Opinion

राष्ट्रीय जनजाती गौरव दिन

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जनजातीय योद्ध्यांचे योगदान हे महत्त्वपूर्ण राहिले आहे. परंतु हा इतिहास आजही दुर्लक्षित, वंचित व अभ्यासापासून दूर आहे. इंग्रजांनी मांडणी केलेल्या इतिहासात विघटन वाद, अलगवाद, जातीयता, विभाजन, वर्गवारी, वर्णभेद करणारा असल्याने व त्यांचा पगडा आणि प्रभाव समाजव्यवस्थेवर वर्षानुवर्षे पडल्यामुळे, जनजाती समाजाचा प्राचीन काळापासूनचा गौरवशाली इतिहास हा आजही प्रतीक्षा करतो आहे. केंद्र शासनाने भगवान बिरसा मुंडा यांचा 15 नोव्हेंबर हा जन्मदिवस ‘जनजाती गौरव दिवस’ म्हणून साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या शासन निर्णयाचे जनजाती कल्याण आश्रम हार्दिक स्वागत करीत आहे.

भगवान बिरसा मुंडा हे समस्त जनजाती समाज तसेच संपूर्ण देशवासीयांचे श्रद्धास्थान आहे. ते इंग्रजांविरुद्ध आजीवन लढा दिलेले ते महान क्रांतिकारक होते. सत्तेविरूद्ध संघर्ष करीत असतानाच त्यांनी धर्मांतर तसेच जनजाती समाजातील कुप्रथांविरुद्ध आवाज उठवला. भारतीय संस्कृतीच्या रक्षण व संवर्धनाकरिता यांनी आजन्म प्रयत्न केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात दिनांक 15 ते 22 नोव्हेंबर 2021 हा आठवडा जनजातीय स्वातंत्र्यवीरांच्या व जननायकांच्या स्मरणाचा प्रेरक आठवडा (आयकॉनीक वीक) असेल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री मा.श्री. अनुरागजी ठाकूर यांनी केली. देशातील तरुण पिढीला स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्या, तसेच हौतात्म्य पत्करलेल्या जनजाती क्रांतीकारकांची ओळख होईल. त्यांचे कार्य व बलिदान समाजाला प्रेरणादायी ठरेल. जनजाती समाजाने देशाला अनेक नरवीर दिले आहेत.

मणिपूरचे जादोनांग, नागाराणी राणी गाईदिन्ल्यू, राजस्थानचे पुंजा भिल्ल, आंध्रप्रदेशचे अल्लुरी सीताराम राजू,  केरळचे पळसी राजा तलक्कल चंदू,  झारखंडचे तिलका मांझी, बुधु भगत, गोंड राजे शंकर शहा, रघुनाथ शहा, महाराष्ट्रातील राघोजी भांगरे, भागोजी नाईक, नाग्या कातकरी, बाबुराव शेडमाके या आणि अशा अनेक अनाम वीरांची माहिती “जनजाती गौरव दिनाच्या” निमित्ताने समाजासमोर येईल. म्हणून भारत सरकार विशेषतः माननीय पंतप्रधान व मंत्रीमंडळाचे हार्दिक अभिनंदन. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण आश्रम 15 नोव्हेंबर हा जनजाति गौरव दिवस उत्साहात साजरा करेल. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती भारताचे अगणित देशभक्त विशेषतः जनजाती बंधूंच्या माध्यमातून गौरवाने साजरी करून त्यांचे विशेष महत्वपूर्ण जीवन जनजाती समाजावर दूरगामी परिणाम करण्यास सहाय्यक ठरेल. भगवान बिरसा मुंडा यांनी सर्वसाधारण आणि सत्यनिष्ठ जनजाती बंधूंत देशप्रेमाचे भाव जागरण केले. त्यांनी केलेल्या ‘उलगुलान’ म्हणजे क्रांतीत हजारो सामान्य माणसे आपले जीवन भारत मातेच्या चरणकमलावर समर्पित करते झाले. ही उलगुलान हाक देऊन जनजाती समाज संघटित होण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण असणार आहे.

