदराचे स्थान असलेले एक वंदनीय व्यक्तिमत्व होते. गुरुजींचा जन्म नागपूर येथे १९ फेब्रुवारी १९०६ रोजी झाला. कोकणातील गोळवल हे त्यांचे मूळ गाव परंतु वडिलांच्या नोकरीमुळे ते कुटूंब नागपुरात आले. गुरुजींची आठ वडील भावंडे दगावली. नववं आणि शेवटचं अपत्य म्हणजे माधव तथा गुरुजी. नागपूर येथे ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. नागपुरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये इंटरपर्यंत शिक्षण झाल्यावर वैद्यकीय अभ्यास करण्याच्या इच्छेने ते लखनौला गेले. परंतु त्यांना तेथे प्रवेश मिळाला नाही. मग ते वाराणसीला गेले आणि बनारस हिंदु विद्यापीठातून बी. एस्सी. व नंतर एम.एस्सी या पदविका प्राप्त केल्या. त्यानंतर त्यांनी सागरी जीवन या विषयात पीएच. डी. च्या पदवीसाठी प्रबंध लिहिण्यास सुरुवात केली होती, पण मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या माधवराव गोळवलकरांना आर्थिक कारणांमुळे तो पूर्णत्वास नेता आला नाही. ते प्राणी शास्त्राचे विद्यार्थी होते. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातच शिक्षकाची नोकरी पत्करली. येथेच त्यांना ‘गोळवलकर गुरुजी’ अथवा ‘श्रीगुरुजी’ म्हणू लागले . पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून १९३५ मध्ये कायद्याची पदवी देखील मिळवली. याच सुमारास ते प्रथम रामकृष्ण मिशनच्या आणि नंतर रा.स्व.संघाच्या संपर्कात आले. बनारस हिंदू विद्यापीठाचे विद्यार्थी आणि संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे निकटवर्ती भय्याजी दाणी यांनी नागपुरात संघाची शाखा सुरु केली आणि गोळवलकर त्यात सामील झाले ते कायमचेच.

१९३३ मध्ये प्राणीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून बनारस विद्यापीठाने त्यांची तीन वर्षासाठी नियुक्ती केली. त्यावेळी डॉ. हेडगेवार हे पंडित मदनमोहन मालवीय यांच्या भेटीसाठी येत असत. त्यावेळी हेडगेवारांनी गरुजींना पाहिले, त्यांचे काम समजून घेतले त्या मुळे त्यांना संघकार्यात सहभागी करुन घ्यावे असे त्यांना वाटले, परंतु १९३६ मध्ये गुरुजींचा विद्यापीठाचा सेवाकाळ संपल्यावर गुरुजी साधनेसाठी सारगाची येथिल आश्रमात गेले. १९३७ च्या मकर संक्रांतीच्या दिवशी अखंडानंदांनी गुरुजींना अनुग्रह दिला. काही दिवसांनी अखंडानंद समाधिस्थ झाले. त्यांनी गुरुजींना सांगितले होते की तुझा जन्म राष्ट्रकारणासाठी आहे. राष्ट्रदेवो भव‘ हा मंत्र जपत तू देशभर फिरशील. आपल्या गुरुंच्या निर्वाणानंतर गुरुजी अस्वस्थ झाले होते.त्यांनाही समाधी घ्यावी असे वाटू लागले तेंव्हाच त्यांची आणि डॉ. हेडगेवार यांची भेट झाली,आणि त्यांनी समाधी घेण्याचा विचार रहीत करून पुढील सर्व काळ राष्ट्रहितासाठी व्यतीत करायचा हे नक्की केले आणि डॉ. हेडगेवारांना आपला उत्तराधिकारी मिळाला. त्यानंतर डॉ. हेडगेवारांनी संघाच्या काही निवडक लोकांचे सिंदी येथे एक विचार शिबीर घेतले. त्यात संघाच्या प्रार्थना गीतापासून कार्यपध्दतीपर्यंत ध्येय धोरण ठरवले आणि आपल्या सर्व कार्याची धुरा गुरुजींच्या खांद्यावर ठेवली.

