News

सेवा सहयोग फाऊंडेशनचे संचालक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय हेगडे यांचे निधन

मुंबई, दि. २५ सप्टेंबर : सेवा सहयोग फाऊंडेशन चे संचालक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय हेगडे यांचे आज सकाळी महालक्ष्मी येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. “सेवा सहयोग फाउंडेशन” सामाजिक संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. २००९ सालापासून ते सेवा सहयोग चे सक्रिय काम पाहत होते. सेवा सहयोग संपूर्ण महाराष्ट्रात ३०० हून अधिक स्वयंसेवी संस्थांसोबत काम करते. फाउंडेशन वंचित मुलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करत आहे.

संजय हेगडे सामाजिक जीवनात सक्रिय होते. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोवेकरांना एकत्र आणून त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देण्यासाठी त्यांनी “आमी गोयंकार” या संस्थेची स्थापना केली. आमी गोयंकार संस्थेने दिवंगत क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या नावाने मरगाव येथे क्रिकेट अकादमी स्थापन करण्यास मदत केली आहे. अकादमीने वर्षभर ४० खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिले आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमी गोयंकार तर्फे मुंबईत दरवर्षी गोवा महोत्सवाचे आयोजन केले जाते.

जुहू परिसरातील १५० गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘गुलमोहर एरिया सोसायटीज वेलफेअर ग्रुप’च्या प्रवर्तकांपैकी ते एक होते. या स्थानिक विकास गटाने आरटीआय कायदा, जनहित याचिका इत्यादींद्वारे तसेच लोक प्रतिनिधी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडे नागरी समस्यांबाबत यशस्वी पाठपुरावा केला होता.

शिक्षण, क्रीडा, संस्कृती इत्यादींना प्रोत्साहन देण्यासाठी संजय हेगडे यांनी त्यांच्या आई व वडिलांच्या नावाने “कृष्णा-सावित्री चॅरिटेबल ट्रस्ट” स्थापन केले होते, या ट्रस्टने अलीकडेच राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी मडगावमध्ये मोफत कोचिंग सुरू केले आहे. या ट्रस्ट मार्फत शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत केली जाते. रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या “समतोल फाउंडेशन” या संस्थेचे ते अध्यक्ष होते. या फाउंडेशनने गेल्या ५ वर्षांमध्ये ४ हजारांहून अधिक मुलांना पुन्हा त्यांच्या कुटुंबांसोबत जोडण्याचे काम केले आहे.

संजय हेगडे चार्टर्ड अकाउंटंट होते , त्यांचा जन्म आणि शिक्षण मडगाव गोवा येथे झाले. त्यांचे शिक्षण गोव्यातील दामोदर विद्यालय आणि मॉडेल इंग्लिश हायस्कूल येथे झाले. सन १९७७ मध्ये त्यांना दामोदर कॉलेजने सर्वोत्कृष्ट अष्टपैलू विद्यार्थ्याचे पारितोषिक देऊन सन्मानित केले होते. त्यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली होती. महाविद्यालयीन जीवनात ते विद्यार्थी मंडळात सक्रिय होते.

संजय हेगडे हे प्राइस वॉटरहाउस कूपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया येथे ग्लोबल कॅपिटल मार्केट्स ग्रुप चे कार्यकारी संचालक होते. २०११ मध्ये त्यांनी पूर्णवेळ सामाजिक कार्य करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. एडीआर/जीडीआर मार्गदर्शक तत्त्वांच्या पुनरावलोकनासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीचे ते सदस्य होते.

गेली ५ वर्षे ते जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते. मानव सेवा साधना या सामाजिक संस्थेचे ते विश्वस्त होते. सेवा इंटरनॅशनल या संस्थेचे ते गेली काही वर्षे खजिनदार म्हणून काम पाहत होते.

त्यांच्या जाण्याने एक धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता आणि अनेक संस्थांचा आधारवड हरपला आहे.

Back to top button