CultureOpinion

‘कन्यादान’ हा कन्या सन्मानच !

चित्रपट, मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्म्स, जाहिराती यामधून कोणाचाही आत्मसन्मान, भावना न दुखावता उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन सादर होणे, हेच समाजास अभिप्रेत असते. मनोरंजन क्षेत्रात कलाकार त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून एक प्रकारे समाजप्रबोधनाचे काम करीत असतात. करमणुकीसोबतच समाजाला विविध गोष्टींमध्ये जागृत केले जाते. मात्र कधी कधी हे समाजप्रबोधन करताना आधुनिकतेच्या नावाखाली हिंदू रूढी, परंपरा, सणवार, चालीरीती यांवरच घाला घातला जातो. यामध्ये बाॅलीवूडकर आणि प्रतिष्ठित कंपन्यांचे ब्रँडस अग्रेसर आहेत. हिंदू धर्माइतकी सहिष्णूता जगातल्या कोणत्याच धर्मात नाही. हिंदू धर्मात महिलांना देवीस्वरूप मानले जाते. सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहून संपूर्ण समाजासोबतच देशासाठीही अभिमान आणि कौतुकास्पद ठरणाऱ्या महिलांच्या यशाचा नेहमीच गुणगौरव केला जातो. असे असतानाही फक्त हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपरांवर होत असलेले आघात आपल्याला वेळोवेळी दिसून आले आहेत.

असेच काहीसे घडले आहे एका कपड्यांच्या ब्रँडच्या जाहिरातीबाबतीत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने या जाहिरातीमधून ‘कन्यादान’ या सर्वात मोठ्या हिंदू विवाह संस्कारातील विधीवर भाष्य केले आहे. या जाहिरातीमध्ये आलिया नववधूच्या पेहरावात लग्न मंडपात दिसत आहे. यावेळी संभाषणा दरम्यान आलिया बोलते की, तिच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तिच्यावर खूप प्रेम करतात. मात्र मुलीला परक्या घराचे धन का मानले जाते?, मुलगी ही दान करण्याची गोष्ट नाही. यामुळे मला हे कन्यादान अमान्य आहे. कन्यादान नाही कन्यामान करा असा संदेश आलिया व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करत आहे. या ब्रँडच्या अधीकृत सोशल मीडिया अकांऊटवरुन हा व्हिडिओ शेअर केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, कन्यामान, नवे विचार, नवी कल्पना. आधुनिक वळणासह आजच्या नववधूंचा उत्सव साजरा करुया. अशा आशयाचा चुकीचा पायंडा या जाहिरातीतून घालण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

हिंदू धर्मातील ‘विवाह संस्कार’ हा एक महत्त्वाचा संस्कार मानला गेला आहे. विवाह विधींतील ‘कन्यादान’ हा एक महत्त्वाचा धार्मिक विधी असून कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. हिंदू धर्मातील ‘कन्यादान’ हा विधी मुळातच कन्येचा सन्मान करणारा अर्थात्च ‘कन्यामान’ च आहे. कारण या विधीद्वारे कन्यादान करताना वराकडून वचन घेतले जाते. कन्येला वस्तू म्हणून दिले जात नाही, तर वधूपिता वधूचा हात वराच्या हाती सोपवताना सांगतात, ‘विधात्याने मला दिलेले वरदान, जिच्यामुळे माझ्या कुळाची भरभराट झाली, ती तुझ्या हाती सोपवत आहे. ती तुझ्या वंशाची वृद्धी करणार आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चारही गोष्टींत तिची प्रतारणा करू नकोस, तिच्याशी एकनिष्ठ रहा आणि दोघांनी सुखाचा संसार करा.’ त्यावर वर म्हणतो, ‘तुम्हाला दिलेल्या वचनाचे मी उल्लंघन करणार नाही.’ इतका श्रेष्ठ असा हा विधी असतांना या जाहिरातीमधून ‘कन्यादान’ विधी हा एकप्रकारे महिलांचा अपमान असल्याचे दर्शवले असून हेतूतः बुद्धीभेद करून हिंदु धर्माची प्रतारणा करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे.

हिंदु धर्मात स्त्रियांना जेवढा सन्मान दिला जातो, तसा सन्मान जगभरातील कोणत्याही धर्मात दिला गेलेला नाही. हिंदू धर्मात स्त्रीला देवीचे स्थान दिले आहे. तिचे पूजन केले जाते. पत्नीखेरीज धार्मिक विधींना आरंभच होऊ शकत नाही. असे असतानाही या तथाकथित लोकांकडून हिंदूंनाच वारंवार लक्ष्य केले जात आहे. हिंदूंच्या धार्मिक पद्धती माहिती नसतील, तर त्याविषयी आधी अभ्यास करणे, तज्ज्ञांकडून त्याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. ही जाहिरात हिंदू धर्मातील धार्मिक कृतींचा चुकीचा अर्थ काढून अपप्रचार करणारी, धार्मिक कृतींचा अपमान करणारी आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. याबाबत संवेदनशील समाजात कोणतीही तडजोड खपवून घेतली जात नाही. त्यामुळे असे दाखवणाऱ्या कलाकृती समोर येतात तेव्हा वादाला सुरुवात होते. हे वाद टाळण्यासाठी मनोरंजन सादर करताना समाज भावनांचा आदर करण्यासोबतच चुकीचा पायंडा समाजात पडू नये, यावर विवेकबुद्धीने विचार व्हावा व त्याचपद्धतीने त्याचे अनुकरण होणे आवश्यक आहे .

Back to top button