संघाच्या सरकार्यवाहपदी गोळवलकर गुरुजींची १९३९ मध्ये नियुक्ती करण्यात आली. दुर्दैवाने डॉ. हेडगेवार यांचा २१ जून १९४० रोजी स्वर्गवास झाला. आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणून श्रीगुरुजींची सरसंघचालकपदी निवड करण्यात आली. स्वतः डॉ. हेडगेवारांनीच मृत्युपूर्वी एका पत्रात तशी इच्छा लिहून ठेवली होती.

डॉक्टरांच्या नंतर ३३ वर्षे गुरुजीनी संघाचे सारथ्य केले. त्याच काळात संघाचा प्रसार आणि प्रचार फार मोठया प्रमाणात झाला. हे होत असताना १९४८ साली संघबंदीचा आदेशही आला. जुलै १९४९ मध्ये ही बंदी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी घातलेल्या अटी संघाने मान्य केल्यानंतर उठविण्यात आली.

या प्रदीर्घ काळात त्यांनी संघाचे ‘हिंदूंची सामाजिक – सांस्कृतिक संघटना’ हे स्वरूप व्यापक केले. समाज जीवनाच्या अनेकविध क्षेत्रात त्यांनी एक विचाराने काम करणाऱ्या संस्था उभारल्या. ‘संघ परिवार’ हीच आज या सर्व संस्थांची सामुहिक ओळख आहे. भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि येथील सर्व नागरिक हिंधू धर्माचे पालन करणारे,अन्य धर्मीय असतील तर हिंदू धर्माचा किमान आदर करणारे असावेत या आग्रही मताचे श्रीगुरुजी होते. त्यांनी लिहिलेल्या ‘वुई ऑर अवर नेशन डिफाइनड’ या ग्रंथात याच मताचा त्यांनी हिरीरीने पुरस्कार केला आहे. त्यांच्या या विचारामुळे त्यांच्यावर आजही विरोधकांकडून कडवट टीका केली जाते. ‘बंच ऑफ थॉट्स‘ या पुस्तकात देखील त्यांनी याच विचारांचे आग्रही प्रतिपादन केलं आहे.

त्यांना संशयित आणि देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे गुरुजींना कारावास ही घडला. या सगळ्या प्रकरणातून त्यांची सुटका झाली,आणि ‘राष्ट्राय स्वाहा‘ म्हणत गुरुजींचे संघकार्य राष्ट्रकार्य म्हणून सुरुच राहिले.

श्री.नरहर नारायण भिडे यांनी ‘ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ ही संस्कृत प्रार्थना लिहिली आणि १८ मे,१९४० रोजी नागपूरला संघ शिक्षावर्गात प्रथमच म्हटली गेली.त्यांच्या प्रार्थना लिखाणाला डॉ.हेडगेवार आणि गोळवलकरगुरुजींचे मार्गदर्शन लाभले होते.संपूर्ण संस्कृत मध्ये असलेल्या या प्रार्थेनेची फक्त शेवटची ओळ “भारत माता की जय ” हिंदीमध्ये आहे.त्या दिवसापासून संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात ही प्रार्थना म्हणणे अनिवार्य असते .


नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

भारत माता की जय ।।

प्रार्थनेचा अर्थ
हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो. हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबध्द झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही. असे शुध्द चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल. उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृध्दी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटीत कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.
।। भारत माता की जय ।।

प्रार्थनेची लिंक
https://youtu.be/PcghmhBCZ9g

नमस्ते सदावत्सले मातृभूमे हे शब्द सदा ओठावर बाळगणार्‍या गुरुजींना कॅन्सर झाला होता आणि जाज्वल्य हिंदुराष्ट्राभिमानी गुरुजींनी ५ जून १९७३ या दिवशी इहलोकीची यात्रा संपवली.

त्यांनी दिलेला विचार हाच आचार मानून संघ कार्यकर्ते कायमच वाटचाल करत असतात

‘श्री गुरुजी’ माधव सदाशिव गोळवलकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन .

प्रसाद जोग.सांगली.
९४२०४११५०

Back to top button