Opinion

आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत गोमंतकियाचा डंका

नुकत्याच घोषित केलेल्या ‘द आर्किटेक्चर मास्टर प्राईज २०२१’ ह्या स्पर्धेत एका गोमंतकियाने आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळवत इवल्याश्या गोव्याबरोबर संबंध भारत देशाचा मान वाढविला आहे. गौतम कामत बांबोळकर असे ह्या युवकाचे नाव असून त्यांच्या ‘मॅन मेड केव्हस’ आणि ‘री इमॅजिनड व्हेसल’ शीर्षक असलेल्या दोन छायाचित्रांना पब्लिक इंटिरियर ह्या श्रेणीत २०२१ वर्षाचा ‘बेस्ट ऑफ बेस्ट’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

गौतम बांबोळकर ह्यांचा जन्म फोंडा तालुक्यातील बांदोडा गावात झाला. वडील बँकेत नोकरी करत असल्याने दर ३ वर्षांनी त्यांची बदली व्हायची . गौतम लहान असताना त्यांची शिमोगा कर्नाटक येथे बदली झाली त्यामुळे गौतम ला लहानपणी कन्नड शिकायला मिळाली. काही काळानंतर गोव्यातील कांदोळी येथे त्यांची पुन्हा बद्दल झाल्याने गौतमचे शिक्षणक्षेत्रात  वेगवेगळ्या शाळांमधून शिक्षण झाले.  पीपल्स हाय स्कुल येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्याने गोवा कॉलेज ऑफ आर्टस् मध्ये प्रवेश मिळविला. इलुस्ट्रेशन ह्या विषयात स्पेशलायजेशन करून एमइटी-आयआयटी मुंबई मध्ये कॉम्पुटर ग्राफिक्स विषयात कोर्स केला. त्यामुळे गौतम ला चांगल्या ठिकाणी काम करून अनुभव मिळविण्याची संधी मिळाली. मुंबईत वेस्टर्न आउटडोअर इंटरएक्टिव्ह, नंतर सायबेज आणि त्यानंतर कॉग्निझंट सारख्या आयटी कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी केली. कॉग्निझंट कडून, क्लायंट हाताळण्यासाठी आणि डिझाइन-आधारित प्रकल्पांचे नेतृत्व करण्यासाठी अमेरिकेत स्थलांतर करण्यास सांगितले गेले कारण गौतम यूजर एक्सपीरिअन्स व्यवस्थापक चे काम करत होते व त्यांनी अमेरिकेची वाट धरली. 

सध्या गौतम गुगल कंपनीत काम करतो आणि त्याबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि, “गुगल मध्ये काम करणे हे माझ्यासाठी नेहमीच एक स्वप्न होते. त्यांच्या मुलाखतीच्या प्रक्रियेतून जाण्यासाठी मी एक वर्ष काम केले आणि जीव तोडून मेहनत केली. अंतिम होकार मिळण्यापूर्वी मला जवळपास १० मुलाखतींच्या फेऱ्या पार कराव्या लागल्या. ही प्रक्रिया ८ महिन्यांहून अधिक काळ चालली. मी आता गुगलच्या न्यूयॉर्क ऑफिसमध्ये इंटरॅक्शन डिझाइनर म्हणून काम करत आहे.”

फोटोग्राफीच्या छंदाबद्दल विचारल्यावर गौतम म्हणाला की “माझ्याकडे फोटोग्राफीचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नव्हते. अशी कोणी व्यक्ती सुद्धा नव्हती कि ज्यांच्याशी संपर्क साधून शिकू शकतो, किंवा माझा असा कोणी गॉडफादर नव्हता. फोटोग्राफी करण्यास सुरुवात केली तेव्हा अनेक गोष्टी खूप गोंधळात टाकणाऱ्या होत्या. छायाचित्रण हे केवळ चित्र किंवा रचनेबद्दलच नाही, तर परिपूर्ण चित्र मिळविण्यासाठी अनेक तांत्रिक आणि इतर गोष्टींचे अचूक ज्ञान आवश्यक आहे, जसे की एक्सपोजरची समज, छिद्र पातळी, आयएसओ, लेन्सचे प्रकार, प्रकाशासाठी असलेले सेटिंग इ. आणि हे सर्व शिकण्याचा माझा एकमेव स्त्रोत युट्युब होता आणि आहे. आज कोणासाठीही कोणत्याही क्षेत्रातील कौशल्य शिकणे आणि वाढवणे ह्यासाठी युट्युब एक खूप चांगले व्यासपीठ आहे.”

