EducationOpinion

वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांचीही आता ‘ऑनलाईन’ उपस्थिती

‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ च्या वतीने दरवर्षी वंचित व गरजू विद्यार्थ्यांना शालेय संच म्हणजेच ‘स्कूल कीट’ चे वितरण करण्यात येते. दुर्गम गावातली हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांच्या मुलामुलींचे शाळेत शिक्षण घेऊन, अभ्यास करून खूप मोठे होण्याचे स्वप्न असते. अशा होतकरू मुलांना नवे कोरे दप्तर, वह्या-पुस्तके, कंपासपेटी यासारख्या शालोपयोगी वस्तू देऊन त्यांच्या शिक्षणाच्या प्राथमिक गरजा सेवा सहयोगच्या वतीने पूर्ण केल्या जातात. शाळेत शिकून मोठे होण्याच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने बळकटी देण्याचे कार्य सेवा सहयोगच्या वतीने केले जाते.

२०२० साली कोरोना महामारीमुळे लॉकडाउन सुरु झाल्यापासून विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. शाळाच बंद असल्यामुळे किंबहुना शाळेतच जावे लागणार नसल्यामुळे शालोपयोगी वस्तूंची आवश्यकता मुलांना भासणार नव्हती. तरीही २०२० साली सेवा सहयोग
च्या वतीने विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय संच न देता घरचा अभ्यास किंवा उजळणीसाठीकेवळ वह्यांचे वितरण केले होते.

सेवा सहयोगच्या वतीने यावर्षी मात्र विद्यार्थ्यांना स्व-अध्ययन मोबाइल अ‍ॅप (ऑनलाईन) वितरित करण्यात येणार आहे. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल द्वारे शाळेमध्ये ऑनलाइन उपस्थित राहणे, बंधनकारक आहे. मात्र ऑनलाइन अभ्यास करताना मुलांच्या एकाग्रतेचे प्रमाण अत्यल्प असते. लक्ष केंद्रित करण्यावर त्यांचा किमान भर असतो. बऱ्याचदा शाळेतल्या शिकवणीच्या तुलनेत त्यांना ऑनलाईन शिकवणीतून अभ्यास करणे जड ही जाते. त्यामुळे सध्याच्या ऑनलाइन पद्धतीमुळे गुणवत्तापूर्वक शिक्षणाचा अभाव जाणवतो. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता सेवा सहयोगच्या वतीने यावर्षी स्व-अध्ययन मोबाइल अ‍ॅप (ऑनलाईन) देण्याचे ठरविण्यात आले आहे. हे अ‍ॅप दोन प्रकारे उपलब्ध आहे.

ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित नाही किंवा इंटरनेट घेण्यासाठी ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत त्यांच्यासाठी स्व-अध्ययन मोबाइल अ‍ॅप (ऑफलाईन) १६ जीबी मेमरी कार्ड वर देण्यात येणार आहे, तर जिथे चांगले इंटरनेट कनेक्शन उपलब्ध आहे त्यांना ऑनलाईन अ‍ॅप देण्यात येणार आहे. हे मेमरी कार्ड इयत्तांच्या अभ्यासाने परिपूर्ण असून विद्यार्थ्यांना वर्षभर त्याचा वापर करता येणे शक्य होणार आहे.

हे अ‍ॅप केवळ व्हिडिओ, ऑडिओ स्वरूपात नसून त्यामध्ये संकल्पनांचाही समावेश असणार आहे. त्या संकल्पनेवर आधारित काही प्रश्नोत्तरे तसेच परीक्षांचाही समावेश असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रश्नोत्तरांची उत्तरे देणे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थी कशाप्रकारे या अ‍ॅपचा उपयोग करीत आहे, प्रत्येक विद्यार्थ्याने कोणता धडा वाचला, त्याला तो धडा किती समजला, कोणत्या धड्याची प्रश्नोत्तरे त्याने लिहिली आहेत. वर्षभरात विद्यार्थ्यांनी या अ‍ॅपचा वापर कशापद्धतीने केलेला आहे. यासंबंधीचा एक डेटाबेस देखील तयार होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल जाणून घेणे शक्य होणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या तीन महिन्याच्या कालावधीनंतरही विद्यार्थ्यांची प्रगती पाहता येणे शक्य आहे. एखादा विद्यार्थी अपेक्षित प्रगती करत नसेल, तर त्याला मार्गदर्शन करण्यासाठी काही शाळांच्या मुख्याध्यापकांशी आणि शिक्षकांशी सुद्धा विचारविनिमय करण्यात आले आहे. या अ‍ॅप समवेतच विद्यार्थ्यांना १ डझन वह्या व चित्रकलेची वही सुद्धा देण्यात येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांना केवळ माहिती, ज्ञान, अभ्यासाचे धडे उपलब्ध करून देणे हाच यामागचा उद्देश नसून सहजसोप्या शब्दात मुलांना विषय कळावेत, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

सेवा सहयोगला महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतील शाळा तसेच मुंबई, पालघर, डहाणू, वाडा, रायगड जिल्हा आदी भागांतील २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत हे अ‍ॅप पोहोचवायचे आहे. कोरोना महामारीमुळे अनेक वंचित व गरजू विद्यार्थ्यांचे योग्य साधने व मार्गदर्शना अभावी शैक्षणिक नुकसान झाले आहे. यावर्षी सुद्धा शाळा प्रत्यक्ष सुरू होणार नसल्यामुळे मुलांना ऑनलाइन शिक्षणच घ्यावे लागणार आहे. पण यावर्षी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता सेवासहयोगच्या वतीने सदर मोबाइल अ‍ॅप ची एका वर्षाची सदस्यता मोफत देण्यात येणार आहे. हे ई-स्कुल कीट दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. पर्याय पहिला : स्व-अध्ययन मोबाइल अ‍ॅप (ऑनलाईन) + १२ वह्या + १ चित्रकला वही = रु. ५०० प्रति विद्यार्थी; तर पर्याय दुसरा : स्व-अध्ययन मोबाइल अ‍ॅप (ऑफलाईन) + १२ वह्या + १ चित्रकला वही = रु. १ हजार प्रति विद्यार्थी. (१६ जीबी मेमरी कार्ड व वितरण खर्चासह) यापैकी कोणताही एक पर्याय किंवा दोन्ही पर्याय निवडून इच्छुक दानशूरांनी आपल्या इच्छेनुसार एक किंवा अधिक विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन सेवा सहयोगाच्यावतीने करण्यात आले आहे.

सेवा सहयोग फाउंडेशन ही एक नोंदणीकृत संस्था असून अनेक नामांकित कंपन्यांसमवेत सीएसआर अंतर्गत सेवा प्रकल्प राबवित आहे. आयकर कायद्याच्या कलम ८० जी अंतर्गत देणगी कर वजावटीस पात्र असेल. देणगी लिंक: https://donations.sevasahayog.in/eschoolkit असून जास्तीत जास्त दानशूरांनी मदत केली असता, अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणे टळू शकेल. आपल्या एका मदतीमुळे त्यांच्या शिकण्याला हुरूप चढेल.

Back to top button