Opinion

आस्था आहे तर व्यवस्था आहे, कोविड सेंटरमधील कार्यकर्त्याचे सेवेचे मर्म

कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सेवाभारती आणि संघाशी संबंधित अन्य संस्थांच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रकारच्या सेवा गरजूंसाठी उपलब्ध करून दिल्या. कोविड केअर सेंटर ही त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण सेवा. आज अनेक कोविड केअर सेंटरमध्ये आपापल्या सोयीच्या वेळा पाहून, प्रसंगी महत्त्वपूर्ण कामे बाजूला ठेवून कार्यकर्ते या सेंटरमध्ये मदत करत आहेत, ती ही कोविड संक्रमणाचा धोका असताना. अंधेरीच्या वैभव बागुलांसारखे काही संघकार्यकर्ते तर कायम तिथेच राहून आपले काम करीत आहेत.

रवींद्र जोशी मेडिकल फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि केशवसृष्टीच्या साहाय्याने महापालिकेच्या नित्यानंद शाळेत कोविड केअर सेंटर २०२१च्या एप्रिल महिन्यात सुरू झाले. सुरुवातीच्या दिवसापासून दोन किंवा तीन शिफ्टमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, कॅण्टीन सांभाळणारे असे सगळेच आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत आहेत. पण वैभव बागूल मात्र पहिल्या दिवसापासून ऑन ड्युटी २४ तास इथल्या सेवेत रुजू आहेत. गेला जवळपास एक महिना ते घरापासून दूर आहेत आणि कोविडरुग्णांसाठी आपली सेवा देत आहेत. समर्पिततेने, आस्थेने आपली जबाबदारी निभावत आहेत.

पेशाने व्हिडिओ मेकर असणारे वैभव कोविडच्या पहिल्या टप्प्यातही स्क्रीनिंग, कोविड सेंटर, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण अशा वैविध्यपूर्ण सेवा कार्यात सहभागी झाले होते. कोविडच्या लसीच्या ट्रायल सुरू असताना त्यांनी पुढाकार घेऊन स्वतःवर लसीची चाचणी केली होती. यावेळी भीती नाही का वाटली, असे विचारता ते म्हणाले की कोणीतरी पुढे यायलाच हवे होते. मग आपणच का नको, म्हणून मी स्वतःच त्यासाठी पुढाकार घ्यायचे ठरवले.

२०२१मध्ये कोविडच्या दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेल्या रवींद्र जोशी मेडिकल फाऊंडेशनच्या कोविड सेंटरमध्ये येण्यापूर्वी वैभव यांची नोकरी गेली. दुसरे काही सुरू करण्यापेक्षा सध्या सेवाव्यवस्थेत जाण्याचा विचार त्यांनी केला व या सेंटरमध्ये पूर्णवेळ केअर टेकर म्हणून काम पाहू लागले.

इतके दिवस एका आरोग्यव्यवस्थेत काम करताना कधी कंटाळा वा त्रास जाणवला का असे विचारताच ते म्हणाले, आस्था आहे तर व्यवस्था आहे. या सगळ्यांना आपली गरज आहे ही भावना आणि कर्तव्याप्रती आपली आस्था कंटाळा वा त्रागा अशी कोणती भावना मनात येऊ देत नाही. तुम्ही आपोआपच त्या व्यवस्थेत रुजू होता, रुळता व आपले काम करीत राहाता. मी इथे जरी सेवेत असलो तरी बाहेरच्या कामांची सगळी आघाडी कोविड केअर सेंटरचे पालक गिरीश कुलकर्णी यांनी सांभाळली होती. त्यामुळे अमुक एका गोष्टीची गरज आहे तर ती कुठून आणू असा प्रश्न कधी उद्भवला नाही.

इथे येणारे रुग्ण हे कोणत्याही वयाचे, कधी कोविडची लक्षण असणारे तर कधी कोणतीही लक्षणे नसणारे असू शकतात. त्यांच्याबरोबर जुळवून घेत घेत काम करायचे असते. सध्या तर इथे पाच वर्षे, दोन वर्षे वयाची लहान मुलेही आहेत. पीपीई कीट घालून बच्चेकंपनीशी खेळावे लागते, त्यांना रमवावे लागते. कधी ल्यूडो तर कधी कॅरम तर कधी फूटबॉलही खेळावा लागतो. दिवसभरात केवळ पंधरा मिनिटे मोबाईल आणि अर्धा तास टिव्ही एवढेच पाहण्याची त्यांना परवानगी असते मग त्यांना विरंगुळा म्हणून कधी खेळावे लागते तर कधी गप्पागोष्टी कराव्या लागतात. पण लहान मुलांचा सहवास फार लोभस वाटतो, वैभव सांगत होते.

एखाद्या रुग्णाच्या बाबतीत कधी आव्हानात्मक स्थिती उद्भवली का असे विचारता ते म्हणाले, एक आजोबा इथे आले तेव्हा व्यवस्थित आले. पण एका रात्री अचानक त्यांना छातीत दुखायला लागले. रात्रीच्या वेळी अनेकांना संपर्क करून त्यांना हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित पोहोचवले तेव्हा जीव भांड्यात पडला. पण अन्यथा तशी अन्य काही आव्हानात्मक स्थिती उद्भवली नाही.

ही मुलाखत सुरू असताना कोविड सेंटरमध्ये वैभव बागूल एका रुग्णाबरोबर कॅरम खेळण्यात गर्क होते हे समजले. आपल्यासाठी आरोग्यविषयक सुविधा म्हणजे अगदीच कोरडेपणा असणारे वातावरण असते. पण या सेवांमध्येही वैभवसारखी अंतरीची कळा दाखवून जाणारी, सेवाव्रत आस्थेने स्वीकारणारी माणसे मनाला आश्वस्त करतात. माणुसकीचा झरा अद्याप वाहाता असल्याची साक्ष देतात.

Back to top button