गौतम भरपूर आर्किटेक्चर तसेच लँडस्केप फोटोग्राफी करतो. आता तो हळू हळू वन्यजीव फोटोग्राफी ह्या विषयाकडे वळत आहे. दोन्ही फोटोग्राफीचे प्रकार एकमेकांपेक्षा खूप भिन्न आहेत असे त्याने सांगितले. जर एक स्थिर असेल तर दुसरा गतिमान आहे आणि प्रत्येकाची स्वतःची मर्यादा आणि फोटोद्वारे सौंदर्य टिपण्याची शक्ती असते असे गौतम म्हणतो. नॅशनल जिओग्राफिक छायाचित्रकारांकडून तो खूप प्रेरित आहे आणि नॅटजीओच्या युवर शॉट स्टोरीमध्ये त्याचे  एक छायाचित्रही प्रसिद्ध झाले होते त्याचबरोबर त्याला, त्याच्या फोटोंवर नॅशनल जिओग्राफी च्या एका निर्मात्याकडून वैयक्तिकृत मार्गदर्शन सुद्धा मिळाले. 

‘द आर्किटेक्चर मास्टर प्राईज’ बद्दल माहिती देताना गौतम सांगितले “आर्किटेक्चर मास्टर प्राइज आता ६ व्या वर्षात आहे. हा एक जागतिक आर्किटेक्चर पुरस्कार आहे जो डिझाइन उत्कृष्टतेला मान्यता देतो. आर्किटेक्चर मास्टर प्राइज जगभरातील दर्जेदार आर्किटेक्चरल डिझाईनचे कौतुक आणि प्रदर्शन वाढवण्यासाठी तयार केले गेले. हे पारितोषिक आर्किटेक्चर, इंटिरियर डिझाइन, लँडस्केप आर्किटेक्चर, आर्किटेक्चरल प्रोडक्ट डिझाइन आणि आर्किटेक्चरल फोटोग्राफी मधील सर्जनशीलता आणि नवकल्पना साजरे करून प्रोत्साहन देते. जगभरातून अनेक सबमिशन येतात. या वर्षी त्यांनी आर्किटेक्चर फोटोग्राफी मास्टर प्राईझ (APMP) सादर केला आहे, जो अंगभूत वातावरणातील उत्कृष्ट आर्किटेक्चरल फोटोग्राफीला मान्यता देणारा पुरस्कार आहे. यावर्षी ६५ देशांतून प्रवेशिका आल्याहोत्या. न्यायाधीशांकडून सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विजेत्यांना ‘बेस्ट ऑफ बेस्ट’ हा पुरस्कार मिळतो. मला खूप आनंद झाला आहे की माझ्या ‘मॅन-मेड केव्हज’ (५फोटोंचा संग्रह) फोटो मालिका आणि ‘रीइमेज्ड व्हॅसल’ या एकाच फोटोला ‘बेस्ट ऑफ बेस्ट’चा किताब मिळाला आहे.”

हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळाल्यावर कुटुंबीयांची प्रतिक्रिया कशी होती असे विचारताच गौतमने सांगितले कि “प्रत्येकजण खरोखर खूप उत्साही आणि आनंदित झाले. त्यांनी सदैव मला प्रोत्साहन दिले आहे आणि माझ्या प्रवासाचा नेहमीच भाग होते आणि राहतील. आई-वडील आणि माझे कुटुंब गोव्यात राहतात. आमच्याकडे खूप जवळचे विणलेले विस्तारित कुटुंब देखील आहे म्हणून व्हिडिओ चॅट ही एकमेव गोष्ट आहे जी आम्हाला जवळ ठेवते. कोरोनामुळे मी प्रवास करू शकलो नाही पण लवकरच त्याचे नियोजन करत आहे. माझे घर बांदोडा येथे महालक्ष्मी मंदिराजवळ आहे. मला तेथील वातावरण आणि शांतता आठवते. त्याच बरोबर गोव्याची शीत आणि माश्यांची कडी खूप मिस करतो.”

