Opinion

‘सेव’ तर्फे प्राणी बचाव अँपचे अनावरण

घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर ‘सेव’ संस्थेने वन्य तसेच पाळीव प्राणी बचावासाठी मोबाईल अँप चे अनावरण केले. फोंडा तालुक्यातील मार्शेल येथे श्री. विराज बाकरे यांच्या घरच्या आवारात एका छोट्या घरगुती समारंभात या अँप चे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात गोव्यातील जेष्ठ पर्यावरण प्रेमी आणि अभ्यासक श्री राजेंद्र केरकर, ऍनिमल रेसक्यू स्कोड चे अध्यक्ष आणि प्राणीमित्र अमृत सिंह आणि सेव संस्थेचे श्रीचरण देसाई व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

मानवीय हस्तक्षेप आणि अतिक्रमणामुळे वन्य प्राण्यांचा मानव वस्तीत शिरकाव वाढल्याने अनेक पर्यावरण आणि प्राणी प्रेमी, प्राणी बचाव (Animal Resque) कार्यासाठी पुढे येऊ लागले. मुळात तश्या प्रकारचे प्रशिक्षण देणारी संस्था किव्वा व्यक्ती गोव्यात उपलब्ध नव्हत्या तेव्हा अमृत सिंह यांनी प्राणी बचावाच्या कार्यास सुरुवात केली. श्रीचरण देसाई यांनी २००७ पासून अमृत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि अनेक वर्षे या विषयात अभ्यास आणि काम केले. पण फक्त, मानव वस्तीत शिरलेल्या प्राण्यांना वाचवून हा प्रश्न सुटणार नाही व या संबंधात अभ्यास आणि जागृती करणे आवश्यक आहे असे समोर आले. याच अनुषंगाने श्रीचरण देसाई यांनी इतर समविचारी युवकांना घेऊन स्टडी अँड अवेअरनेस ऑफ वाइल्ड लाईफ अँड एन्व्हायर्मेंट म्हणजेच ‘सेव’ (SAWE) ह्या संस्थेची सुरुवात २०१३ साली केली.

सुरुवातीला फोंडा तालुका केंद्र असे मानून संस्थेने कामाला सुरुवात केली. वस्तीत, घरात, ऑफिस, फॅक्टरी, बागेत, कुळागारात आलेले वन्य प्राणी जसे साप, मगर, पक्षी यांना मानव वस्तीतून सुखरूप पणे बाहेर काढून वन्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली, त्यांना पूरक असलेल्या त्यांच्या निवासस्थानी सोडणे जेणेकरून ते माणसांना व माणूस त्यांना इजा करू शकणार नाही असे काम त्यांनी सुरु केले. याच बरोबर हे असे का होते? वन्यप्राणी मनुष्य वस्तीत का येतात? याला जबाबदार घटक कोण? अश्या अनेक विषयांवर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी समांतर पणे माहिती गोळा करून अभ्यास करायला सुरुवात केली.

पुढच्या टप्प्यात त्यांनी विविध शाळा, महाविद्यालये, कार्यालये, व इतर ठिकाणी जाऊन जागरूकता अभियान म्हणून हि माहिती देण्यास सुरुवात केली. गोव्यातील साप, पक्षी, वन्य प्राणी, त्यांचे चालचलन , सापडण्याची ठिकाणे, त्यांना ओळखायचे कसे, सर्पदंश झाला कि प्राथमिक उपचार पद्धती या सारख्या समाज प्रबोधन कार्यक्रमातून त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला. पूर्वी जेव्हा कुणी साप बघितला तर लोकं त्याची ओळख नसताना त्याला घाबरायची, मारायची किव्वा मारणाऱ्याला बोलवायची, पण जनजागृती कार्यक्रमांचा प्रभाव म्हणून साप आल्यावर लोकं ‘सेव’ संस्थेच्या कार्यकर्त्यांना फोन करू लागली आणि अश्या पद्धतीने आजपर्यंत हजारों प्राण्यांना जीवदान मिळाले आहे.

ह्या संबंधित अभ्यास करताना रस्त्यावर गाड्यांना आपटून अपघातांमुळे साप, बेडूक, विविध पक्षी, गाई असे अनेक प्राणी दगावले जातात आणि यात रानटी तसेच पाळीव प्राण्यांचा सुद्धा समावेश असतो. अश्या प्रकारचे किती प्राणी दगावतात याची अधिकृत किव्वा अनधिकृत माहीत वन्य विभागाकडे सुद्धा उपलब्ध नसते आणि अश्या मृत्यूंचा आकड्याचा अंदाज लावणे सुद्धा खूपच कठीण असते. तेव्हा संस्थेने स्वतः जाऊन २०१९ साली रस्त्यावर अपघातामुळे दगावलेल्या प्राण्यांची माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक आकडे जे याच्या पूर्वी कधीच उपलब्ध नव्हते ते सर्वांसमोर आले.