बिरसा मुंडा यांनी साध्या, सोप्या शब्दात आपल्या लोकांना सांगितले की, ‘साहेब साहेब एक टोपी’, म्हणजेच इंग्रजी राज्यकर्ते यांची टोपी आणि धर्मांतरण करणारे मिशनरी यांची टोपी एकच आहे, अर्थात त्यांचे उद्दिष्ट एकच आहे. आज इंग्रजी राजवट संपुष्टात जरी आली असली तरी इंग्रजी विचारांच्या विषवल्लीचे पतन करण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे मिशनरींच्या अराष्ट्रीय कारवायांसाठी हा दिवस अनेक दृष्टीने महत्वाचा असणार आहे. भगवान बिरसा  मुंडा यांनी सांगितलेल्या तीन शत्रूंत, विदेशी शासन, विदेशी पाद्री, आमचे शोषण करणारे आमचे लोक, यातले आमचे लोक कोण याचा नीरक्षीरविवेक समाजात येणेकामीही उपयोगीत नाकारता येणार नाही. यानिमित्ताने डोमबारीचा नरसंहार समाजाच्या समोर येईल. चार हजार मुंडा एकत्र आले होते. त्यांच्याकडे एकही बंदुक नव्हती. या चार हजार लोकांवर तीन तास झालेला गोळीबार, ज्या गोळीबारात सगळा डोंगर रक्ताने न्हाऊन निघाला होता. प्रचंड नरसंहार, जालियनवाला बागेपेक्षा कितीतरी भयावह होता. इंग्रजांनी हा डोमबारीचा डोंगर काबीज करूनही जननायक बिरसा त्यांच्या हाती लागले नाहीत.

परंतु इतिहासात याची फार नोंद घेतली गेली नाही. या निमित्ताने इतिहास लेखनाला नवी पाने मिळतील. पंचवीस वर्षाची छोटी जीवनी सामाजिक, सांस्कृतिक क्रांतीची ज्योत भारतीय जनजाती समाज जीवनात रचनात्मक कार्य करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

विकसनशील प्रक्रियेत जनजाती जीवनाच्या विभिन्न पैलूंचा विचार करता भगवान बिरसा मुंडा यांच्या बिरसाइयतची सूत्रे आपण कायम स्मरणात ठेवली पाहिजेत. समाज बांधणीसाठीही ती उपयुक्त आहेत. त्यांनी ‘व्यसन करू नका असे सांगितले. देव, देश आणि धर्मासाठी समर्पित आपले शरीर आणि मन शुद्ध ठेवण्याची आवश्यकता आहे. आपले घर नेहमी स्वच्छ ठेवा व आपल्या अंगणात तुळशीचे रोप लावा. गोमातेची सेवा करा व सर्व प्राणिमात्राप्रति दयाभाव ठेवा. आपली संस्कृती, आपला धर्म आणि आपल्या पूर्वजांच्या प्रती श्रद्धा ठेवा. धर्म, संस्कृति व परंपरा यांना विसरू नका, कारण तीच आपल्या समाजाची खरी ओळख आहे. हे परिवर्तन समाजमनात रुजवायचा असेल तर संघटित राहा, आपापसात लढू नका’. ही बिरसाइयतची सूत्रे आपल्या जीवनाची जीवनसूत्रे होण्यासाठी या जनजाती गौरव दिनाचे महत्त्व आहे. संपूर्ण समाजाला नवी दिशा देणाऱ्या या नायकाचे नाव रांचीच्या विमानतळाला दिल्याने किंवा त्यांच्या जन्मदिनी अखंड झारखंड या नव्या राज्याची निर्मिती म्हणजे समाजासाठी गौरवान्वित गोष्ट आहे. म्हणून आपण संपूर्ण देशभर त्यांची जयंती ‘जनजाती गौरव दिन’ म्हणून साजरी करू या. ज्या सर्व महापुरुषांनी पूर्ण समाजाला जोडण्याचे काम केले आहे, त्या सर्व वीरांची आज आठवण करून हे पवित्र कार्य पुढे वाढविण्याचा संकल्प करू या.

धरती आबा बिरसा मुंडा की जय

भारत माता की जय

लेखक : शरद शेळके ( सर )

प्रांत सचिव, वनवासी कल्याण आश्रम

प. महाराष्ट्र.

Back to top button