OpinionSevaकोकण प्रान्त

ले चले हम राष्ट्रनौका को भंवर से पार कर!

“ओ निलेशजी , ते पाण्याचे क्रेट कुठे ठेवायचेत ” , अरे श्रेयस , या टेम्पो मध्ये किती किट भरायचेत ? , “रमेशजी , जेवणाचे किट्स तयार आहेत ना ? , ते या लोडिंग अनलोडिंगवाल्यांना द्या ट्रक मध्ये भरायला , ” अभिजीतजी लवकर अडीचशे किट पॅक करून तयार ठेवा , टेम्पो कधीही येईल ” , चला भराभर हा टेम्पो उतरवून घ्या ” … गेल्या जवळपास सात दिवसापासून हीच कामाची लगबग सुरू होती ती म्हणजे पूरग्रस्तांना मदत म्हणून महाडच्या बी एस बुटाला हॉलच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उभारलेल्या मदत केंद्रात ….आणि पुढे जाऊन आम्हीही याचा एक भाग होऊन खारीचा वाटा उचलणार होतो …

 २२ जुलै २०२१ च्या पुरात महाडचे प्रचंड नुकसान झाल्याची ही खबर लागताच कठीण समय येत संघ कामास येतो या उक्तीप्रमाणे 23 तारखेला पूर ओसरताच लगोलग महाड आणि जवळचे संघस्वयंसेवक एकत्र आले आणि दुपारपर्यंत बी एस बुटाला सांस्कृतिक भवन या ठिकाणी मुख्य मदत केंद्र उभे राहिले. आणि आम्ही कल्याणचे १७ स्वयंसेवक या कार्यात २८ जुलैपासून सहभागी झालो. तसेच समितीच्या चार सेविका चिपळूणला मदतीसाठी गेल्या.

  महाड शहराच्या अगोदरच जाताना हायवे वरही पाणी कितपत भरले असेल याचा अंदाज झाडांच्या शेंड्यावर अडकलेल्या कचरा, झुडपं यांनी येत होता. परंतु ते तर फक्त ट्रेलर असे म्हणावे लागेल.  तळमजल्यावर राहणाऱ्या सर्व नागरिकांची घरे, त्यातले सामान,  कपडे, धान्य काही - काहीच शिल्लक राहिले नव्हते.  प्रत्यक्ष शहरामध्ये चिखल, पाणी, दुर्गंधीने प्रचंड थैमान घातले होते. प्रत्येक रस्त्यावर चार पाच इंच उंचीचे चिखलाचे थर पूर ओसरल्याच्या  ४ - ५ दिवसानंतरही तसेच होते. मार्केट भागात प्रत्येक एका दुकानाबाहेर पाण्यात फुकट गेलेल्या मालाचे ढिगच्या ढीग लागले होते.  साध्या लहानशा  चहाच्या टपरीपासून ते मोठाल्या स्टोअर्स पर्यंत ..सगळे  वाहून उध्वस्त झाले होते.  एक एक उध्वस्त दुकान डोळ्यावर आणिक मनावर आघात करत होते. मदतीचे किट पोहचवायला मी सुकट आळी भागातल्या एक कार्यालयात गेलो होतो त्याच्या शौचालयातून खेकडे बाहेर येताना पाहूनच डोळे मिटले. आणि हीच परिस्थिती घरोघरी आहे हेच वास्तव स्वीकारायला मन तयारच नव्हते.  २२ च्या रात्री महाड नजीकच्या वासिष्ठी नदीतटाची गावे रातोरात पंधरा मिनिटात पाण्यात गेली होती.  पडक्या घरांचे अवशेषही अजून जे धक्के पचवत होते.  तिथे माणसांची काय मजल ? गेल्या शंभर वर्षातला हा सर्वात मोठा पूर होता.  सगळंच भीषण होत .... आणि तरीही .. तरीही मदतकार्य सुरू होते... 

  मदतकार्याच स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेता हे मॅनेज करणाऱ्या संघशक्तीला मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटंच म्हणणं सार्थ होय ! घरं, वस्त्या यांची साफसफाई,  सर्व  ठिकाणाहून आलेले मदतीचे ट्रक अनलोड करणे, धान्य (तांदूळ आणि डाळ), बिस्किटाचे पुडे, टूथपेस्ट आणि ब्रश, महिलांना सॅनिटरी पॅड  या जीवनावश्यक गोष्टींचे किट्स हजारच्या संख्येत रोज तयार करणे,  तयार किट्स,  तयार भोजन आणि पाणी पुन्हा टेम्पोत लोड करून वितरणासाठी पाठवणे, मेडिकल हेल्प अशी इन डोअर आणि आउट डोअर अनेक कामे  एका वेळी सुरळीत सुरू होती.  जवळपास ३००० तयार फूड पेकेट्स आणि साधारण १००० किट्स (ज्यात चार जणांच्या कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतका शिधा असे ) हे रोज वितरित होत. सोबतच झोपण्यासाठी चटई, चादरी, ब्लँकेट्स आणि रोजच्या वापरासाठी कपडे, चपला हे सुद्धा वितरित केले गेले.  संपूर्ण शहराचे सात विभाग करून तिथे विभागनिहाय वितरण आणि मेडिकल केंद्र सुरू केली गेली. प्रत्येक ठिकाणी सर्वेक्षणे करून मदतीचे  सामान आवश्यकतेनुसार पाठवले जात असे. स्थानिक कार्यकर्ते पुढे त्याच घरोघरी वितरण करत.  यामुळे निश्चितपणे गरजवंतापर्यंत वस्तू पोहचवल्या जात असत.  डॉक्टरांच्या टीमने पाच मेडिकल केंद्र अधिक दोन फिरती मेडिकल केंद्र उभी करून आरोग्य विभागाची धुरा सांभाळली.  एकूणएक आलेल्या आणि वितरित झालेल्या गोष्टींची पद्धतशीर कार्यालयीन नोंद होत असे.  अशी ही मदत महाड शहर आणि त्याबाजूच्या इतर पन्नास गावात पोहचली. 

