Opinion

‘तांबड्या माती’तील साधा माणूस भालजी पेंढारकर

 

आज २६ नोव्हेंबर : मराठी चित्रपट सृष्टीत ‘तांबड्या माती’तील साधा माणूस भालजी_पेंढारकर यांचा स्मृतिदिन.

भालजी पेंढारकर कोल्हापूरच्याच गुरुवर्य विभूते यांच्या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिकले. भालजी हुशार पण अभ्यासात लक्ष नसे. नाटकांचे वेड होतंच. मेळेही लिहित. परिणामी मॅट्रिक नापास झाले. आई रागावल्यावर हेही भडकून पुण्याला गेले. घरोघर सकाळी ‘केसरी’ टाकायचे. वयाच्या अठराव्या वर्षी सैन्यात दाखल झाले. पंजाब व आसपासचा भाग भटकून पाहिला. ते सोडून पुढे पुण्याच्याच ‘लक्ष्मी’ व ‘अपोलो’ या सिनेमागृहात मॅनेजर म्हणून काम केले. बोलपट सुरू होण्याआधीचा तो काळ, त्या काळात नाटकांची चलती होती. भालजींना लिहिण्याचं वेड. त्यांनी ‘राष्ट्रसंसार’, ‘क्रांती’, ‘अजिंक्यतारा’, ‘आसुरी लालसा’, ‘कायदेभंग’ अशी राष्ट्रप्रेमाने भारलेली नाटके लिहिली. नाटके लिहिण्याचा हा अनुभव त्यांना लवकरच उपयोगी पडला. १९३२ साली ‘सरस्वती सिनेटोन’च्या ‘श्यामसुंदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचप्रमाणे कथा-पटकथा-संवाद-गीते अशी सारी जबाबदारी भालजींवर सोपविण्यात आली. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. ‘श्यामसुंदर’ची याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्यं होती. भारतातला तो पहिला ‘बाल चित्रपट’. शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती. शाहू मोडक यांचा हा पहिला चित्रपट आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. त्यानंतर भालजींनी कोल्हापूर सिनेटोन (आकाशवाणी, कालियामर्दन), श्याम सिनेटोन (पार्थकुमार), सरस्वती सिनेटोन (सावित्री, राजा गोपीचंद),  शालिनी सिनेटोन (कान्होपात्रा), अरुण पिक्चर्स (नेताजी पालकर, गोरखनाथ) फेमस अरुण (सूनबाई) या चित्रसंस्थांच्या चित्रपटांचे दिग्दर्शन व कथा-पटकथा-संवाद व गीते ही सारी जबाबदारी सांभाळली. १९४५च्या सुमारास भालजींनी छत्रपतींच्या मालकीचा ‘कोल्हापूर सिनेटोन’ हा स्टुडिओ विकत घेऊन त्याचे ‘जयप्रभा स्टुडिओ’ (जयसिंग व प्रभाकर यांच्या नावावरून) असे नामकरण केले. भालजींचा हा स्टुडिओ एखाद्या आश्रमासारखा होता. सगळीकडे स्वच्छता, टापटीप व प्रसन्न वातावरण होते. पण शिस्त मात्र कडक होती. स्टुडिओच्या आवारात कागदाचा कपटा व सिगारेटचं पाकीट, सिगरेट-विडीचे उरलेले तुकडे काहीच दिसत नसत. त्याकरिता ठिकठिकाणी पेट्या होत्या. त्यातच कचरा टाकला पाहिजे, असा नियम होता. स्टुडिओत सुमारे साडेतीनशे माणसे नोकरीला असूनही कुठेही गडबड गोंधळ नसे. भालजींना सारे ‘बाबा’ म्हणत. ते स्टुडिओत असो वा नसो त्यांचा दराराच एवढा होता की लोक उगाचच इकडे तिकडे चकाट्या पिटताना कधी दिसत नसत. स्टुडिओत ठिकठिकाणी नियम व सूचनांचे फलक लावलेले होते. काही ठिकाणी तर सुविचारांचेही फलक दिसत. चित्रपटाच्या वेळी काम नसले तरी सर्वांना स्टुडिओत यावेच लागे. सकाळी साडेदहा वाजता सर्वांना स्टुडिओत यावे लागे. कामाची सुरुवात चौकात भगव्या ध्वजासमोर प्रार्थनेने व्हायची. बाबा स्वत: प्रार्थनेला सुरुवात करीत. त्यांच्या मागून सारेजण म्हणत. कधीकधी बाबांचे सहायक जयशंकर दानवे प्रार्थना म्हणत. सकाळची प्रार्थना

‘कृषिवलांची वीरवरांची देवांची जननी

पतिव्रतांची सद्धर्माची महत् जन्मभूमी’

अशी होती तर संध्याकाळी परत प्रार्थनेनंतर काम थांबे.

संध्याकाळी ‘मारूनि मेले अमर जाहले स्वतंत्रतेसाठी प्रणाम त्यांना तुला दंडवत माते कोटी कोटी’ या प्रार्थनेने दिवस संपे.

