Opinion

महामानवाच्या विचारांना कृतीची जोड मिळावी!

आपल्या देशाला संविधान (घटना) प्रदान करण्याचे सर्वात मोट्ठे आणि महत्वाचे काम घटना समिती अध्यक्ष या नात्याने बाबासाहेबांनी केले आहे. भारतीय हिंदू संस्कृतीची गौरवशाली परंपरा यातील समता आणि बंधुता याला भारतीय घटनेच्या माध्यमातुन पुनर्स्थापित करून सर्व राष्ट्राला पुन्हा एकदा एक सूत्रात बांधले आहे. त्यानिमित्त राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रवाद यांची पुन्हा एकदा सुस्पष्ट मांडणी केली आहे.

अस्पृश्यतेच्या अपमानास्पद वागणुकीच्या अनुभवाला सामोरे जात स्वतःचे शिक्षण दैदिप्यमान रित्या पूर्ण करत, आपल्या समाजावरील अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी मोठ्ठा लढा उभारला. प्रस्थापित आणि तथाकथित उच्चवर्णीय मानसिकतेविरुद्ध आपल्या समाजाला एकत्रित बांधले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा संदेश दिला. त्यांनी आपल्या समाजाला ज्या पद्धतीने जागृत केले व सर्व आयुष्य त्यांच्यासाठी वाहिले त्यामुळेच आजही त्यांना मोठ्या श्रद्धेने पुजले जाते.

घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष पदावरून केलेल्या भाषणांचा आढावा घेतला तर बाबासाहेबांनी जी राष्ट्रवादाची सुस्पष्ट संकल्पना मांडली त्याला तोड नाही.

बाबासाहेब यांनी संपूर्ण राष्ट्राचाच विचार केला. त्यांनी वेळोवेळी मांडलेले विचार याची साक्ष आहेत. त्यांची इस्लाम, पाकिस्तान, डावी विचारसरणी, राष्ट्रवाद यावरील मते अभ्यासण्यासारखी आहेत. ध्वज समितीत, भारताचा राष्ट्र ध्वज भगवा असावा असेही त्यांनी आग्रहपूर्वक मांडले होते. आपण मात्र बाबासाहेबांना समाजाच्या एका घटकाचेच नेते मानत आलो.

हिंदुसमाजाकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांनी परावर्तन केले. मात्र हे करतानाही त्यांनी राष्ट्राचाच विचार केला. परावर्तन करताना या मातीतला, संस्कृतीशी बांधिलकी सांगणारा धर्म स्वीकारला. इस्लाम, ख्रिश्चन यांना नाकारले. डाव्यांच्या विचारसरणीला लांब ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दुर्दैवाने आज या महामानवाचा विचार जगताना कुणी दिसत नाही. शिका आणि संघटित व्हा ही त्यांची शिकवण किती अमलात येत आहे? ज्या इस्लाम आणि डाव्या विचारसरणीला बाबासाहेबांनी नाकारले, हे राष्ट्राच्या हिताला आणि समाजाला घातक आहे असे स्पष्ट मत मांडले…. दुर्दैवाने त्यांचाच नातू हे विचार मोडीत काढतोय.

बाबासाहेबांनी त्यांच्या त्रिसूत्रीत सर्वात महत्व दिले ते शिका…. याला… आणि आज स्वातंत्र्यानंतर एव्हढ्या वर्षांनी काय परिस्थिती आहे? याकडे गंभीर्याने आणि जबाबदारीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे…. कारण शिक्षणाशिवाय प्रगती नाही. आपल्या समाजाचा एक मोठ्ठा घटक शिक्षणापासून वंचित राहाणे हे समाजाला भूषणावह नक्कीच नाही….. ज्या दलित आणि पिडीत बांधवांना त्यांनी दिशा देण्याचा भगीरथ प्रयत्न केला, त्यातील काही मंडळी उच्च शिक्षित झाली, समाजात काही स्थान प्राप्त केले पण त्यांनी आपल्या बांधवांचे उत्थान व्हावे यासाठी काहिही केले नाही. सर्वात हास्यास्पद म्हणजे इस्लामी, डावे, काँग्रेसी बाबासाहेबांचे नाव घेऊन समाजात संभ्रम निर्माण करत आहेत!!!

बाबासाहेब हे विविधांगी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांचे अर्थशास्त्रीय विचार आणि मांडणीही अभ्यासनीय आणि अनुकरणीय आहे.

अशा या महामानवाला तत्कालीन राज्यकर्ते, ज्यात नेहरू आघाडीवर होते, यांनी अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. ३७० कलमला त्यांचा विरोध असताना अन्य मंत्र्यांकडून मसुदा तयार करून कायदा मंत्र्यांना बाजूला ठेवून बिल पास करून घेतले. कायदा मंत्र्यांना अंधारात ठेवून कायदा पास करून घेण्याचे हे एकमेव उदाहरण…. बाबासाहेबांचा हा धडधडीत अपमान आणि त्यांचे राष्ट्रहिताचे धोरण झिडकरण्याचा प्रयत्न नेहरूंनी केला…. बाबासाहेबांना समजून घेण्यात समाज अपुरा पडला. समाजाने झिडकारून, हेटाळणी करून, अपमान करून सुद्धा त्यांनी कधीही या देशाबद्दल, समाजाबद्दल राग मनात ठेवला नाही आणि तत्कालीन मागास आणि पीडित समाजाचे नेतृत्व करतानाच या देशाच्या हिताचाच विचार केला. कधीही समाजात यादवी माजू दिली नाही….. परंतु या महामानवाबद्दल अजूनही समज गैरसमज पसरविले जातात. त्यांच्या नावाने राजकारण केले जाते. या राष्ट्र पुरुषाला त्याचा उचित मान आणि सन्मान प्राप्त करून देण्याची जबाबदारी आपलीच आहे.

समता आणि समरसता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समरसतेचा हा भाव आपल्या आचारात, विचारात, संस्कारात, व्यवहारात जेव्हा सहज पणे डोकावू लागेल तेव्हाच या महामानवाच्या विचारांना कृतीची जोड मिळाली असे म्हणता येईल आणि भारताच्या दृष्टीने तो सुदिन असेल.

अशा या क्रांतिकारी विचाराच्या महामानवाला श्रद्धापूर्वक आदरांजली. या निमित्त बाबासाहेबांचे चरित्र वाचून, समजून घेऊन त्यांचे यथार्थ दर्शन आपण सर्व करून घेऊयात आणि त्यांनी पुरस्कार केलेला राष्ट्रवाद आपल्या आणि सर्व देशबांधवांच्या मनात जागवूया.

अरविंद जोशी

Back to top button