जवळपास ४२ हजार प्राणी दरवर्षी रस्ता अपघातात दगावतात असे त्यांच्या सर्वेक्षणातून निष्पन्न समोर आले. यात पाळीव प्राणी जसे गाई, कुत्रे, उभयचर प्राणी जसे कासव, मगर, सरपटणारे प्राणी जसे साप, आणि इतर प्राणी बिबटा वाघ, कोल्हा, मुंगूस यांचा सामावेश होता.

या सर्वेक्षणाची माहिती संस्थेने वन्य विभागाला दिली पण अपेक्षित प्रतिक्रिया त्यांना मिळाली नाही. पण जर्नल ऑफ थ्रेटनड टेक्सा (JoTT) नावाच्या एक आंतरराष्ट्रीय नियतकालिकेने याची दखल घेतली आणि या संदर्भात तपशीलवार अभ्यास करायची सुचवणी दिली. पण संस्थेच्या कार्यकर्त्यांना सगळीकडे जाणे, माहिती गोळा करणे शक्य नव्हते. शिवाय हि प्रक्रिया सोपी होईल अश्या पद्धतीचे तंत्रज्ञान सुद्धा उपलब्ध नव्हते. तेव्हा मोबाईल अँप च्या माध्यमातून हि प्रक्रिया सहज सुलभ करणे सोयीस्कर वाटले आणि याच उद्देशाने संस्थेने नवीन मोबाईल अँप ची निर्मिती केली.

या अँप वर आवश्यक असलेली अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहे. “रिपोर्ट रोडकील” निवडून जर रस्त्यावर अपघात झालेल्या प्राण्याचा अँप च्या माध्यमातून फोटो काढला कि त्या फोटो सहित वेळ, तारीख, आणि त्या जागेचे जिपीएस लोकेशन ची माहिती डेटाबेस मध्ये संकलित होते. एखाद्या जागी साप किव्वा इतर प्राणी आला, किव्वा दृष्टीस पडला तर “रिपोर्ट इव्हेंट” पर्याय वापरून फोटो काढला कि वरील प्रमाणे हुबेहूब माहितीचे संकलन होते. वन्य प्राण्यांनी शेती बागायती चे नुकसान केले असल्यास या फोटोंचा आणि माहितीचा वापर सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई किव्वा विम्याचा दाव्यासाठी होऊ शकतो. इतर पर्याय म्हणून अँप मध्ये संस्थेची अधिक माहिती, बचाव पथकातील सदस्यांचे संपर्कासाठी तपशील, संस्थेचे इतर चालणारे उपक्रम, गोव्यातील सापांसंबंधित माहिती, प्रथमोपचारा सोबत काही इतर आवश्यक माहिती आणि गौ-बचाव पथक, श्वान पथक, आणि वन्य विभाग यांना संपर्कासाठी तपशील ह्या अँप च्या माध्यमातून मिळतो.

या माहितीच्या संकलनाद्वारे एक तपशीलवार अहवाल तयार झाला तर वन्य विभाग, पर्यावरण व प्राणी संवर्धन विषयात काम करणाऱ्या इतर संघटना व व्यक्ती, नियतकालिके, संशोधक तसेच संस्थेच्याच इतर उपक्रमांना मोठा फायदा होणार. सध्या काही आठवडे हे अँप फक्त संस्थेचे कार्यकर्ते व काही निवडक व्यक्तींनाच उपलब्ध असणार आहे. नंतर काही प्रमाणात ठोस माहिती गोळा झाल्यावर, व अँप मध्ये अपेक्षित बदल व त्रुटी दूर करून हे अँप लवकरच सर्वांना वापरासाठी उपलब्ध असणार आहे. वेळेनुसार व सूचना, तसेच मिळालेल्या अभिप्रायानुसार यात आवश्यक बदल व नवीन वैशिष्ट्यांची जोडणी होत राहील.