भालजींच्या प्रत्येक चित्रपटाची सुरुवात ‘बहुत असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या महाराष्ट्रगीताने होत असे. बाबांचा पोषाख म्हणजे अत्यंत साधा पांढरा सफेद बिनकॉलरचा सदरा, पांढरी हाफपॅन्ट व कोल्हापूरी चपला. विशेष प्रसंगी ते भगवी टोपी घालत.

चित्रपटासाठीसुद्धा नाटकातल्यासारखी नटांची खच्चून तालीम करून घेणारे भालजी हे बहुतेक शेवटचे दिग्दर्शक म्हणावे लागतील. तालीम हॉलमधले भालजी म्हणजे एक प्रकारे शिक्षकच असायचे. बोलावं कसं, चालावं कसं, उभं रहावं कसं याबरोबरच एखाद्या भूमिकेतील हालचाल कशी असायला पाहिजे हे सारं ते करून दाखवत व करून घेत. अभिनय उत्तम व्हावा यावर त्यांचा कटाक्ष असे. चुकल्यावर भल्याभल्यांना ते छडी मारत. पण त्यांचं मारणं प्रेमाचं असे. कलाकारांच्या अभिनयाच्या आवाका आजमावून त्याप्रमाणे ते समजावून सांगत. वेळ प्रसंगी थोडी मोकळीकही देत.

भालजींचे बहुतेक चित्रपट ऐतिहासिक होते. शिवाजीचं किंवा संभाजींचं काम करणार्याी अभिनेत्याला ते सांगत- ‘हा छत्रपतींचा पोषाख अंगावर असताना तू कुणालाही, अगदी मलासुद्धा वाकून नमस्कार करायचा नाहीस. तुला कोणी नमस्कार केला तर फक्त गळ्यातल्या माळेला हात लावून ‘जगदंब जगदंब’ एवढंच म्हणायचं. आता तू छत्रपती आहेस!’ बाबांची शिवभक्ती आणि निष्ठा एवढी जाज्वल्य होती की चित्रपटातला छत्रपतींचा पोषाखही त्यांना वंदनीय वाटायचा. त्याक्षणी ते शिवमय असायचे.

भालजींच्या चित्रपटात संगीताला फारसं महत्त्व कधीच नसे. भालजी स्वत: गीतलेखक. संगीताची त्यांना उत्तम जाण. पूर्वी नाटकात अभिनयाबरोबर गाणीही त्यांनी म्हटली होती. काही दिवस अल्लादियाखांची शागिर्दीही केलेली. तिथे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले असे असतांनासुद्धा भालजींच्या चित्रपटात संगीताला महत्त्व नव्हतं. याचं कारण भालजींचा चित्रपट निर्मितीमागचा हेतू अगदी स्पष्ट होता.

स्वातंत्र्यपूर्वी काढलेल्या चित्रपटांच्या निर्मितीचा उद्देश म्हणजे पारतंत्र्यात असलेल्या मातृभूमीतील जनतेची अस्मिता जागृत करून मरगळलेल्या महाराष्ट्राला परकीय सत्तेविरूद्ध झुंजण्याची स्फूर्ती देणं तर स्वातंत्र्यानंतरही स्वराज्य मिळाले तरी सुराज्य करण्यासाठी बळकट मनगट आणि उरात अभंग आवेश असणारी नवी पिढी निर्माण व्हावी या हेतूने त्यांनी चित्रपटनिर्मिती सुरूच ठेवली.

याविशिष्ट हेतूने चित्रपट काढण्याचा प्रक्रियेतूनच भालजींचं खास वैशिष्ठ्य असलेल्या ‘खटकेबाज संवादा’चा जन्म झाला. त्यांच्या अनेक चित्रपटातील खटकेबाज संवाद त्यांच्या चमकदार लेखणीची चुणूक दाखवतात. त्यांचे संवाद तालासुरात असतात. त्यांना वजन असतं. चित्रपटातील कित्येक प्रसंगांना तर भालजींच्या संवादामुळे रंगत आली आहे, उठाव आला आहे. प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे धारदार संवाद हे त्यांच्या चित्रपटांचं प्रमुख आकर्षण असायचं. समाजातील दुबळेपणा, लाचारी पराधीनता, लाळघोटेपणा, स्वकीयांचा घात, फंदफितुरी या अशा कित्येक दुर्गुणांवर आपल्या कडक संवादातून फटकार्याेसारखे कोरडे त्यांनी ओढले आहेत. याबरोबरच सुविचारांची पखरणही त्यांच्या संवादात असे. चित्रपट मग तो ऐतिहासिक असो, ग्रामीण असो वा सामाजिक असो… भालजींनी त्यांच्या संवादातून काही ना काही संदेश प्रेक्षकांना दिलाच आहे!

