News

जगाला सुख देणारा धर्म आमच्याकडे, देशापेक्षा श्रेष्ठ अन्य काही नाही – डॉ. मोहन भागवत

जम्मू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शनिवारी संध्याकाळी जम्मू विद्यापीठाच्या जनरल जोरावर सिंह सभागृहात प्रबुद्ध लोकांच्या चर्चासत्राला संबोधित केले. ते म्हणाले की जीवनात आनंद निर्माण करणारा धर्म आमच्याकडे आहे. आमचा धर्म संपूर्ण जगासाठी आहे, आत्मीयता निर्माण करणारा तसेच सुख देणारा आहे. समाज म्हणजे केवळ गर्दी किंवा समूह नाही. तर ज्यांच्यापुढे एक उद्देश असतो, जे एक उद्देश समोर ठेवून स्वतःचे जीवन व्यतीत करतात, अशा सर्व मनुष्यांचा मिळून समाज बनतो.

सरसंघचालक म्हणाले की, संपूर्ण जगाची दृष्टी भारतावर आहे. त्याचे कारण म्हणजे भारतात विविधतेमध्ये एकता आहे. समाजवाद आणि डाव्यांनंतर अजून तिसरा मार्ग असावा, असा विचार आज चालू आहे. इंग्लंडचा आधार भाषा आहे, त्यामुळे जोपर्यंत इंग्रजी आहे तोपर्यंत यूके आहे. आर्थिक विषय हा यूएसएचा आधार आहे. अरब सारख्या देशांचा आधार इस्लाम आहे. या संदर्भात भारताचा उल्लेख करताना ते म्हणाले की, देशात पूर्वीपासूनच विविधता आहे, पण या सगळ्यांना जोडणारे तत्व आमच्याकडे असल्याने आम्ही एक आहोत.

भारतात, समाजाच्या विकासात व्यक्ती अडथळा बनत नाहीत, किंवा व्यक्तीच्या विकासात समाज अडथळा बनत नाही. आमच्या पूर्वजांनी आपल्याला हे शिकवले आहे. हीच आपली संस्कृती आहे जी प्राचीन काळापासून निरंतन सुरु आहे.

सरसंघचालक पुढे म्हणाले की, भारतात अनेक राज्ये, व्यवस्था आणि विविधता आहे. पण, यामुळे आपली एकता बदलत नाही. म्हणूनच प्रत्येकाने निस्वार्थ भावनेने हे समजून घेणे आवश्यक आहे की देशापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही. जेव्हा आपला देश सुरक्षित, प्रतिष्ठित आणि सक्षम होईल, तेव्हा आपण सुरक्षित, प्रतिष्ठित आणि सक्षम होऊ.

सरसंघचालक म्हणाले की, आमचे लहान-लहान हित देखील आहेत, परंतु या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपले राष्ट्र. आपली संस्कृती, आपले पूर्वज आणि आपला देश. या भावनेने आपल्याला आपले जीवन व्यतीत करावे लागेल. आपण मिळून आपल्या देशाची स्थापना अशा प्रकारे करू की त्याचे जीवन आणि विचार पाहून संपूर्ण जगातील देश स्वतःला सुंदर आणि आनंदी देश बनवतील. या सर्वांसाठी भारत आहे, आम्ही भारतीय आहोत.

ते म्हणाले की, व्यवस्था बदलते आणि या अंतर्गतच कलम 370 काढून टाकण्यात आले, म्हणजे व्यवस्थेत बदल झाला. मनातील इच्छा पूर्ण झाली. यासाठी डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी आणि प्रजा परिषदेने आंदोलन केले होते.

यावेळी अखिल भारतीय सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल जी, उत्तर क्षेत्र के संघचालक प्रा. सीता राम व्यास जी आणि जम्मू कश्मीर प्रांताचे सह संघचालक डॉ. गौतम मैंगी जी आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button