संस्थेमार्फत अजून काही उपक्रम केले जातात. ज्यात गोड्या पाण्यातील कासव, त्यांच्या विविध प्रजातींचे माहिती संकलन आणि संशोधन व त्यांचे संवर्धन आणि पुनर्वसन यावर एक गट काम करतो. गोव्यातील मगर, त्यांचे जीवन चक्र, मानव अतिक्रमणामुळे त्यातून होणारे घर्षण, यावर गोव्यातील २५ विविध स्थानी माहिती संकलन आणि अभ्यास संस्थेमार्फत केला जातो. गोव्यातील खारफुटीचे जंगले, त्यांचे महत्व, त्यावर प्रदूषणाचे दुष्परिणाम, त्यात असलेली जीवसंपदा उदा. पाणमांजर यावर सुद्धा काम चालू आहे. संस्थेने स्वतः विविध भागात जाऊन खारफुटीच्या जंगलातुन १.२ टन प्लास्टिक कचरा काढला आहे. स्थलांतरित जीवसंपदा जसे पक्षी, प्राणी आणि जलजीव, त्यांच्या स्थलांतराचे कारण, पॅटर्न, व त्याचा त्या प्राण्यावर व स्थानिक जैवसंपदेवर परिणाम, त्याचबरोबर स्थानिक झाडे, त्यांची माहिती व त्याचे संकलन यांच्यावर सुद्धा सेव संस्था व त्यातील कार्यकर्ते काम करत आहे. समाजातील विविध घटकांमध्ये जाऊन या संबंधित जनजागृती करायचे काम संस्थेद्वारे नियमित पणे चालू असते.

पण संस्था व तिच्या नियमित कार्यकर्त्यांना हे एवढेच करून, समाधान मानून थांबायचे नाही आहे, तर भविष्यासाठी त्यांनी काही अजून प्रभावी अभ्यास, माहिती संकलन, संशोधन व उपक्रम करण्याचे उद्दिष्ट्य उराशी बाळगलेले आहे. त्यात प्रामुख्याने शहरी वन्य प्राण्यांवर अभ्यास उदा. भुबड, घार, घोरपड, काटांदार सारखे अनेक प्राणी जे वन्य प्राणी आहेत पण ते शहरी भागात वास्तव्य करून जगतात, व तेच आता त्यांचे निवासस्थान झाले आहे यांचा समावेश असणार. अश्या या बदलाचा त्या प्राण्यांवर झालेला व होत असलेला परिणाम, त्यामुळे पर्यावरणातील होणारे व होत असलेले बदल, पर्यावरणात त्यांची असलेली भूमिका या सारखे अनेक बिंदू या अभ्यासात व संशोधनात समाविष्ट असणार आहे. त्याच बरोबर सर्व दृष्टींनी युक्त असलेले प्राणी बचाव केंद्र (Animal Resque Center) सुरु करण्याची योजना कार्यकर्त्यांच्या मनात आहे. यात प्राण्यासाठी २४/७ रुग्णालय आणि आपत्कालीन सेवा केंद्र, त्यांच्यासाठी विशेष रुग्णवाहिका, त्यांच्या उपचारासाठी लागणारी संपूर्ण व्यवस्था व पुनर्वसन केंद्र असा सुसज्ज प्रकल्प उभारण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. पण एवढा मोठं प्रकल्प हाती घेण्यासाठी गरज असलेली स्वयंसेवकांची कमी त्यांना सतावत आहे. भविष्यात संस्थेसाठी किव्वा संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या स्वयंसेवकांची व कार्यकर्त्यांची संख्या वाढली तर ह्या मोठ्या प्रकल्पाच्या रूपाने शिवधनुष्य पेलण्याचे काम संस्था करू इच्छिते.

सेव संस्था व त्याचे कार्यकर्ते आजही फोन आला कि दिवस-रात्र, ऊन-पाऊस याची तमा न बाळगता प्राण्याच्या मदतीला धावतात. सगळे कार्यकर्ते स्वतःचा नोकरी-व्यवसाय, घरदार सांभाळून, वेळ देऊन काहीही आर्थिक लाभ नसताना व आर्थिक लाभ अथवा मदतीची अपेक्षा न करता हे काम करतात. पर्यावरण संरक्षण हि आंदोलनात्मक प्रक्रिया नसून सखोल अभ्यास करून, वैयक्तिक जीवनात बदल घडवून, जनमानसात जागृती पसरविणे हे आहे ह्याचे उदाहरण सेव संस्था आणि त्याचे कार्यकर्ते दैनंदिन समाजासमोर ठेवत आहे.

सौजन्य : वि.सं. केंद्र, गोवा

Back to top button