Opinion

रान आपलं आहा अन् आपनालाच चोरी?

१९३० साली आजच्याच दिवशी म्हणजे २५ सप्टेंबर रोजी सकाळी तरुण नाग्याने आपल्या आईचे व बहिणीचे हे बोलणे ऐकले आणि क्षणात त्याला त्याच्या जीवनाचे गमक लक्षात आले. आपल्या स्वतःच्या मातृभुमीत, आपल्या हक्काच्या जंगलांमध्ये आपल्यालाच जाण्यास मनाई आणि हा निर्बंध लावणारे कोण? तर परकीय इंग्रज! नाग्याच्या राष्ट्रप्रेमी मनाला काही पटत नव्हते म्हणूनच आजच्या सत्याग्रहात आपणही सर्वांबरोबर भाग घ्यायचा हे त्याने निश्चित केले. मनाने तर तो मागील दोन आठवड्यांत दोन्ही सत्याग्रहांमध्ये सहभागी झालेलाच होता पण आज प्रत्यक्ष उपस्थित राहण्याच्या त्याच्या निर्णयावर त्याच्या आईच्या व बहिणीच्या संभाषणाने मोहर लागली.

गेल्या आठवड्याभरात झालेले दोन सत्याग्रहात नाग्याला आपले वडील, महादू दादू कातकरी, यांच्या दबावामुळे भाग घेता आला नाही पण आज मात्र निश्चय पूर्ण झाला होता. कातकरी वाडीतील स्वतंत्र हिंदुस्थानचे स्वप्न बघणाऱ्या मध्ये आज नाग्याचाही समावेश झाला होता.

कातकरी. सह्याद्रीच्या कुशीत राहणारी, खऱ्या अर्थाने गिरिजन असणारी, कातवडी, काथोडी, काठोडी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी ही आदिम जनजाति जितकी मृदुल स्वभावाची तितकाच अंगी कणखरपणा. आणि म्हणूनच शारीरिक कष्ट हे सुरुवातीपासूनच ह्या जनजाति चे वैशिष्ट्य. खैराच्या झाडापासून काथ (कात) तयार करण्याच्या आपल्या मुख्य कामामुळे ह्या जनजाति ला कातकरी म्हणून ओळखले जाते.

नाग्या ने आपल्या मित्रांसोबत व चिरनेर मधील ग्रामस्थांच्या प्रेरणेने ह्या सत्याग्रहात उडी घेतली. मुळातच स्वतःच्या राष्ट्र बद्दल व विशेषतः आपल्या समाजाबद्दल त्याच्या मनात असलेला अभिमान व आपल्यावर होत असलेला अन्याय याच्या विरोधात उचललेले ते पाऊल होते. अक्कादेवीच्या माळराणावर जमा झालेला जनसमुदाय हा केवळ सागाचे लाकूड तोडण्यासाठी आलेला नव्हता तर हे समाजाचे एक प्रतीक होते जे आपल्या राष्ट्राबद्दल, आपल्या अस्मिते बद्दल, आपल्या हक्कांबद्दल आणि आपल्याच मातृभूमीतील संसाधनांबद्दल आपले अधिकार प्रस्थापित करण्याचा एक प्रयत्न होता. संपूर्ण समाजाच्या एकत्रीकरणात आदिम कातकरी जनजाति सुद्धा मागे राहिली नाही. जरी पाचवीला पुजलेले कष्ट व हाल अपेष्टा कायमस्वरूपी होत्या तरीसुद्धा आपला देश हा स्वतंत्र झालाच पाहिजे व परकियांच्या सत्तेतून आपली मुक्तता झाली पाहिजे हा विचार त्यांच्याही मनात तितक्याच उत्कर्षा ने चालू होता.

आजच्याच दिवशी ९१ वर्षांपूर्वी ज्यावेळी मामलेदार यांचा आदेश झुगारून गोळीबार झाला त्यात एक गोळी नाग्याला पण लागली. त्याच्या मांडीला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी होऊन तिथेच पडला. गोळीबारामुळे एकंदरीतच वातावरण सैरभैर झाले होते व या गोंधळात त्याला त्वरित मदत येण्यास उशीर झाला. पण त्याच्या बहिणीने त्याला शोधून, झाडपाला जखमेवर चोळून त्याला आपलं लुगडे फाडून पट्टी केली. वडिलांनी उचलून घरी नेले. परंतु त्यावेळेच्या एकंदरीतच सामाजिक, राजकीय व गावातील हितसंबंध जपण्याच्या नादात नाग्याला औषधोपचार मिळाला नाही. दिवसागणिक तब्येत खालावत गेली व बंदुकीच्या गोळीने झालेल्या जखमेमुळे अंगात पसरलेला रोग ह्या सह्याद्रीच्या सूर्याला निखळून गेला

आपल्या वीस वर्षांच्या आयुष्यात केवळ कातकरी समाजाच्या पुढेच नाही तर संपूर्ण जनजाती व हिंदुस्थानापुढे राष्ट्रप्रेम व जंगलाबद्दल असलेली आपली नैसर्गिक ओढ याचा दाखला आपल्याला हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या जीवनातून मिळतो. त्यांच्या प्रेरणेने पुढे कित्येक तरुण स्वातंत्र्य लढ्यात उतरले व भारत मातेच्या सेवेत आपले आयुष्य सत्कारणी लावले.

याच हुतात्म्याचे स्मरण समाजाला कायम रहावे व त्यांच्या बलिदानाचा आदर्श येणाऱ्या प्रत्येक पिढीला समजावा याकरिता २५ सप्टेंबर २०१९ रोजी चिरनेर येथील सत्याग्रहाच्या जागी वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रयत्नातून हुतात्मा नाग्या कातकरी चे स्मारक उभे राहिले.

९ दशकांपूर्वी झालेल्या ह्या अमानुष गोळीबारात हौतात्म्य पत्करलेल्या नाग्या कातकरी चे हे स्मारक प्रतीक आहे त्याच्या बलिदानाचे, त्याच्या शौर्याचे, त्याच्या राष्ट्रप्रेमाचे व त्याचबरोबर हे प्रतीक आहे प्रत्येक जनजाती योध्याचे ज्याने या देशाकरता आपले सर्वस्व अर्पण केले. हे प्रतिक आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या शौर्याचे, प्रतीक आहे राणी मा गाईदेनल्यूचे ज्यांनी पूर्वांचल मध्ये हुतात्मा जोदांग ह्याने सुरु केलेल्या क्रांतीचा मार्ग अविरत सुरू ठेवला त्याचे आणि त्याच बरोबर हे स्मारक प्रतीक आहे प्रत्येक भारतीयाच्या भावनांचे जो आपल्या मातृभूमी ला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

अशा या प्रेरणादायी, क्रांतिकारी वीर जनजाती योध्यास शतशः नमन

(ऐतिहासिक घटनांचे संदर्भ श्री. वसंत भाऊ पाटील ह्यांच्या चिरनेर जंगल सत्याग्रह १९३० व हुतात्मा नाग्या कातकरी ह्या पुस्तकांमधून आहे)

-गिरीश काळे
वनवासी कल्याण आश्रम
९९८७२५९५८७

Back to top button