News

रामायण सर्किट रेल्वेच्या ‘रामायण’ सफरीचा श्रीगणेशा

नवी दिल्ली : प्रभू श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित प्रमुख स्थानाची सफर घडवून आणणाऱ्या रामायण सर्किट रेल्वेचा पहिला प्रवास ७ नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे. या रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या १७ दिवसांच्या प्रवासात श्रीरामाशी संबंधित वेगवेगळ्या धार्मिक स्थळांचे दर्शन भाविकांना एकाच फेरीत घेता येणार आहे. सफदरजंग रेल्वे स्थानकावरून रामायण सर्किट रेल्वेच्या प्रवासास प्रारंभ झाला.    त्यानंतर अयोध्या ते रामेश्वरम असा प्रवास ही रेल्वे करणार आहे.  १७ दिवसांच्या प्रवासात रेल्वे जवळपास ७५०० किमीचे अंतर कापणार आहे. भारतीय रेल्वेने धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी या विशेष रेल्वेची घोषणा केली होती.

पहिल्या टप्प्यात रेल्वे अयोध्येत दाखल झाल्यानंतर भाविकांना रामजन्मभूमी मंदिर, हनुमान मंदिर व नंदीग्राममध्ये भरत मंदिराचे दर्शन घडविले जाईल. अयोध्येहून ही रेल्वे सीतामढीकडे कूच करेल. याठिकाणी जानकी जन्मस्थान व नेपाळच्या जनकपूरस्थित राम जानकी मंदिराचे दर्शन भाविकांना घेता येईल. रेल्वे पुढे काशीतून विविध मंदिरांचे दर्शन घडवत अखेरच्या दिवशी दिल्लीत दाखल होईल.

रेल्वेतील प्रथम श्रेणीसाठी प्रतिव्यक्ती १०२०९५ रूपये, तर द्वितीय श्रेणीसाठी ८२९५० रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. या किंमतीत प्रवाशांचे भोजन, वातानुकूलित बसद्वारे पर्यटनस्थळांची भ्रमंती, हॉटेलमधील राहणे, गाईड आदी गोष्टींचा समावेश आहे. रेल्वेतही सर्वसुविधा उपलब्ध करण्यात आल्याने भाविकांना पंचतारांकित हॉटेलप्रमाणे प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.     

Back to top button