Opinion

वनयोगी बाळासाहेब देशपांडे

देशभरातील जनजाती समाजासाठी कार्यरत असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाचा 26 डिसेंबर हा स्थापना दिवस. कल्याण आश्रमाचे संस्थापक वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांचादेखील हा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा हा लेख..

‘ओळखीमधून मिळालेली सेवा जास्त काळ टिकत नाही पण सेवेमधून मिळालेली ओळख चिरकाल टिकते’. याचा प्रत्यय स्व. बाळासाहेब देशपांडे यांच्या कार्यातून येतो.बाळासाहेबांचा स्वर्गवास होऊन २६ वर्षं होऊन गेली पण वनवासी कल्याण आश्रम म्हटलं की सर्वप्रथम बाळासाहेबांचं नाव समोर येतं. कारण १९५२साली छत्तीसगड मधील जशपूर येथे बाळासाहेबांनी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे आणि त्याच्या शाखा देशभर विस्तारलेल्या आहेत.


२६ डिसेंबर हा रमाकांत केशव देशपांडे ऊर्फ बाळासाहेबांचा जन्मदिवस आणि वनवासी कल्याण आश्रमाचा स्थापना दिवस.बाळासाहेबांचा जन्म २६ डिसेंबर १९१३ रोजी अमरावतीमध्ये झाला.बालवयातच त्यांच्यावर देशभक्ती, देशसेवा, हिंदुत्व, प्रामाणिकपणा, कर्तव्याप्रती निष्ठा इ. संस्कार झाले.एखाद्या वृक्षाला घातलेले खत – पाणी जसे पुन्हा बाहेर काढता येत नाही उलट त्या खतपाण्यानेच तो वृक्ष बहरतो तसेच बालवयात झालेल्या या संस्कारांमुळे बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व फुलून आले.त्यांनी वकिलीची पदवी प्राप्त केली.


स्वातंत्र्यानंतर ईशान्य भारत जवळ जवळ भारतापासून दुरावला होता.या भागातील तसेच सर्वच प्रांतांमधील जनजाती – वनवासी लोकांचे जीवन सर्वस्वी जंगलांवर अवलंबून होते.पण ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यांमुळे त्यांचे जंगलांवरील अधिकार हिरावून घेतले गेले होते .त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.शिक्षण आरोग्य या तर खूप लांबच्या गोष्टी. समर्थ रामदासांनी केलेलं वर्णनश् या वनवासींना तंतोतंत लागू पडते.
‘माणसा खावया अन्न नाही। अंथरूण पांघरूण ते ही नाही।
घर करावया सामग्री नाही||

ही परिस्थिती बाळासाहेबांच्या लक्षात आली.ठक्कर बाप्पा यांच्या मार्गदर्शनाने आणि तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरूजींच्या प्रेरणेने त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केली.यामध्ये त्यांना जशपूरचे महाराज विजयभूषण सिंह जुदेव आणि मोरूभाऊ केतकरांचे सहकार्य लाभले. समाज कल्याण खात्यामार्फत जशपूर क्षेत्रात शासनाच्या विकास योजना राबवण्याचे ठरले. त्यासाठी बाळासाहेबांची नियुक्ती जशपूरचे क्षेत्रीय संघटक म्हणून करण्यात आली.जशपूर येथे अवघ्या दोन विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी पहिली शाळा सुरू केली . एका वर्षातच त्यांनी आसपासचे गावांमध्ये १०० शाळा सुरू केल्या. हळू हळू कामाचा विस्तार वाढत गेला. पुढे काही शासकीय बंधनांमुळे त्यांनी शासकीय नोकरी सोडली आणि स्वतंत्रपणे काम करू लागले. त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून वनवासी बांधवांच्या सर्वांगीण उन्नती चे कार्य हातात घेतले. हळूहळू या कामाचा विस्तार ओरिसा, मध्यप्रदेश,बिहार यासारख्या विविध प्रांतात झाला. पुढे १९७८साली या कामाला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले.१३ हजारहून अधिक ठिकाणी १९००० प्रकल्प उभे राहिले.शैक्षणिक प्रकल्प ४५६२ ( आश्रमशाळा, छात्रावास, संस्कार केंद्र इ.) आरोग्य विषयक प्रकल्प४०१५, आर्थिक विकास प्रकल्प २९३८,खेलकूद प्रकल्प २३१७, सत्संग केंद्र ५१७०, ग्राम समित्या १३१५१, इ.एकूण निरनिराळ्या १४ आयामांमधून वनवासी कल्याण आश्रमाचे काम चालू आहे.याचे श्रेय निश्र्चितच बाळासाहेबांना जाते.


जनजाती समाज हेच बाळासाहेबांचे कुटुंब होते.या लोकांचा सर्वांगिण विकास करून त्यांना आत्मनिर्भर,स्वावलंबी बनविणे हेच ध्येय त्यांनी कायम नजरेसमोर ठेवले होते.अर्थातच हे काम उभं करताना त्यांना अनंतत अडचणींना तोंड द्यावे लागले.


निष्ठावान कार्यकर्त्यांचे संघटन उभे करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.कारण स्वामी विवेकानंद म्हणत त्याप्रमाणे ‘ संघटनेशिवाय महान कार्ये उभी राहात नाहीत.’

असू आम्ही पत्थर पायातील। मंदिर उभवणे हेच आमुचे शील ।। ‘ असे महान विचार असणार्‍या या महान सेवाव्रतींना २६ डिसेंबर या त्यांच्या जन्मदिनी शत शत प्रणाम.

शोभा जोशी
(लेखिका कल्याण आश्रमाच्या पुणे महानगरातील कार्यकर्त्या आहेत)

Back to top button