  मदतीचे सामान घेऊन इतर वितरण केंद्रांवर  जाणारे टेम्पो चौकाचौकात पंधरा वीस स्थानिक पूरग्रस्त नागरिक अडवून मदतीची याचना करीत असत.  परंतु नियोजनबद्धतेच्या बंधनामुळे कधीतरी मनावर दगड ठेवून त्यांना नाही म्हणत टेम्पो पुढे रेटला जायचा. अथवा त्यांना जवळ पडेल अशा वितरण केंद्राचा संपर्क किंवा पत्ता आम्ही देत. अशावेळी आपल्याकडे सामान असूनही मदत न करता आल्याचे दुःख किती जिव्हारी लागे हे शब्दात नाही सांगता येणार.  त्या याचकांचे चेहरे रात्री डोळ्यासमोर येत असत. 

  मात्र माणुसकीचेही अनेक चेहरे या परिस्थितीतही आम्ही पाहिले. काही नागरिक गरजेचे तेवढेच सामान काढून घेत आणि उरलेला किट इतर गरजुंना देत असत. "आमाला ह्ये यवड बस की, पुड आखी घरं पान्यात बुडली व्हती, त्यांला देवा हे " अस जेव्हा अर्ध घर पाण्यात गेलेला एक बाप त्याचे कुटुंब समोर असताना स्वयंसेवकांना म्हणतो तेव्हा त्यामागची माणुसकी मात्र महापुरातही आपल्या जागी खंबीरपणे दटून उभी असल्याचा तो एक प्रत्यय होता. 

 शंभर ते दीडशे संघस्वयंसेवक असे अविरत काम करत असतानाच त्यांचीही काळजी पुन्हा संघच घेत होता.  सर्वांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था अगदी चोखपणे व्यवस्था विभाग आणि भोजन विभाग पार पाडत असे.  रात्री भोजनानंतर संघगीत, आढावा बैठक आणि प्रार्थना होऊन लगबग जराशी शांत होई. मग स्वयंसेवकांच्या तासभर भजनाचाही कार्यक्रम छान चालत असे.  कधी कधी तो संपेपर्यंतच तर कधी अगदी बारा साडेबाराच्या सुमारालाही एखादा मदतीचा ट्रक यायचा.  त्यातली धान्याची पोती मात्र भरपेट भोजन आणिक भजनामुळे हलकी वाटायची.  असे काम आटोपून पार मध्यरात्री दिवस संपत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहापासून पुनःश्च हरिओम..  एक शिट्टी झाली की सारं पुन्हा सुरू होत असायचं

  अनेक नव्या भेटीगाठीही इथेच जुळून आल्या. ठाणे, भिवंडी, अलिबाग, रायगड, श्रीवर्धन,  पेण, पनवेल, मुंबई,  पालघर अशा  अनेक गावचे स्वयंसेवक तिथे भेटले आणि साहजिकच गप्पा झाल्या.  अशी सारी माणसं भेटली की पुन्हा शाखेच्या बौद्धिकातल्या गोष्टी आठवत. "भारत हा अखंड देश एका संपूर्ण शरीरासारखा आहे. पायाला इजा झाल्यावर जसे हात ती जखम धरून ठेवायला पुढे जातात तसेच देशात कुठेही आपत्ती आली की इतर भागातले स्वयंसेवक आवर्जून सेवकार्यात योगदान देतात"... नेहमीच ऐकलेली बौद्धिकं ही, आज प्रत्यक्षात पाहत होतो. 

  गेली ९५ वर्ष अनेक पिढ्यान पिढ्या संघाने केलेल्या संस्कारांची फलश्रुती याची देही याची डोळा पाहायला मिळते ती या अश्या कार्यातूनच. सारे काही सावरायला वेळ नक्कीच लागेल,  पण तोपर्यंत संघ आणि संपूर्ण समाज असाच मदतीसाठी खंबीर उभा राहील आणि लवकरात लवकर महाड, चिपळूण पूर्वी होते तसे पुन्हा उभे राहिल हा विश्वास वाटतो, शेवटी काय तर  'ले चले हम राष्ट्रनौका को भंवर से पार कर'

- धनराज रिसबूड, कल्याण
Back to top button