EducationNews

मुंबई विद्यापीठाला नॅकचे ‘ए प्लस प्लस’ मानांकन

मुंबई, दि. १ सप्टेंबर : देशातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई विद्यापीठाला नॅककडून ‘ए प्लस प्लस’ मानांकन प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्ययन परिषदेकडून (नॅक) मुंबई विद्यापीठास ३.६५ सीजीपीए गुणांकन देण्यात आले आहे. नॅककडून सर्वाधिक गुण मिळवणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. तब्बल चार वर्षांनंतर मुंबई विद्यापीठाला नॅकचे मानांकन मिळवण्यात यश आले आहे.

मुंबई विद्यापीठास मूल्यांकनासाठी नॅक पीअर टीमने नुकतीच भेट दिली होती. पहिल्या टप्प्याअंतर्गत नविन निकषानुसार विद्यापीठाने आयआयक्यूए आणि स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल सादर केला. यात सात निकषांमध्ये अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन प्रणाली, संशोधन, नवनिर्मिती व विस्तार, पायाभूत सुविधा आणि अध्ययन स्रोत, विद्यार्थी सहाय्यता व प्रगती, प्रशासन, नेतृत्व व व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये व उत्तम उपक्रमांचा समावेश होतो. दुसर्‍या टप्प्यांतर्गत विद्यार्थी समाधान सर्वेक्षण आणि माहितीची विधीग्राह्यता आणि पडताळणीची प्रक्रिया पार पडते. यामध्ये ७० टक्के ऑनलाईन प्रक्रिया तर ३० टक्के पीआर टीमची प्रत्यक्ष भेट अशा स्वरूपात मूल्यांकन केले जाते. पहिल्या दिवशी विविध १२ विभागांचे तर दुसर्‍या दिवशी १५ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यापीठाने विविध विद्याशाखांतर्गत दिलेले भरीव योगदान, संशोधनवृतीला चालना, सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थी विकास अशा सर्व बाबतीत विद्यापीठाने संख्यात्मक आणि गुणात्मक अशा निकषांवर विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

विद्यापीठाला ‘ए प्लस प्लस’ असे सर्वोत्कृष्ट मानांकन मिळाल्यामुळे विद्यापीठाला संशोधन प्रकल्प, निधी, योजनांचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन अभ्यासक्रमांसारखे विविध उपक्रम करण्याचे स्वातंत्र्यही मिळणार आहे.

Back to top button