Opinion

धगधगता पश्चिम बंगाल – भाग १

पश्चिम बंगालमधील स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. या विषयाचा आवाका मोठा असल्याकारणाने या लेखाद्वारे होणाऱ्या चर्चेचे दोन भाग करणे क्रमपाप्त झाले आहे. म्हणून या पहिल्या भागात जागतिक स्तरावरील राजकारण, आपला देश आणि जगाचा आपल्या देशाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचा इतिहास, तसेच वर्तमान माहिती तंत्रज्ञान आणि व्यापारी युगाचा परिणाम इ. विषयासंबंधी चर्चा करू या.

कोरोना संकट हेच मूलतः जागतिक राजकारणाचेच अपत्य असल्याचे सिद्ध होऊ लागले आहे. कोरोना विषाणूचा पॅथॉलॉजिकल अभ्यास, औषधे आणि लस शोधण्याचे प्रयत्न झाल्यावर सध्याच्या व्यापारी युगात जगभरातील काही देशांमध्ये जसे अंतर्गत राजकारण आहे तशीच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सत्तास्पर्धा सुरू झालेली दिसते. पण तसे होत असताना शक्तीशाली देश स्वतःचा फायदा अधिक प्रमाणात घेण्यात यशस्वी होताना दिसतात. याची मुख्य कारणे दोन आहेत. पहिले कारण, त्या देशांची वरचढ ठरणारी सामरीक शक्ती आणि दुसरे कारण त्या देशाची आर्थिक संपन्नता. आर्थिक संपन्नतेतून अत्याधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून इतर देशांत भय, भ्रम, पसरविणे त्यांना सोपे जाते. असा उपयोग करताना सत्य स्थिती दडपून ठेवणे व त्या जागी खोटे-नाटे व्हिडीओ पाठविणे अशा क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. आपल्या देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लहरीसंबंधीत दाखविले जाणारे आकडे, मृतांच्या चित्रांचे प्रक्षेपण फेक आहेत. पण सध्याच्या या महिती व तंत्रज्ञानाच्या युगात ‘ ज्याच्या हाती अत्याधुनिक मिडीया त्याची म्हैस’ हा जगाचा न्याय ठरला आहे. त्यामुळे आपल्या देशात सोशल मिडीयावर उलट-सुलट चर्चा होत आहेत. त्यातून आपला समाज राजकीयदृष्ट्या दुभंगत आहे आणि ते देशाच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. आजचे युग हे केवळ जाहिरातबाजीचे राहिले नाही. पूर्वी जाहिरातबाजी फक्त व्यापारी जगापुरता मर्यादीत होती. आजचे जग माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. त्याचा परिणाम हळुहळू सत्तास्पर्धेवर होत गेला आणि शेवटी हेच तंत्र आज सत्तास्पर्धातील मग ती देशपातळीवरची असो वा जागतिक पातळीवरील असो एक अणकुचीदार महाशस्त्र बनले आहे. हेच शस्त्र काही विदेशी शक्तींनी आपल्या देशाविरूद्ध उगारलेले दिसते. हे शस्त्र इतके विषारी आहे की, आपल्या देशाच्या राज्यव्यवस्थेलाच हादरे देऊ शकते.

