News

पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे- आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक पद्मविभूषण शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांनी नुकतेच १०० व्या वर्षात पदार्पण केले होते.


बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. २९ जुलै २०२१ रोजी त्यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या.


बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया होऊन वृद्धपकाळाने ते गेल्या आठवडाभरापासून दिनानाथ रुग्णालयामध्ये दाखल होते. प्रकृती खूप खालावल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज सोमवार दि. १५ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


दिवाळीआधीपासूनच बाबासाहेब आजारी होते. २६ ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना न्यूमोनिया झाला आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. बाबासाहेबांनी वयाची शंभरी गाठली. वार्धक्यामुळे ते उपचारालाही प्रतिसाद देत नसल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करत होते.


आपल्या ओघवती वाणी आणि लालित्यपूर्ण वक्तृत्वशैलीने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र महाराष्ट्रासमोर उभे केले. ऑगस्ट २०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरविले होते.


बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड होय. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुणे येथे झाला.


इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा, स्मरणशक्ती आदि गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषणक्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा ही त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये होती. शिवचरित्राच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रात घराघरात पोचले. त्यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकामुळे देशभरात छत्रपतींच्या चरित्राची पारायणे केली गेली. ‘जाणता राजा’ या महानाट्याने इतिहास घडवला. जगभरात प्रचंड लोकप्रियता आणि आदर प्राप्त केला. वयाची नव्वदी उलटल्यानंतरही त्याच्या वाणीतील आणि विचारांतील उत्साह कायम होता.
आपल्या एका विशिष्ट शैलीने गेल्या साठ वर्षांपासून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र्य महाराष्ट्रातील घराघरात पोहोचविले. अमोघ वक्तृत्वाने ऐकणाऱ्यांसमोर जाज्वल्य इतिहास उभा करण्याचे कसब त्यांच्यात होते. बाबासाहेब म्हणजे उत्साहाचा धबधबा होते. कोरोनाचा दीड वर्षाचा काळ सोडला तर या वयातदेखील ते कायम व्यग्र होते. व्याख्याने, सभांना ते या वयातही उत्साहाने उपस्थित असायचे. या वयातही सलगपणे दीड-दोन तास बोलण्याची त्यांची सवय होती.


कारकीर्द


तरुणपणी बाबासाहेब भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.
इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहुणे श्री.ग.माजगावकर यांच्याबरोबर ते ’माणूस’मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो.नी.दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत.बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.


दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामातील सहभाग


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते.


बाबासाहेब पुरंदरे यांचे लेखन


बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले.
पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांनी अनेक दस्तावेज स्वतः डोळ्याखाली घालून राजा शिवछत्रपती हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाची १७वी आवृत्ती ३१ मार्च, २०१४ (गुडी पाडव्या)ला प्रसिद्ध झाली. पूर्वी एकच असलेले हे पुस्तक आता दोन खंडांत विभागले आहे.


नाट्यलेखन आणि दिग्दर्शन


याचबरोबर फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल, इ.स. १९८४रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.’जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी १०दिवस आणि उतरवण्यासाठी ५ दिवस लागतात..
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रप्रसारासाठी काही उपक्रम चालवले. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशांतही त्यांच्या व्याख्यानांतून आणि जाणता राजा या महानाट्यातून आजही छत्रपती शिवरायांचे चरित्र जिवंत होते. हे चरित्र व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे हे त्यांनी त्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत आपल्या व्याख्यानांमधून पटवून दिले.


दानशूरता


बाबासाहेबांना पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या बिदागीतून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले. महाराष्ट्रभूषण या सन्मानाबरोबर दहा लाख रुपयांतले फक्त दहा पैसे स्वतःजवळ ठेवून उरलेल्या पैशात आणखी पंधरा लाख रुपये घालून ती सर्व रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला त्यांनी दान केली.
बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले ऐतिहासिक व अन्य साहित्य
आग्रा
कलावंतिणीचा सज्जा
जाणता राजा
पन्हाळगड
पुरंदर
पुरंदरच्या बुरुजावरून
पुरंदऱ्यांचा सरकारवाडा
पुरंदऱ्यांची नौबत
प्रतापगड
फुलवंती
महाराज
मुजऱ्याचे मानकरी
राजगड
राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध (या पुस्तकाची २०१४ साली प्रकाशित झालेली इंग्रजी आवृत्तीही आहे. भाषांतरकार – हेमा हेर्लेकर)
लालमहाल
शिलंगणाचं सोनं
शेलारखिंड.
सावित्री
सिंहगड
ध्वनिफिती
बाबासाहेब पुरंदरे यांचे कथाकथन – भाग १, २, ३ (कॅसेट्‌स आणि सीडीज)
शिवचरित्र कथन भाग १ ते १५ कॅसेट्‌सचा आणि सीडीजचा सेट


बाबासाहेब पुरंदरे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार


राजामाता सुमित्राराजे भोसले, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, इतिहास संशोधक न.र. फाटक, कवी कुसुमाग्रज, सेतुमाधवराव पगडी, आचार्य अत्रे, शिवाजीराव भोसले, नरहर कुरुंदकर, लता मंगेशकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर आदी नामवंतांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आहे.
डी.वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने त्यांच्या इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल डी.लिट. (२०१३)
’बेलभंडारा’ या नावाने बाबासाहेब पुरंदरे यांचे सचित्र चरित्र डॉ.सागर देशपांडे यांनी लिहून प्रसिद्ध केले आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांना १९ ऑगस्ट २०१५ रोजी महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या दिवशी श्रावण शुद्ध चतुर्थी होती, तो दिवस बाबासाहेबांचा तिथीने ९३वा वाढदिवस होता.
गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार (२१-२-२०१६)
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१२)
महाराष्ट्रभूषण (इ.स. २०१५)
पद्मविभूषण (इ.स.२०१९)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button