बाबांची शिष्यपरंपरा फार मोठी आहे. शाहू मोडकला तर त्यांनी ‘श्यामसुंदर’मधून बालनट म्हणून आणले. त्याचप्रमाणे  विठ्ठल, ललिता पवार, चंद्रकांत, सूर्यकांत, जयशंकर दानवे, सुलोचना, राजकपूर ही बाबांचीच शिष्यमंडळी. बाबांच्या तालमीत अभिनयाबरोबरच शिस्त व स्वाभिमानाचीही दीक्षा मिळत असे. कारण बाबांच्या स्वभावाचा तो मानबिंदू होता. गांधी वधोत्तर झालेल्या जाळपोळीच्या वणव्यात बाबांचा जयप्रभा स्टुडिओ लोकांच्या रागामुळे आगीत जळून खाक झाला. कारण काय? तर गांधींचा मारेकरी हिंदुमहासभेचा कार्यकर्ता आणि बाबा हे हिंदूमहासभेचे कट्टर अनुयायी. बाबा त्यावेळी पन्हाळ्याला होते. जयप्रभा स्टुडिओ जळाल्याचं दु:ख भालजींना वेगळ्याच कारणासाठी झालं. एकतर साडेतीनशे कामगारांवर बेकारीची कुर्हाभड कोसळली आणि दुसरं म्हणजे भालजीचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांवर भारताबाहेरच्या विशेषत: पोर्तुगीत फ्रेंच व इटालियन इतिहास संशोधकांनी जे काही लिहिलंय त्यांची इत्यंभूत माहिती राजाराम कॉलेजचे प्राचार्य, इतिहासाचे प्राध्यापक व अभ्यासक व भालजींचे मित्र डॉ. बाळकृष्ण यांनी परिश्रमपूर्वक व गोळा केली होती. त्यावर संशोध करून प्रबंध लिहिला होता. भालजी तो प्रसिद्धही करणार होते. तो प्रबंध त्या आगीत जळून भस्मसात झाला. या गोष्टींचे भालजींना अतोनात दु:ख झालं. जळितात नष्ट झालेला ‘मीठभाकर’ त्यांनी पुन्हा नव्याने काढला. त्यानंतर शिलंगणाचे सोने (१९४९), मी दारू सोडली (१९५०), शिवा रामोशी (१९५१), छत्रपती शिवाजी (१९५२), मायबहिणी (१९५२), माझी जमीन (१९५३), महाराणी येसूबाई (१९५४), येरे माझ्या मागल्या (१९५५), पावनखिंड (१९५६), नायकिणीचा सज्जा (१९५७), आकाशगंगा (१९६५), तांबडी माती (१९६९), गनिमी कावा (१९८१), शाबास सूनबाई (१९८६) अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करून दिग्दर्शनही केले. १९८६ साली ‘शाबास सूनबाई’ हा चित्रपट करताना त्यांचं वय ८६ होतं. दृष्टी जवळजवळ अधू होती. परंतु कलाकारांचे संवाद ऐकून ते दिग्दर्शन करीत. त्या वयातही ते सेटवर सतत उभे राहात. चित्रपटसृष्टीत आयुष्य घालवून बाबा सन्मान वा सत्कार स्वीकारण्यापासून दूर राहिले. उतारवयात मात्र त्यांच्यावर अनेक पुरस्कारांची खैरात झाली. चतुरंग प्रतिष्ठानचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा ग. दि. माडगूळकर पुरस्कार, कोल्हापूरचा हुकुमतपनाह पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. पण भालजी पडले विरक्त कर्मयोगी. त्यांनी या सर्व पुरस्कारांची रोख रक्कम त्या त्या संस्थेला किंवा गरजू व योग्य व्यक्तीला देऊन टाकली. भालजी ही व्यक्ती मान-सन्मानाच्या पलिकडची होती. १९९२ साली त्यांना चित्रपटातील व्यक्तीला देण्यात येणारा  सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. पण वयोवृद्ध भालजींकरिता हा नियम बाजूला ठेवून राष्ट्रपतींच्या प्रतिनिधीने कोल्हापूरात येऊन हा पुरस्कार दिला. संस्कार, ध्येय, समाजप्रबोधन यापासून आजची चित्रपटसृष्टी फार दूर गेली आहे. मात्र आपल्या चित्रपटातून समाजाच्या अन्त:करणात देव, देश आणि धर्म याची ज्योत सदैव तेवत ठेवणारे भालजी पेंढारकर बदलत्या काळाच्या ओघात निश्चिवतच वंदनीय आहेत! भालजी पेंढारकरांचे २६ नोव्हेंबर १९९४ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून भालजी पेंढारकर यांना आदरांजली.

दूरदर्शनच्या संग्रहातील व्यक्तिमत्त्वावर आधारीत लघुपट-चित्रयोगी भालजी पेंढारकर.

रंगीत चित्रपट – छत्रपती शिवाजी १९५२ भालजी पेंढारकर.

आकाशगंगा १९५९ भालजी पेंढारकर.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट/ मधू पोतदार

Back to top button