कुठल्याही देशातील निवडणुकांमध्ये बड्या राष्ट्रांचा, विदेशी धनाढ्य लोकांचा आणि धार्मिक उन्माद चढलेल्यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप होत नाही असे म्हटले जात असले, तरी ट्रम्प महाशयांनी रशियाच्या साह्याने अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असे जगभर मानले गेले. तेच शस्त्र अमेरिकेतील डेमॉक्रॅटीक पक्षाने बायडेन महाशयांना निवडून आणण्यात वापरले नाही असे छातीठोकपणे म्हणता येत नाही. फरक इतकाच की यावेळी तिथल्या अध्यक्षीय निवडणूकीची पटकथा रशियाच्या ऐवजी चीनने तयार केली असावी. मिस्टर बायोडेनचा पक्ष डेमॉक्रॅटीक, पण छुप्या मार्गाने सलगी मात्र एक पक्षीय हुकूमशाही असलेल्या चीनशी. आपला भारत देश हा सध्या तरी विकसनशील देश मानला जातो. त्यामुळे आपल्या देशातील राजकारणावर जगातील सर्वच बड्या देशांकडून नाक खुपसण्याचे प्रकार घडत आले आहेत. आपल्या देशाची दोन आगळी-वेगळी वैशिष्ट्ये आहेत. पहिले वैशिष्ट्य हे की आपली संस्कृती एकेश्वरी नाही. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कालच्या जगातही हिंदू समाजाचा एकमेव देश फक्त भारत होता आणि आज ही तोच आहे आणि पुढेही हिंदू समाजासाठी तोच एकमेव राहणार आहे. कारण धर्माच्या नावाखाली साम्राज्य वाढविणे ही दुष्टप्रवृत्ती आपल्यात भिनली नाही. कारण आपल्या रोमारोमात सहिष्णुता भरलेली आहे. या एकमेव कारणामुळे मध्ययुगीन काळात जगातील दोन एकेश्वरी पंथीयांच्या म्हणजेच मुस्लीमांच्या आणि ख्रिस्तांच्या मनांत या देशाचे लचके तोडण्याची पाशवी इच्छा निर्माण झाली आणि त्यात त्यांना आपल्यातील एकतेच्या अभावामुळे यश मिळाले.

कोणी मानो वा न मानो पण जर्मनीतील नाझी भस्मासुराच्या उदयामुळे जगभरातील पारतंत्र्यतेच्या जोखडात अडकलेले सारे देश स्वतंत्र झाले ही एक चांगली गोष्ट घडली. त्या भस्मासुराने ‘ ब्रिटीश राज्याचा सूर्य कधी मावळत नाही ‘ अशा फुशारक्या मारणाऱ्या आणि आपल्या महात्मा गांधीजीना अर्धा नग्न फकीर म्हणणाऱ्या तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान चर्चील यांना युद्धकाळात दिवसाढवळ्या बिळात लपून बसण्याची पाळी आणलीच ना! ताकदवान देशांना भस्मसात करण्यात तो असफल ठरला पण जाता जाता त्याने ताकदवान देशांना धूळ चारली आणि दुर्बळ देशांना ‘ज्याच्या हाती काठी त्याची म्हैस’ हा मंत्र दिला. आपल्या येथे प्राचीन काळापासून ‘ नायमात्मा बल हिनेन लभ्यः’ असे वचन म्हटले गेले आहे. (दुर्बलांना ईश्वर दर्शन देत नाही) या आशयाचे एक सुभाषित ही आहे. ते असे आहे,
अश्व नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैवच |
अजापूत्रं बलि दद्यात् देवो दुर्बल घातकः ||
( ना घोडा, ना हत्ती आणि वाघाला तर नाहीच नाही फक्त बकरीच्या पिल्लालाच बळी दिला जातो)

मध्ययुगीन काळात आपल्याला वरील वचन आणि सुभाषिताचा विसर पडला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लागलीच पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला तेव्हा ही बातमी महात्मा गांधीजींना कळविली तेव्हा त्याचे उत्तर असे आहे, ‘ पाकिस्तानला शांतीची भाषा कळत नाही. आता त्याच्यावर लष्करी कारवाई करा ‘ मुद्दा हा की कलियुगात बळी तो कान पिळी हाच न्याय ठरतो. ‘ठकासी व्हावे महाठक’ हा समर्थ रामदास स्वामीचा उपदेश लक्षात ठेवूनच देशाचे संरक्षण, परराष्ट्र, आणि आंतरिक सुरक्षा संबंधीचे धोरण ठरविणे आवश्यक आहे. याला कोणी आक्रमक राष्ट्रवाद म्हणत असतील तर त्या विचाराची मंडळी वरून गांधीवादी पण आतून विदेशी पैशाला गुलाम झालेली होय.

