Opinion

गोवा मुक्ती लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग


गोवा राज्य या वर्षी गोवा मुक्ती लढ्याची साठावे वर्ष साजरे करत आहे. पोर्तुगीजांच्या जाचक यातनांतून गोवा मुक्त करण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून बलिदान दिले. देशसेवेने प्रेरित झालेल्या सेवा दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा अनेक संघटनांनी संघटीत लढा दिला. त्याचेच फळ म्हणून 19 डिसेंबर 1961 या दिवशी गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मोहन रानडे यांचे गोवा मुक्ती लढ्यातील काम अतुलनीय आहे. पोर्तुगीजांनी अनेक वेळा त्यांना तुरुंगात डांबुन त्यांची हालअपेष्ठा केली. त्यांना गोवा मुक्ती लढ्यातील सिंह म्हटले तर वावगे ठरणार नाही. बहुतेक भारतीयांना गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याची विशेष माहिती नाही. गोव्याचा मुक्तीलढा हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा शेवटचा टप्पा आहे. मोरेश्वर उर्फ मनोहर विष्णू आपटे हे मूळ सांगलीचे पण वि. दा. सावरकर यांच्या प्रेरणेने त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या प्रेरणेने मनोहर विष्णू आपटे यांच्या मनात देशप्रेमाचे स्फुलिंग पेटले. पुढे मनोहर विष्णू आपटे यांनी मोहन रानडे हे नाव धारण करून गोवा मुक्ती लढ्यात भाग घेतला. अनेक वेळा वि. दा. सावरकर यांचाही सहवास त्यांना लाभला. असेच एकदा गप्पा मारताना सावरकर रानडे यांना म्हणाले, ‘शत्रूने निवडलेल्या रणांगणावर आपण जायचे नसते. आपण आपल्या सोयीनुसार रणांगणे निर्माण करायची असतात. शत्रूला तिथे यायला भाग पडायचे असते.’ सावरकरांच्या रणनीतीचा हा पाठ मोहन रानडे यांना गोव्याच्या मुक्तीसंग्रमासाठी अतिशय उपयुक्त ठरला.


वयाच्या 19 व्या वर्षी आपले जन्मगाव सांगली सोडून स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी घरात कुणाला न सांगता ते थेट गोव्यात आले. गोव्यात त्यांनी विविध ठिकाणी शाळामास्तर म्हणून काम केले. शाळेच्या माध्यमातून त्याने लहान मुलामध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्याने ‘जय हिंद’ हा नारा लावत पोर्तुगीज सरकार विरुध्द मिरवणुका काढण्यास सुरवात केली. याचा पोर्तुगीज पोलिसांना सुगावा लागताच त्यांना पकडण्यासाठी हालचाली सुरु झाल्या. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला गोवा सोडून जाण्याचा सल्ला दिला. ते गोवा सोडूनही गेले व सहा महिन्यांनी परत गोव्यात आले. त्यानंतर त्यांनी ‘आझाद गोमंतक दला’च्या सशस्त्र लढ्यात भाग घेतला. या दलाच्या कार्यकर्त्यांनी मोहन रानडे यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा येथील पोलीस स्टेशन, कुंक्कळी पोलीस स्टेशनवर सशस्त्र हल्ला केला. पोबुर्फा येथे पोलिसाबरोबर सशस्त्र चकमक झाली. पण बेती पोलीस स्टेशन वर हल्ला करते वेळी रानडे जखमी झाले व पोलिसांनी त्याला अटक केले. राष्ट्द्रोहाच्या आरोपाखाली त्यांना 26 वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्यातील साडेपाच वर्षे त्याने एकांतवासात काढली. त्यांना पोर्तुगालच्या तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांनी पोर्तुगीज पोलिसांची झोप उडवली होती.


19 डिसेंबर1961 ला गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला. पण तेल्यू मास्कारेनेंस आणि मोहन रानडे हे लिस्बन पोर्तुगालमध्ये शिक्षा भोगत होते. आपल्या सुटकेसाठी ते स्वतःच झगडत होते. नंतर त्यांचे मित्र सुधीर फडके यांनी पु.ल.देशपांडे, लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे यांना घेऊन ‘मोहन रानडे विमोचन समिती स्थापन करून त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. 13 वर्षाच्या प्रदीर्घ आणि अथक प्रयत्नानंतर रानडे यांची 25 जानेवारी 1969 साली सुटका झाली. इतकी वर्षे मानसिक आणि शारीरिक छळ सोसूनही ते कोमेजले नाही. जीवनाबद्दल त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन होता. ते तत्वनिष्ठ आणि ध्येयवादी होते. 2001 साली भारत सरकारने ‘पद्मश्री किताब’ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. सुधीर फडके यांनी संघाचे प्रचारक म्हणून जबाबदारी दिली होती. त्यांनी पुण्याचे संघचालक विनायकराव आपटे यांच्या नेतृत्वाखाली दादरा नगर हवेली सशस्त्र लढा भाग घेतला होता. त्यावेळी त्यांच्या समवेत राजाभाऊ वाकणकर, बिंदुमाधव जोशी, बाबासाहेब पुरंदरे होते.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1955 पासून गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला होता. त्यावेळी जगन्नाथराव जोशी त्याचे नेतृत्व करीत होते. भारतीय जनसंघाच्या सत्याग्रहींचे नेतृत्व करतेवेळी उज्जैनचे संघ प्रचारक राजाभाऊ महाकाल गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे पोर्तुगीज सैनिकांची गोळी लागून शहीद झाले.

दत्ता शिरोडकर (9822484416)

Back to top button