OpinionSeva

….संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बहतर…

….संकटासही ठणकावून सांगावे,
आता ये बहतर,
नजर रोखुनी नजरेमध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर…
करुनी जावे असेही काही,
दुनियेतूनी या जाताना ,
गहिवर यावा जगास साऱ्या ,
निरोप शेवटचा देताना ..
स्वर कठोर त्या काळाचाही,
क्षणभर व्हावा कातर – कातर,
नजर रोखुनी नजरेमध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर…

            - विंदा करंदीकर यांच्या कवितेतल्या या ओळी. याचीच प्रचिती पुढील घटनेत दिसून आली. 


  दि. 24 जुलै ला दरडग्रस्त साखर सुतार वाडी, ता. पोलादपूर, जिल्हा. रायगड येथे आम्ही मदत पूर्व सर्व्हे (निरीक्षणं) करायला मी स्वतः अनिकेत कोंडाजी आणि रमेश ढेबे निघालो. मुख्य गावाला जोडणारा पुलच खचला होता. आम्ही गावात पोहोचताच क्षणी लक्षात आले की बाईक, गाड्या जाण्यास रस्ता नाही. अनेक गावांचा त्या खचलेल्या पुलामुळे संपर्क तुटला आहे. माणसांना ये - जा करण्यासाठी केवळ लाकडाच्या फळ्या आणि ओंडके टाकले होते. त्या तात्पुरत्या बनवलेल्या कच्या रस्त्यावरून सुतार वाडीत लोकांची ये जा सुरु होती. या अतिधोकादायक रस्त्यावरून जातांना जीवावर उदार होऊन गाडी पलीकडे नेली.  गावकरी खचलेल्या पुलापासून साखर, सुतार वाडी (३ किमी) येथे त्याच रस्त्यावरून दरडी खाली मृत पावलेल्या आपल्या बांधवाचा शोध घ्यायला जात होते. 

      त्या गावातील खचून गेलेल्या लोकांना आधार देण्यासाठी तसेच त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली. वाडीचे व दरडग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण करून तातडीची आवश्यकता पाहण्यात आली. दरडी खाली येऊन सुद्धा जीव वाचलेल्या बांधवांना तातडीने त्याच दिवशी मुंबईतील केइएम आणि टाटा रुग्णालयात पाठविण्यात आले. सुतार वाडीत फिरत असताना एक व्यक्ती व्याकूळ, भय आणि भीतीने ग्रासलेली, दरडी खाली येऊन जिवंत राहिलेली. पण शरीराला खुप इजा झाली होती. चालता येत नव्हते, पडलेल्या - जीर्ण झालेल्या पुलावरून जायला निघाले. त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी गावकऱ्यांनी कठोर मेहनत घेऊन पुलापर्यंत उचलून नेले. पण सर्वांचे परिश्रम वाया गेले. त्या व्यक्तीला पुन्हा घरी आणून गावठी औषध देऊन तात्पुरते बरे करण्यात आले. पण पुन्हा त्या वेदना..!! त्यांनी आम्हाला तो घडलेला सर्व प्रसंग सांगितला आणि आमच्या अंगावर अक्षरशः काटे उभे राहिले. आम्ही त्यांना धीर देत होतो. आम्ही आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहोत, अशी आमची ओळख करून दिली. महाड पूरग्रस्तांच्या मदतीकरिता आमचे सेवा कार्य सुरु आहे. आणि आम्ही आपल्या गरजू बांधवांना मदत करायला आलो आहोत. वाडीतील सरपंच, पोलीस पाटील आणि काही तरुण मुलांबरोबर चर्चा केली, एकूण किती घरांचे नुकसान झाले, जीवित हानी, तातडीची आवश्यकता काय आहे, याचा सर्व्हे करुन गरजू कुटुंबांना आवश्यक ते साहित्य कपडे, मेणबत्त्या, शिधा वाटप केले.

 एवढ्या कठीण प्रसंगातही, येथील प्रेमळ माणसांचा अनुभव घेता आला. ज्या वाडीत जाऊ तिथे अगत्याने चहा पाणी विचारले जायचे. अशी खूप प्रेमळ माणसं आम्हाला भेटली, ज्यांची सेवा करून जीवन क्षणातच सार्थक झाल्यासारखे वाटले. खरचं सगळं गमावून बसलेल्या माणसांची आपुलकी पाहून मनाला समाधान मिळत होते. सर्व प्रथम आपण आमच्याकडे आलात. कोणीही इथवर मदतीसाठी आले नाही. आम्हाला धीर दिलात. तुम्ही पहिलेच, असे त्यांचे बोल अजूनही कानात रुंजी घालत आहेत.  !!!! 
 • अनिकेत कोंडाजी
  ७०५७३०५२८७
  http://aniketkondaji.blogspot.com
Back to top button