News

केशवसृष्टी ग्रामविकास योजनेअंतर्गत विविध समाजपयोगी उपक्रम

भाईंदर, दि. ५ जुलै : केशवसृष्टी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जून महिन्यात निरनिराळे उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये अक्षय सहयोग योजना, गिलोय, हँडग्लोव्हसचे वितरण, आरोग्य रक्षक दाम्पत्य प्रशिक्षण सत्र, वाडा ग्रामीण रुग्णालयात शेड उभारणे, माहुली किल्ल्यावर ‘नेतृत्व विकास’ च्या वतीने स्वच्छता अभियान, डाहे गावात ११ शॊचालयांची निर्मिती, बावली येथे केळीच्या खांबापासून मिळत असलेल्या मऊसूत तंतूंपासून हस्तकला वस्तूंच्या निर्मितीचे महिलांना प्रशिक्षण तसेच जव्हार तालुक्यात सौरदिव्यांचे वितरण आदी उपक्रमांचा समावेश आहे.

सामाजिक विकासात नेहमीच अग्रेसर असणारी केशवसृष्टी ही संस्था वनवासींचे आर्थिक रक्षण, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी कटिबद्ध आहे. याअंतर्गत केशवसृष्टीने ‘अक्षय सहयोग’ या नवीन उपक्रमानुसार कोरोना ने प्रभावित झालेल्या कुटुंबियांचे सशक्तीकरण करण्यात येत आहे. प्रभावित कुटुंबांसाठी जी मदत केली जात आहे त्यामध्ये शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण, वैद्यकीय सहाय्य, कायदेशीर सहाय्य्य, करिअर समुपदेशन, मानसिक आरोग्य सल्ला, विवाह मदत, मासिक शिधावाटप, निवारा, सरकारी योजनेचा लाभ आदी महत्वपूर्ण बाबींचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत ४३ प्रभावित कुटुंबाशी संपर्क करण्यात आला असून त्यापैकी ३९ कुटुंबांना या योजनांचा लाभ घेतला आहे.

वाडा तालुक्यातील १५ गावांमध्ये औषधी वनस्पतींच्या शेतीवर भर देण्यात येत असून ‘अमृता फॉर लाईफ’ योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ३ हजार गुळवेलींची लागवड करण्यात आली. तालुक्यातील अन्य दहा गावांमध्ये २ हजार गुळवेलींच्या लागवडीचे नियोजन आहे. वाडा, परळी, गोऱ्हे, पोशेरी आदी ५ आरोग्य केंद्रात एकूण ८ हजार हँडग्लोव्हसचे वितरण करण्यात आले. केशवसृष्टी ग्राम विकास योजना, वाडा कार्यालयात आरोग्य रक्षक दांपत्यांचे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. निवडण्यात आलेल्या १० दांपत्यांपैकी ७ दांपत्यांनी या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला होता. वाडा ग्रामीण रुग्णालय हे वाडा तालुक्यातील एकमात्र सरकारी रुग्णालय आहे . या रुग्णालयात उपचाराकरिता मोठ्या संख्येने रुग्णांची ये-जा सुरु असते. त्यांच्या सोयीकरिता शेड बांधण्यात आली आहे.

शिवराज्याभिषेक आणि हिंदू साम्राज्य दिवसाच्या औचित्याने नेतृत्व विकास च्या सदस्यांनी माहुली किल्ल्यावर स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. डाहे येथील बोचलपाडा गावांत ११ शौचालयांची निर्मिती करण्यात आली. केळीच्या खांबापासून मिळत असलेला तंतू मऊसूत असतो तसेच तो चांगल्याप्रकारे फोल्डही करता येतो. केळीच्या खांबाच्या तंतूंपासून दोरी, पायपुसणी, राखीसाठी धागा बनविणे आदी विविध प्रकारच्या हस्तकला वस्तूंच्या निर्मितीचे प्रशिक्षण बावली गावातील महिलांना देण्यात आले. यामुळे येथील महिलांना स्वयंरोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील हुंबरण, माडविहारा आणि सुकीचा माळ या गावांत २६० कुटुंबियांना सौरदिव्यांचे वितरण करण्यात आले.

तसेच मुंबईतील विलेपार्ले आणि अंधेरी येथे १८ ते ४४ वयोगटातील ५ हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Back to top button