Opinion

साडी – भारतीय स्त्रीचा अभिमान

तमाम स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साडी. लग्न-मुंजीचा सोहळा, घरगुती सणसमारंभ असो किंवा कॉर्पोरेट मीटिंग असो. साडी हा असा पोशाख आहे. जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच पाश्चिमात्य संस्कृतीचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. काळ कितीही बदलला, कितीही नवे वस्त्रप्रकार आले, तरीही भारतीय संस्कृतीत साडीचे महत्त्व आजही अबाधित आहे. परंपरेशी नाळ जोडून असणाऱ्या आणि भारतात हजारो वर्षे सातत्याने वापरात राहिलेली, चिरतरुण असलेली साडी म्हणजे भारतीय स्त्रीचा अभिमान आहे.

भारतीय संस्कृती आणि साडीचे नेहमीच पाश्चात्यांच्या आकर्षणाचा आणि जिज्ञासेचा विषय ठरली आहे. येथील प्रत्येक राज्याची स्वतःची अशी जीवनशैली आणि यातील विविधता ही निव्वळ जिज्ञासा न राहता विदेशी पर्यटकांसाठी अभ्यासाचा विषयही ठरली आहे. ते त्याचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण करताना पाहायला मिळते. पण भारतीय संस्कृतीची ओळख असणाऱ्या या साडीला भारतातच कोणी आक्षेप घेत असेल. तर मात्र यासारखी दुर्देवी आणि संतापजनक बाब दुसरी कुठली नाही. अशीच संतापजनक घटना काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये घडली आहे. रेस्टॉरंट मध्ये साडी नेसून गेलेल्या महिलेला साडी नेसून रेस्टॉरंट मध्ये प्रवेश करू शकत नाही, असे सांगितले जाते. रेस्टॉरंट मध्ये येण्यास केवळ स्मार्ट कॅज्युअल्सची परवानगी मिळते आणि साडी हा स्मार्ट कॅज्युअलचा प्रकार नाही, असे तिला सांगितले जाते. अर्थात साडी स्मार्ट वेअर आहे की नाही हे कोण ठरवणार? हा प्रश्न इथे उपस्थित राहतो. मागच्या वर्षी अर्थात मार्च २०२० मध्येही दिल्लीतील एका रेस्टॉरंट मध्ये असा प्रकार घडला होता. साडी नेसल्यामुळे वसंत कुंजच्या ‘Kylin and Ivy’ रेस्टॉरंट मध्ये एका महिलेला प्रवेश देण्यात आला नव्हता.. गुरुग्राममधील एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता नाग आपल्या पतीसोबत रेस्टॉरंटमध्ये गेल्या होत्या. तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी येथे पारंपरिक कपड्यांमध्ये येणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही, हे आमच्या पॉलिसिमध्ये बसत नाही, असे सांगून त्यांना रेस्टॉरंट मध्ये येण्याची परवानगी नाकारली होती.

साडी नेसलेल्या महिलांना कमी लेखले जाते, त्या अकार्यक्षम असतात आणि फॉर्मल घालणाऱ्या महिलांना अधिक स्मार्ट, हुशार, मॉडर्न समजले जाते. असाच काहीसा अनुभव पेप्सिको कंपनीच्या निवृत्त सीईओ इंद्रा नुयी यांनाही आला होता. महिलांनी आयुष्यात कशी प्रगती करावी आणि त्यांच्या करियर लाईनचा ग्राफ दरदिवशी कसा चढता असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इंद्रा नुयी. आज बिझनेस जगतातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. या संघर्षाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा साडी नेसण्यावरून त्यांना देखील कमी लेखले गेले होते.

मद्रास येथील सामान्य मध्यमवर्गीय घरातील ही मुलगी जेव्हा १९७८ साली येल स्कूल ऑफ मॅनेजमेण्टमध्ये गेली, तेव्हा एका इंटरव्यूसाठी जात असताना त्यांच्याकडे फॉर्मल कपडे नव्हते. त्यांनी कशीबशी पैशाची जुळवाजुळव केली आणि ५० डॉलर्सचे कपडे घेतले. हे कपडे काही मापाचे नव्हते त्यामुळे लोक विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहत होते. त्यांनी कुणाचीही पर्वा न करता इंटरव्यू दिला. त्यांच्या करिअर डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक जेन मॉरिसन यांना त्यांनी हा सगळा प्रसंग सांगितलं. त्यांनी सगळं ऐकून घेतले आणि हळुवार आवाजात प्रश्न विचारला की हा इंटरव्यू जर भारतात असला असता तर त्यांनी कोणते कपडे घातले असते? यावर इंद्र यांनी साहजिकच साडी असे उत्तर दिले. जेन यांनी त्यांना पुढच्या इंटरव्यूला जाताना साडी नेस असे सुचविले. इंद्रा यांनी तसेच केले आणि त्यांना ती नोकरी मिळाली देखील.

नोकरी मिळाल्यानंतर इंद्रा यांनी शिकागो येथील एका फार्ममध्ये इंटर्न म्हणून काम करायला सुरुवात केली. फॉर्मलपेक्षा साडीतच अधिक आत्मविश्वास वाटत असल्यामुळे ऑफिसला जाताना त्या दररोज साडी नेसायच्या. पण त्यांचे असे साडी नेसणे त्यांच्या सहकाऱ्यांना रुचायचे नाही. त्यांनी इंद्रा यांना मग क्लायंट मीटिंगला नेणेच बंद केले. साडी म्हणजे त्यांना जरा कमी दर्जाचे वाटायचे.

आज या घटनेला एवढी वर्ष उलटून गेली. काळ खूप पुढे सरकला. महिला खूप आधुनिक झाल्या तरीही बहुतांश लोकांचा साडी नेसणाऱ्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला नाही. आज असेही अनेक लोक आहेत, ज्यांना ज्या महिला साड्या नेसतात, त्या मॉडर्न किंवा सक्षम नसतात, असे वाटते. अशावेळी बुद्दीमत्ता न पाहताही तुम्ही काय आणि कोणते कपडे घालता यावरून हुशारीचा दर्जा ठरवला जातो. अशा जुनाट, बुरसटलेल्या विचारांतून पुढे जाण्याची वेळ आली आहे.

आज आपण पुजत असलेल्या देवी प्रतीमा या मुळच्या राजा रविवर्माच्या कुंचल्याने जन्म दिलेल्या आहेत. सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या साडीच्या पेहरावातील या प्रतिमांना आपण भक्तिभावाने पूजतोच ना? स्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतिकारी महिला या साड्यांच्या पेहरावातच शत्रूशी लढत होत्या ना? आपली संस्कृती, आपला इतिहास इतका पूजनीय, सक्षम आणि बळकट असतानाही आजच्या पुढारलेल्या काळात अजूनही साडीवरून होत असलेले अपमान हे नक्कीच लाजिरवाणे आहेत. बुरसटलेल्या विचारांचे ते द्योतक आहेत.

भारत हा विकासाकडे वेगाने वाटचाल करत आहे. भारताची सभ्यता आणि संस्कृती खूप जुनी आहे. पोशाख, खानपान, राहणीमान प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा आहे. भारतीय पुरुष असो व महिला प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार स्वतःमध्ये वेगवेगळे बदल होत गेले. मात्र अद्यापही भारतीय महिला त्यांच्या पारंपारिक पोशाखाला प्राधान्य देतात म्हणून त्यांच्या संस्कृतीवर, त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणे हे अयोग्यच.

Back to top button