आज स्वतंत्र झालेले देश ही परमाणू शस्त्रधारी झाले. म्हणून गेल्या ७५ वर्षात महायुद्ध खेळण्याची बिशाद कुठल्याच देशाला झाली नाही. काळ बदलला. शेवटी आर्थिक स्पर्धेत सर्वात पुढे राहावे आणि महासत्तापदी विराजमान होण्याची एक नवी कल्पना जन्मास आली. आजच्या जगात भारत देश आर्थिक स्पर्धेत महासत्ता होऊ शकतो ही जाणीव मुस्लीम आणि ख्रिस्ती समाज व्यापलेल्या काही देशांना होऊ लागली आहे. त्यांच्या रक्तात भिनलेली हिंदू द्वेषाची खाज अधून-मधून डोके वर काढते, आणि तेच एकमेव कारण आहे ज्याच्यातून चीनशी अप्रत्यक्षपणे सहकार्य करीत या दोन्ही समाजाच्या लॉब्या भारतात अस्थिरता निर्माण करीत असतात. त्याचेच प्रत्यंतर आपल्या देशाच्या राजकीय मंचावर विशेषतः महाराष्ट्र, दिल्ली, आणि पश्चिम बंगाल, इथे जी नाट्ये होत आहेत त्यातून होत आहे.

बंगालमध्ये जे घडते आहे त्याचे स्वरूप राजकीय मंचावरील एक नाटक किंवा चाल असे राहिले नाही. ते देशांतर्गत उभे केलेले एक युद्ध आहे. यानंतर देशात घडल्या जाणाऱ्या किंवा घडविल्या जाणाऱ्या घटना ही एका महायुद्धाची सुरूवात आहे असे मला वाटते. म्हणून केंद्र सरकार विरूद्ध पश्चिम बंगालच्या सरकार मधील सध्या सुरू झालेली जी लढाई आहे, ही कदाचीत इस्ट इंडीया कंपनीच्या विरूद्ध झालेल्या प्लासीच्या लढाईची नवी आवृत्ती तर नाही ना, असा विचार ही मनाला शिवून गेला. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या देशात भाजप सोडला तर बाकी सारे राजकीय पक्ष हे प्रांतीय स्तरावरचे आहेत. त्यांच्यातलं एक सामाईक वैशिष्ट्यं म्हणजे ते सारे पक्ष घराणेशाहीने बरबरटले आहेत. म्हणजेच प्रत्येक राज्यात राजेशाही आहे. ह्या राजेमहाराजांचे आपआपल्या राज्यातील प्रत्येक शहरात, जिल्ह्यात आणि तालुक्यात अनेक सुभेदार आहेत. या राजेमहाराजांचा कारभार जसा लहरी व आत्मकेंद्रीत तसाच त्यांच्या सुभेदारांचा. त्यामुळे देशातील प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर समाजातील शीलवान, साहित्यिक, विचारवंत, संपादक आणि नोकरशहा सारख्या मंडळींनाही सर्वत्र आपापल्या राजांचे वा सुभेदारांचे चरणच या जगतातील अतिपवित्र प्रार्थनास्थळ वाटू लागले आहे. त्यामुळे या आधुनिक राजेमहाराजांनी विदेशी शक्तींशी हात मिळवणी केली तरी तरी त्यांच्या भाटांना ते गैर वाटत नाही. याच मानसिकतेमुळे मध्ययुगीन काळापासून एक हजार वर्षाहून अधिक काळ आपला देश पारतंत्र्यात अडकला.

आज पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काॅग्रेसच्या जिल्हा-तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांनी जो धुडघूस घातला आहे तो आपल्या देशाच्या मध्ययगीन काळाच्या इतिहासाशी साम्य दाखवतो. मध्ययुगीन कालीन मानसिकतेने कोणाला घेरले आहे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची विस्तवाशी खेळण्याची खुमखुमी, त्यांचा उतावेळपणा, व त्यासाठी त्यांना विरोधी पक्ष तथाकथीत सेक्यूलर मिडीया हाऊस आणि डावे व पुरोगामी विचारवंताकडून मिळत असलेले प्रोत्साहन इ. बाबी, तसेच केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार मधील जंग, बंगालच्या स्थितीसंबंधी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिका, आणि त्यांच्या निकालातून काय निष्पन्न हाती लागते या विषयांवरील चर्चा आपण भाग २ मध्ये करू या.

(क्रमशः)

  • विष्णू एन. म्हात्रे
Back to top button