युट्युब आणि फेसबुकच्या माध्यमाने गौतम गोव्यातील मीडिया फॉलो करतो. गोव्यात निवडणुका जवळ आल्याने मी त्याचे बारकाईने पालन करतो. भारत सरकारने आणि लोकांनी कोविडची परिस्थिती ज्याप्रकारे हाताळली याचे मला आश्चर्य आणि अभिमान वाटतो असे गौतमने सांगितले. न्यूयॉर्क, लंडन सारखी शहरे सर्वात जास्त प्रभावित शहरांपैकी एक होती. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन असून सुद्धा त्यांनी गुढगे टेकवले पण भारतातील परिस्थिती ज्या प्रकारे हाताळली गेली आणि आता करोडो भारतीयांना लसीकरण केले गेले याला सलाम आहे असे त्याने नमूद केले. भारतातील समस्या पश्चिमेपेक्षा नक्कीच १० पट मोठी होती आणि सर्वांनी एकत्र राहून याचा सामना केला त्याबद्दल मला अभिमान आहे असे त्याने सांगितले. अमेरिकेतील अनुभवाबद्दल सुद्धा बोलताना त्याने नमूद केले कि “सुरुवातीला मी अमेरिकेत राहणे मला अवघड असेल असे गृहीत धरले होते. पण सुदैवाने, मी जिथे प्रवास केला तिथे मला खूप मैत्रीपूर्ण आणि नम्र भारतीय मिळाले. मी सुरुवातीला ओहायोमध्ये काम केले, न्यू हॅम्पशायरला गेले आणि आता मी न्यू जर्सीमध्ये आहे. ते आता माझे दुसरे कुटुंब बनले आहेत. आम्ही अनेकदा  भेटतो आणि एकत्र प्रवास करतो.”

“प्रथम आपले ध्येय निश्चित करणे, ते साध्य करण्यासाठी योजना तयार करणे आणि त्या दिशेने सातत्याने कार्य करणे महत्वाचे आहे. जर एखाद्याला असे वाटते की त्यांना जे साध्य करायचे आहे त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणारे कोणीही नाही. यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आजच्या युगात जगाने आपले दरवाजे उघडले आहेत. अनेक ट्यूटोरियल आणि गुरु आहेत जे त्यांच्या फील्डमध्ये टिप्स आणि युक्त्या देतात. तुमच्या बोटांच्या टोकावर शिकण्यासारखे बरेच काही आहे. भारतातील बहुसंख्य तरुणांकडे बेसिक स्मार्टफोन आहे ज्यावर कॅमेरा आहे आणि इंटरनेट शुद्ध आहे. तुम्हाला फोटोग्राफीपासून सुरुवात करायची आहे, मोबाईलवर लघुपट बनवून सुरुवात करा. साधन नाही म्हणून गप्प न बसता जी साधने उपलब्ध आहे त्यांचा वापर करून कामाला लागा.” असे आवाहन त्याने तरुणांसाठी केले. 

अथक मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर साता समुद्रापार डंका वाचविणाऱ्या अनेक भारतीयांपैकी गौतम कामत बांबोळकर हे एक नाव आहे. अनथक आणि अविरत श्रम करून वैयक्तिक जीवनात तसेच सामाजिक जीवनात गौतम बांबोळकर सारख्या व्यक्तींनी संधीचे सोने करून भारत देशाबरोबर इवल्याश्या गोव्याच्या नावाचे झेंडे फक्त अटकेपार न लावता जगाच्या दुसऱ्या बाजूला गाडून यश मिळविले. फक्त उपजीविकेच्या क्षेत्रात यश न मिळविता छंद जोपासलेल्या क्षेत्रात सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर यश प्राप्त करणे हि खरोखरच कौतुकास्पद आणि गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. गौतम बांबोळकर सारख्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन अनेक युवक विविध क्षेत्रात भीमपराक्रम करण्याचे ध्येय बाळगतील त्याचबरोबर, भविष्यात गौतम कामत बांबोळकर यांचे नाव फोटोग्राफी क्षेत्रात परत एकदा नवीन पराक्रम केल्याबद्दल झळकेल ह्यात शंकाच नाही. 

साौजन्य : वि.सं.केंद्र, गाोवा

Back to top button